राज ठाकरेंचं आता फिक्स ठरलंय, राजकीय राड्यात सक्षमपणे ५ वा पर्याय आणायचा..
सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे एक संधी म्हणून बघा, राज ठाकरेंनी आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं. आजच्या सभेत बोलताना राज ठाकरेंनी एकंदरित आपली भूमिका काय असणार त्याबद्दल संवाद साधला. भूमिका मांडत असताना शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांच्या राजकारणावर भाष्य केलं.
साहजिक प्रश्न पडतो तो म्हणजे राज ठाकरेंचा प्लॅन नेमका काय असणार आहे.
कारण जेव्हा शिंदे गटाचे बंड झाले तेव्हा शिंदे गट हा वेळ पडल्यास मनसेमध्ये विलीन होवू शकतो अस बोललं गेलं. मात्र हे प्रकरण अजूनही कोर्टातच भिजत पडलं आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपूर्वी भोंग्याचा प्रश्न मार्गी लावून राज ठाकरे ऑपरेशनच्या निमित्ताने शांत होते.
या काळात राज ठाकरेंच्या घरी जावून देवेंद्र फडणवीस भेटले होते. तर दूसरीकडे बहुमत चाचणीच्या वेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजप शिंदे गटाला आपलं मत दिलं होतं. या कारणामुळे मनसेला एक मंत्रीपद मिळेल अशा बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या.
तर या वर्षीच्या सभापांसून राज ठाकरेंनी आपल्या अजेंड्यावर शरद पवार यांना केंद्रस्थानी ठेवलं होतं. तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. हिंदूत्वाचा मुद्दा, भोंग्याचा मुद्दा राज ठाकरेंमुळे चर्चेत आला होता. हिंदूत्ववादी भूमिका घेवून राज ठाकरे शिवसेनेपासून दूरावलेली हिंदूत्ववादी व्होट बॅंक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं गेलं तर भाजपकडूनच महाविकास आघाडीला टार्गेट करण्यासाठी राज ठाकरेंचा वापर केला जात असल्याची टिका देखील झाली.
अशा टिका झाल्या कारण राज ठाकरे ज्या आवेशात महाविकास आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसला व शिवसेनेला झोडत होते तो आवेश भाजपवर टिका करताना येत नव्हता.
आजच्या भाषणात मात्र राज ठाकरेंनी सर्वच पक्षांवर टिका करत एकंदरित राजकीय परिस्थितीवर भाष्य केल. कोणीही कोणासोबत जातो. निवडणूकांपूर्वीच्या आघाड्या, नंतरच्या आघाड्या या सर्वांमध्ये मतदार कुठे आहे अशी विचारणा त्यांनी केली म्हणजेच सेना भाजप एकत्रित निवडणूक त्यानंतर सेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस युती व आत्ता शिंदे गट-भाजप युती या काळात मतदान करणाऱ्या मतदाराचा विचार न झालेल्या गोष्टीवर त्यांनी बोट ठेवून आत्ता आपण तो स्पेस टार्गेट करणार असल्याचं सुचवलं..
आत्ता हा स्पेस कसा टार्गेट करता येईल ते भविष्यात कळेलच पण राज ठाकरेंच्या बदलेल्या भूमिकांवर देखील एक नजर मारायला हवी..
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंनी कोणत्याही पक्षात प्रवेश न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांचा प्रमुख मुद्दा होता तो मराठी. मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होत राज ठाकरेंनी महाराष्ट्रचं मैदान मारण्यास सुरवात केली. दरम्यानच्या काळात राज ठाकरेंना अटक झाली, निमित्त ठरलं उत्तरप्रदेश-बिहारमधून नोकरभरतीसाठी आलेल्या तरुणांवर झालेले हल्ले. याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणूकीत झाला आणि पक्षाचे 13 आमदार निवडून आले.
मराठीचा मुद्दा मागे पडू लागला तेव्हा राज ठाकरेंनी 2011 च्या सुमारास मोदींचा गुजरात दौरा केला.
त्यानंतर त्यांचा कल हिंदूत्वाकडे अधिक वेगाने सरकला. 2012 साली मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर राज ठाकरेंनी हिंदूत्वाचा मुद्दा घेतला. पुढे 2019 च्या लोकसभा निवडणूकीत मात्र लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदींच्या विरोधात रणशिंग फुकलं. मोदी अमित शहा यांच्यावर जोरदार टिका केली मात्र त्यानंतर 2020 पक्षाचा झेंडा भगवा करत प्रखर हिंदूत्वाचा प्रचार सुरू केला. यावेळी त्यांची भूमिका मोदी शहा यांच्या सोयीची व जवळ गेल्याचं बोललं गेलं..
2022 च्या सुरवातीला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा मांडला. शरद पवारांवर टिकास्त्र सुरू केलं. आत्ता मात्र भाजपला पक्षाने समर्थन दिलेलं असून देखील राज ठाकरेंनी मात्र जाहीर व्यासपीठांवरून तटस्थ भूमिका स्वीकारलेली दिसून येतेय..
हे ही वाच भिडू
- शिंदे सरकार राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या भोंग्याच्या मुद्द्यावर कोणता निर्णय घेणार.?
- भुजबळ ६ ; नारायण राणे १० ; राज ठाकरे १ : कोण किती आमदार घेवून बाहेर पडलं..