म्हणून राज ठाकरेंनी यावेळी घेतलेला मुद्दा भोंग्यापेक्षा जोरात वाजला पाहीजे….

आज राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पत्र पोस्ट केलंय. ज्यात त्यांनी नाशिक, नगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या बाल वेठबिगारीच्या घटनांकडे लक्ष वेधलं आहे.

या पत्रात ते सांगतात की, “या घटना मनाला विषण्ण करणाऱ्या आहेत. कायद्याने वेठबिगारीचं निर्मूलन झालं असलं तरी ही प्रथा अजूनही सुरु आहे. हे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. राज्यसरकारने या प्रकरणात लक्ष द्यायला हवं आणि समाजाने सुद्धा यासाठी पुढे यायला हवं. असं प्रकरण ज्याला दिसेल त्याने पोलिसात तक्रार करावी किंवा महाराष्ट्र सैनिकांना सांगावं. ते कायदेशीर मदत करतील तसेच वेळ पडल्यास आपल्या पद्धतीने धडा सुद्धा शिकवतील.”

 

या पत्रातून त्यांनी वेठबिगारी निर्मूलनासाठी सगळ्यांना पुढे येण्याचं आवाहन केलंय. पण कायद्याने बंदी असलेली ही क्रूर प्रथा अजूनही का सुरु आहे? आणि ती या ठराविक भागातच का होतेय असे प्रश्न निर्माण होतात. 

तर अलीकडच्या काही दिवसांमध्ये वेठबिगारीची जी प्रकरणं मीडियात प्रकाशित झालीत, ती सगळी प्रकरणं या भागातील कातकरी या आदिवासी समाजातील मुलांची आहेत. तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना वेठबिगार म्हणून राबवून घेणारे सगळे लोकं मेंढपाळ आहेत. मेंढपाळांना जनावरांना चारणे आणि त्यांची दखभाल करण्याच्या कामात मजुरांची गरज असते त्यामुळे ते आदिवासी मुलांचा सौदा करतात आणि त्यांना अशा कामाला लावतात.

यात ६ ते १२ या अल्पवयीन मुलांचा अगदी ५०० ते १००० रुपयांमध्ये सौदा केला जातो.

मेंढपाळ मुलांच्या पालकांकडे येतात. त्यांना ५०० ते ३००० हजार रुपये तसेच एक दोन मेंढ्या देण्याचं वचन देतात आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या मुलांना वेठबिगार म्हणून कामाला ठेवतात. सौदा करतांना मुलांच्या खाण्या पिण्याची, राहण्याची आणि कपड्यांची व्यवस्था केली जाईल असं सांगितलं जातं. मात्र कामावर ठेवल्यानंतर मुलांवर अत्याचार केले जातात.

मुलांना शेळ्या मेंढ्यांसाठी पाणी भरणे, त्यांच्या लेंड्या साफ करणे, त्यांना चरायला नेणे आणि घरातील धुणीभांडी करायला लावलं जातं. काम करतांना काही चुका झाल्या तर त्यांना शिवीगाळ केली जाते,  मारहाण केली जाते. काही मालक तर कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करतात. यामुळे काही मुलांचा यात मृत्यू सुद्धा झालाय. 

अशाच एका प्रकरणामुळे या वेठबिगारी प्रथेच्या रॉकेटचा छडा लागला.

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील उभाडे पाड्यावरची ११ वर्षांची मुलगी गौरी आगिवले, हिला तिच्या वडिलांनी नगरच्या एका मेंढपाळाकडे वेठबिगार म्हणून ठेवलं. त्याने ३ वर्ष तिच्याकडून कामं करवून घेतले आणि एक दिवस काही जणांनी तिला बेशुद्ध अवस्थेत तिच्या घरी आणू सोडलं आणि पळून गेले.

जेव्हा तिला घरी सोडण्यात आलं तेव्हा ती काहीच हालचाल करत नव्हती. तिच्या अंगावर मारहाणीचे डाग होते तर गळ्यावर दोरीचं वर्तुळ होतं. पण तिच्या निरक्षर पालकांनी तिला एका मांत्रिकाकडे नेलं.

या गोष्टीची माहिती श्रमजीवी संघटनेच्या सदस्यांना कळली. त्यांनी गौरीला रुग्णालयात दाखल केलं पण तिथेच तिचा मृत्यू झाला.

गौरीच्या मृत्यूनंतर वेठबिगार म्हणून राबवल्या जाणाऱ्या कातकरी मुलाचा शोध सुरु झाला.

नाशिक, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील कातकरी मुलांना नगरच्या अनेक मेंढपाळांनी वेठबिगार म्हणून खरेदी केल्याचे प्रकरण समोर यायला लागले. त्यावर श्रमजीवी संघटना आणि नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केली.

जव्हारच्या धारणहट्टी पाड्यावरील ८ वर्षांची मनिषा नरेश भोये आणि ६ काळू नरेश भोये या दोन मुली नगरच्या अकोले तालुक्यातील मेंढपाळाकडे वेठबिगार होत्या. मनीषा ३ वर्षांपासून तर काळू वर्षभरापासून काम करत होती. हा मुद्दा तापायला लागल्यानंतर मेंढपाळाने मनीषाला परत सोडले पण काळू अजूनही बेपत्ता आहे. तर भिवंडी तालुक्यात १७ वर्षाचा राहुल पवार आणि १२ वर्षाचा अरुण वाघे यांना सुद्धा वेठबिगारीतून मुक्त करण्यात आलंय. 

कातकरी मुलांच्या वेठबिगारी समस्येबद्दल जाणून घेण्यासाठी बोल भिडूने श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते मनोज सातवी यांच्याशी संपर्क साधला. 

याबद्दल ते सांगतात की, “गौरीच्या प्रकरणापासून या मुलांच्या वेठबिगारी समस्येची माहिती मिळाली. नगर जिल्यातील मेंढपाळ हे कातकरी पालकांना ५०० ते ५ हजारापर्यंत रक्कम आणि १-२ मेंढ्या देतात आणि त्यांच्या लहान मुलांना वेठबिगार म्हणून राबवतात. यावर संघटनेने काम सुरु केले असून आतापर्यंत ३० मुलांना यातून सोडवण्यात आलंय. तसेच जी मुलं बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरु आहे.”  

यात अडकलेली मुलं मुक्त होतील पण त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा असा की मुलांचे पालक त्यांना वेठबिगार का ठेवतात?

तर याचं उत्तर आहे कातकरी समाजात असलेली गरिबी, निरक्षरता आणि दारूचं व्यसन. कातकरी समाज मोठ्या प्रमाणावर भूमिहीन आहे. काहींकडे जमिनी आहेत पण त्या अतिशय कमी आहेत. त्यामुळे कातकरी लोकं पावसाळ्यात गावात काम करतात आणि त्यानंतर कामाच्या शोधात दुसरीकडे भटकतात. अशातच दारूचे व्यसन असलेले पालक मुलांच्या वेठबिगारीचे सौदे करतात.

८ वर्षाच्या गौरीचा सौदा सुद्धा तिच्या वडिलांनी दारू आणि ३ हजार रुपयांच्या बदल्यातच केला होता. तिची आई मजुरीवर गेली होती तेव्हा तिच्या वडिलांनी गौरीला मेंढपाळाकडे पाठवून दिलं होतं. तीन वर्षे अत्याचार सहन केल्यानंतर ११ व्या वर्षी गौरीचा मृत्यू झाला. तिच्या वडिलांप्रमाणेच बाकी निरक्षर पालक सुद्धा व्यसन आणि आर्थिक अडचणीत मुलांना वेठबिगार म्हणून मेंढपाळाकडे ठेवतात.

लहान मुलांसोबतच मोठी माणसं सुद्धा वेठबिगारीचं काम करतात.

आजारपण, घराचं बांधकाम आणि लग्नासारखे कार्यक्रम असल्यास कातकरी शेतकरी, मेंढपाळ किंवा ठेकेदारांकडून काही हजारांची रक्कम उचल घेतात. त्याच्या बदल्यात ठेकेदार त्यांना कामावर वेठबिगारीने राबवून घेतो. त्यात पैशांपेक्षा कितीतरी जास्त काम करून घेतलं जातं. कामात काही चुका झाल्या किंवा अधिकचे पैसे मागितले तर शिवीगाळ आणि मारहाण केली जाते. 

या सगळ्या समस्येबद्दल जाणून घेण्यासाठी बोल भिडूने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तसेच आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्याशी संपर्क साधला. 

विवेक पंडित सांगतात की, “अतिशय अल्पवयीन कातकरी मुलांना वेठबिगार म्हणून ठेवण्याची किळसवानी घटना समोर आली आहे. नाशिकच्या इगतपुरीसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मुलांना सुद्धा अशाच प्रकारे वेठबिगार ठेवण्यात आल्याची प्रकरण समोर आल्यावर संघटनेने त्यावर कारवाई केली आहे.”

पंडित पुढे सांगतात की, “मुलं वेठबिगार म्हणून ठेवली जातात. कारण लोकांकडे राहायला, कसायला जमिनी नाहीत, रेशन कार्ड, आधार कार्ड, जातीचा दाखल यांसारखी कागदपत्रं नाहीत. तसेच मुलं शाळेत जात नाहीत. त्यामुळे यावर सरकारने कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचं आहे” असं ते म्हणाले. 

कातकरी समाजात हक्काच्या उत्पन्नाची साधनं आणि साक्षरता नसल्यामुळे समाजातील अनेक लोकं वेठबिगारीसारख्या क्रूर प्रथेच्या सापड्यात अडकलेले आहेत. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय करायचा असेल तर उत्पन्नाची साधनं, शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.  

हे ही वाच भिडू  

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.