राज ठाकरे जया बच्चनला म्हंटले होते, ‘गुड्डी बुड्ढी झाली, तरी अक्कल येत नाही!’

मागच्या चार पाच दिवसात राज्यसभेत पुन्हा एकदा गोंधळ बघायला मिळाला. बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या अभिनेत्री आणि सपाच्या खासदार जया बच्चन आणि भाजपच्या खासदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या भांडणात जया बच्चन म्हंटल्या,

मी तुम्हाला शाप देते की, तुमचे वाईट दिवस लवकरच येतील

आपल्याला बोलू न दिल्यामुळे संतापलेल्या जया बच्चन यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र हे काही पहिल्यांदाच नाही तर बऱ्याचदा असं काहीतरी बोलून त्या वादात सापडतात. नंतर मग ओढवलेल्या वादामुळे त्यांना किंवा अमिताभ बच्चन यांना माफी मागावी लागते ती गोष्ट वेगळी.

असंच एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून त्या काहीबाही बोलल्या होत्या आणि मनसे आक्रमक झाली होती. तेव्हा राज ठाकरे म्हंटले होते,

“गुड्डी बुड्ढी झाली, तरी अक्कल येत नाही!

या गोष्टीला सुरवात होते २००० च्या दशकात. याच कालखंडांत राज ठाकरेंनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली होती. २००८ आणि २००९ या दोन वर्षांमध्ये राज ठाकरे यांचा वरचष्मा राहिला. उत्तर भारतीयांच्या विरोधात राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे उठलेला गदारोळ आणि माध्यमांमधून त्यावर सतत पडणारा झोत यांमुळे शिवसेनेचे कट्टर समर्थकसुद्धा विशेषतः युवावर्ग ‘मनसे’कडे झुकू लागला होता.

राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीला केलेला विरोध, उत्तर भारतातील राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांच्या लोढ्यांना दिलेला नकार आणि जेट एअरवेजच्या सुमारे १९०० निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची केलेली व्यवस्था यामुळे हेच आपले तारणहार असल्याची मुंबईतल्या मरगळलेल्या मराठी माणसाची भावना होऊ लागली.

एप्रिल २००८ मध्ये ‘सामना’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या बातमीत रजनीकांतने तामिळनाडूबद्दल व्यक्त केलेल्या निष्ठेचा उल्लेख होता. होगेनक्कल जलप्रकल्पातील पाण्याच्या विवादात रजनीकांतने कर्नाटकच्या विरोधात तामिळनाडूची बाजू घेतली होती. बातमीत म्हटल्याप्रमाणे ‘वास्तविक रजनीकांत मूळचा मराठी, तो वाढला कर्नाटकात. म्हणजे तामिळनाडूसाठी तो तसा परप्रांतीयच, पण त्याने आपली निष्ठा तामिळनाडूच्या पारड्यात टाकली. या कृत्याने त्याने अमिताभलासुद्धा झाकोळून टाकले आहे.

‘सामना’तील वृत्ताने सगळीकडे चांगलीच खळबळ माजली, बाळासाहेब ठाकरे यांना हस्तक्षेप करून हा वाद शांत करावा लागला आणि अमिताभ आपला कौटुंबिक मित्र असल्याचे अधोरेखित करावे लागले. अशाप्रकारे मनसे शिवसेनेच्या हक्काच्या कुरणात घुसत होती. याउलट आपण नेमकं कोणतं धोरण अवलंबवाव याबद्दल शिवसेना चाचपडत होती.

सप्टेंबर २००८ मध्ये राज ठाकरेंना बच्चन कुटुंबावर तोफ डागण्याची आणखी एक संधी मिळाली. आणि ही संधी पुरवली होती जया बच्चन यांनी. त्यावेळी त्या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार होत्या. आपला मुलगा अभिषेकच्या ‘द्रोणा’ या चित्रपटाच्या संगीताच्या सीडीच्या प्रकाशन कार्यक्रमात त्या म्हणाल्या,

हम यूपी के लोग हैं, हिंदीमें बात करना चाहेंगे। महाराष्ट्र के लोग हम लोगों को माफ करें।

भडकलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरच्या जाहिरातींमधील अमिताभच्या चित्रांना काळे फासले. मराठी माणसांना प्रक्षुब्ध करणारी वक्तव्ये न करण्याची बाळासाहेब ठाकऱ्यांनी जया बच्चनला समज दिली. अमिताभने जयाच्या या वक्तव्याबद्दल माफी मागितली. राजनी अमिताभच्या या माफीचा स्वीकार केला आणि आपले बच्चनविरोधी आंदोलन मागे घेतले.

त्यावेळी राजनी जया बच्चननाही टोला लगावला, “गुड्डी बुड्ढी झाली, तरी अक्कल येत नाही!

Leave A Reply

Your email address will not be published.