“कहां राजा भोज और कहां गंगू तेली ” या म्हणीचा पन्हाळागडाशी काय संबंध आहे?

किल्ले पन्हाळा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. शिवा काशीद, बाजी प्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाच्या यशोगाथा इथे कोरल्या गेल्या. राजाराम महाराजांच्या आणि महाराणी ताराबाईंच्या काळात स्वराज्याचा राज्यशकट इथूनच हाकला गेला. अनेक ऐतिहासिक घटना पन्हाळ्याशी जोडल्या गेल्या आहेत.

याच पन्हाळगडाशी जोडली गेलेली एक म्हण मात्र भारतभर प्रसिद्ध आहे. कहां राजा भोज और कहां गंगू तेली.

भिडूना प्रश्न पडला की काय आहे या म्हणी मागचा इतिहास?

पन्हाळ्याच्या इतिहासाचा शोध घेतला तर या किल्ल्याचे संदर्भ तिसऱ्या शतकापासून सापडतात. म्हणजे शिवरायांच्या आधी जवळपास चौदाशे वर्ष. या गडाच पुरातन नाव ब्रम्हगिरी होतं.

पराशर ऋषी आपली पत्नी सत्यवती हिच्यासोबत येथे आश्रम करून राहत होते. तो पराशर आश्रम आजही पराशरांची गुहा म्हणून ओळखली जाते. या काळात हा किल्ला नाग वंशीय जमातीच्या ताब्यात होता.

त्यामुळेच याचं नाव पन्नगालय असं पडलं. म्हणजेच सापांचे घर.

पुढे पाचव्या शतकात चालुक्य आणि आठव्या शतकात राष्ट्रकुट राजांनी तिथे वर्चस्व मिळवल. त्याकाळातील सापडलेल्या ताम्रपटात या किल्ल्याचा उल्लेख पनालदुर्ग असा केला गेला आहे. राष्ट्रकुट साम्राज्याने जवळपास दोनशे वर्ष राज्य केले. त्यानंतर चालुक्य घराण्याशी संबंधित असणारे महामंडलेश्वर शिलाहार घराणे सत्तेत आले.

याच शिलाहार राजांपैकी दुसरा भोज म्हणजे विजयादित्य देवनसिंग याला आज आपण पाहतो त्या स्वरूपातल्या पन्हाळगड बांधण्याचे श्रेय दिले जाते.

पूर्वीच्या काळी शिलाहार राजांची राजधानी वलवाट म्हणजेच वळीवडे येथे होती. दुसरा भोज राजाने ती प्रथम कोल्हापूरला नेली आणि नंतर  ११९० साली पन्हाळ्यावर आणली. इसवी सन ११९० ते १२२० या काळात त्याने गडावर तटबंदी बांधली. राजधानी म्हणून अनेक वास्तू बांधल्या. या संदर्भातील शिलालेख सातारा येथे आहे.

सुप्रसिद्ध असा तीन दरवाजा याचं मूळ बांधकाम भोजराजाच्या कारकीर्दीतच झाले. या दरवाजाचा पाया व त्यावरील काही बांधकाम दगडामध्ये शिसे ओतून केलेले आहे. नंतरच्या काळात राजवटीनुसार बदल होत गेले. कोणत्याही गैर दृष्टीचा परिणाम या वांस्तूवर होऊ नये म्हणून दारावर शरभाकृती कोरलेली आढळते.

यावरूनच असे लक्षात येते की भोजराजा अंधश्रद्धाळू होता. मध्ययुगातला हा कालखंड हा अंधश्रद्धेने भरलेला होता. यास भोजराजा अपवाद नसावा.

त्याने किल्ला मजबूत व्हावा यासाठी अनेक मंत्रतंत्र केले. अस म्हणतात की भोजराजाने हा किल्ला बांधण्यासाठी देशभरातले सर्वोत्तम कारागीर बोलावले होते. प्रचंड खर्च केला होता. मात्र इतके करूनही या किल्ल्याची तटबंदीचा काही भाग काही दिवसातच ढासळत होता.

अशावेळी भोज राजा विजयादित्यला कोणा भविष्यवेत्त्याने सल्ला दिला की किल्ल्याच्या संरक्षणासाठी नरबळी द्यावा लागेल. हा नरबळी एका ओल्या बाळंतीणीचा आणि तिच्या लेकराचा द्यावा लागणार होता. भोज राजाने आपल्या अख्ख्या राज्यात दवंडी फिरवली. एवढ्या मोठ्या त्यागासाठी कोणीही तयार होत नव्हते.

अखेर हुजुरपागेत राहणारा गंगूसेठ तेली फाले म्हेतर तयार झाला.

त्याची सून नुकतीच बाळंत झाली होती. तिला व तिच्या नवजात मुलाला तटबंदीच्या खाली जिवंत गाडले गेले. हा बळी दिला ती जागा म्हणजे बालेकिल्ल्याच्या ईशान्येला असलेला बुरुज. त्याला तेलीणीच्या तटाची खोली म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी एक विरगळ आजही पहावयास मिळते. शिवाय या घटनेचे अस्सल कागद देखील उपलब्ध आहेत.

आजही पन्हाळ्यावर राहणारे रहिवासी म्हणतात की

भोज राजाला जो त्याग करणे जमले नाही ते गंगू तेली ने करून दाखवले म्हणून कहां राजा भोज कहा गंगू तेली ही म्हण प्रचारात आली.

ही सोडून भारतभरातल्या प्रत्येक भागात या म्हणीशी संदर्भात अनेक दंतकथा जोडल्या गेलेल्या आहेत मात्र सत्याच्या जवळपास जाणारी भोजराजा आणि गंगू तेलीची कथा म्हणून पन्हाळ्याचीच गोष्ट सांगितली जाते.

संदर्भ- युगयुगीन करवीर इतिहास दर्शन

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.