राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला आत्तापर्यन्त 10 हून अधिक संघटनांनी विरोध केलाय..

पहिले गुढीपाडवा मेळाव्यातील भाषण, नंतर टिझर वाजवत उत्तर सभा आणि आता १ मे महाराष्ट्र दिनाला औरंगाबादची सभा. एका मागून एक सभा घेण्याचं सत्र सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरु केलेलं दिसतंय. त्यांच्या आधीच्या दोन्ही सभा बघून दोन गोष्टी समोर आल्या…

एक म्हणजे राज यांचा हिंदुत्व अजेंडा आणि दुसरा भोंगा विरोध.

त्यांच्या या सभेतील भाषणांनी अक्ख्या महाराष्ट्राला अजूनही हादरवून सोडलंय. अशातच आता त्यांची तिसरी सभा होणार आहे. मात्र त्यांच्या या सभेला अनेक पक्ष आणि संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. अगदी धमक्या, इशारे दिले आहेत.

तेव्हा नेमका कुणाकुणाचा विरोध आहे? का आहे? हे जाणून घेऊया…

राज ठाकरे यांनी त्यांची उत्तर सभा झाल्यानंतर औरंगाबादच्या सभेची घोषणा केली. औरंगाबादेतील खडकेश्वर इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा आयोजित करण्यात येणार आहे.

हे तेच मैदान आहे जिथे शिवसेना अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नाव बदलून ‘संभाजीनगर’ करावं अशी मागणी केली होती.

राज ठाकरेंनी देखील सभेची घोषणा करतानाच औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’ असं संबोधलं होतं. 

घोषणा झाली तशी मनसेचे कार्यकर्ते जोरदार कामाला लागले मात्र दुसरीकडे सभेला विरोध सुरु झाला. या घोषणेनंतर अनेक मोठ्या संघटनांसहित छोट्या संघटनांनी विरोध केला आहे. त्यासाठी त्यांनी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देखील दिलं होतं की सभेला परवानगी देऊ नका. 

सगळ्यात पहिले बातमी आली,

रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीकडून.

राज यांची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी दिला.

सध्या सर्व जाती-धर्माचे सण-उत्सव सुरुयेत. शांतता व सद्भावना कायम ठेवून सर्व धर्मियांनी सण उत्सव साजरे केलेत. अशी परिस्थितीत मनसे अध्यक्ष जाणीपुर्वक विशिष्ट एका धर्माच्या प्रार्थनेला विरोध करून जातीवरून तणाव निर्माण होईल, असे प्रक्षोभक भाष्य वारंवार करून, दोन समाजात तेढ निर्माण करतायेत.

त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा संविधानिक मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल’ असा इशारा कांबळे यांनी दिला.

इतकंच नाहीतर प्रशासनाने परवानगी दिली तरी आम्ही सभा उधळून लावू, असा इशारा कांबळे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. 

त्यानंतर आली डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संघटना.

राज यांनी भोंग्याच्या संदर्भात ३ मे चा अल्टिमेटम दिला आहे. पण हे आम्हाला मान्य नसून राज ठाकरे यांचे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारंय. राज ठाकरे हे सर्व भाजपच्या बोलण्यावरून करतायेत. आम्ही त्यांच्या औरंगाबाद इथल्या सभेला काळे झेंडे दाखवू असा इशारा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

मग एंट्री केली मुस्लिम नुमाइंदा कौंसिलनं.

राज यांच्या सभेच्या २-३ दिवसानंतर लगेच ईद आहे. तेव्हा खुदानखास्ता काही प्रॉब्लेम झाला तर मोठे दंगे होण्याची संभावना आहे, म्हणून सभा होऊ नये असं निवेदन आम्ही आयुक्तांना दिलंय, असं कौन्सिलच्या सदस्यांनी सांगितलं.

त्यानंतर नंबर लावला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने. औरंगाबाद हे खूप सेन्सिटिव्ह शहर आहे. सभेमुळे शहरातील शांतिप्रिय नागरिक चिंतीत झालेत. त्यात राज ठाकरे यांचा सध्याचा अजेंडा बघता त्यांच्या भाषणामुळे दंगलीची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा या जाहीर सभेला परवानगी देऊ नयेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.

ऑल इंडिया पँथर सेनेने देखील कडाडून विरोध दर्शवलाय.

भोंग्याच्या नावाखाली आणि गुजरात आणि उत्तरप्रदेशच्या धर्तीवरती दंगली करून सत्ता लाटण्याचा हा खेळ आहे. इतकंच भोंगा वाटतंय, तर रेल्वेच्या भोंग्याने त्रस्त झालेल्या झोपडपट्यातील लोकांकडे लक्ष द्या…

कामगार, मजूर उपाशी झोपतो तेव्हा त्याच्या पोटात जो भोंगा वाजतो त्याकडे लक्ष द्या. औरंगाबादला दंगलीच्या उंबरठ्यावर राज यांची सभा नेऊ शकते, म्हणून याचा विरोध आम्ही करतोय असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार म्हणालेत.

तर राज यांची सभा औरंगाबादच्या हिंदू-मुस्लिम एकोप्याला तडा देऊ शकते. आम्हाला मात्र अमन, शांती आणि भाईचारा हवा आहे म्हणून या सभेला आमचा खुला विरोध आहे, असं गब्बर ॲक्शन संघटनेने सांगितलं.

इतकंच काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलने देखील सभा होऊ नये अशी मागणी केली.

राज यांची सभा जातीय तेढ निर्माण करणारी आहे. तेव्हा राज्याचा विचार करता सरकारने कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. अशांतता पसरवणाऱ्या घटना थांबवणं सध्या गरजेचंय असं सेलच्या सरचिटणीसांनी सांगितलं.

दरम्यान राज ठाकरे हे मनुवादी आणि बहुजन विरोधी नेते आहेत. राज ठाकरे दलित आणि बहुजनांच्या विरोधात काम करतात. त्यांच्या सभेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नका, अशी मागणी आरपीआय गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी औरंगाबाद पोलिसांकडे केली आहे.

यासोबतच मौलाना आझाद विचार मंच, प्रहार जनशक्ती पक्ष, यासारख्या अनेक संघटनांनी सभा होऊ नये, असाच सूर काढला.

याव्यतिरिक्त काही राजकीय नेत्यांनी देखील खुलून याचा विरोध केलाय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणालेत की, “मला सर्वसामान्य लोक बोलताना सांगत आहे की, सभा कशासाठी पाहिजे, भोंग्यांचा विषय घेतील तर दंगली होतील. इथे मुस्लिमांची संख्या कमी आहे का? त्यामुळे जर सभा झाली दंगली होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं खैरे म्हणाले.

मात्र तरी १६ अटी लावत सभेला परवानगी मिळाली आहे. त्यानंतरही विरोध दिसतोच आहे. सभेला सशर्त परवानगी मिळाली असली तरी राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन केल्यास त्यांच्या सभेत महापुरुषांच्या नावाने घोषणा देण्यात येईल आणि आम्ही सभा उधळून लावू, असा   इशारा भीम आर्मीने दिला आहे. 

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. 

तर दुसरीकडे भोंगे, स्पीकर यामुळे राज ठाकरे यांना त्रास होत असेल तर प्रथम स्वतःच्या सभेतील स्पीकर बंद करून भोंगे, स्पीकरशिवाय सभा करावी. जर पुन्हा कुणाच्या सामाजिक भावना दुखावल्या गेल्या तर याला जबाबदार सभेस परवानगी देणारे पोलीस प्रशासन असेल, अशी टीका राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश संघटक सचिव हलिमा शेख यांनी केली आहे.

अशा या सगळ्या विरोधाच्या चक्रात सध्या राज ठाकरे यांची औरंगाबाद सभा महाराष्ट्रात धिंगाणा घालतेय. या कशाचीही पर्वा न करता राज ठाकरे औरंगाबादसाठी रवाना झालेत. सभेआधी मनसेचे कार्यकर्ते मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. पुण्यातून हजारो कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत औरंगाबादला जाणार आहेत.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनानंतर सभा लाट राज ठाकरे सुरु करतायेत असं दिसतंय. कारण राज यांची सभा १ मे ला होतेय त्यांच्या बरोबर एक दिवस आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिलला राज्यातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार, अशी घोषणा केलीये. 

तर १४ मेला मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानात जाहीर सभेची घोषणा केली आहे. ही उद्धव ठाकरे यांची अलीकडच्या काळातील पहिली जाहीर सभा आहे. 

तर १ मे रोजीच प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ‘शांती मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे मोठ्या घटना महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बघायला मिळणार आहेत. मात्र यात राज ठाकरेंची औरंगाबाद सभा जास्त लायलाईटेड होतेय. शिवाय संभाव्य धोके लक्षात घेता मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. 

तुम्हाला राज ठाकरेंच्या या सभेबद्दल नक्की काय वाटत? सभेत कोणते मुद्दे राज ठाकरे मांडू शकतात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा… 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.