भारताच पहिलं सरकार अफगाणिस्तानात स्थापन झालेलं, राष्ट्रपती होते राजा महेंद्र प्रताप सिंग

भारताचं पहिलं सरकार शंभर वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये बनलं होतं असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर? तेव्हाचे भारताचे पहिले राष्ट्रपती हे पुढं जाऊन खुद्द वाजपेयींचं डिपॉझिट जप्त करणारे खासदार बनले होते हे सांगितलं तरी ते पटणार नाही. तब्बल तीस चाळीस वर्षे इंग्रजांनी त्यांना भारतात शिरू दिल नव्हता असा हा क्रांतिकारक जर्मनी, जपान अशा अनेक देशात राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी धडक देत राहिला पण कधी हार मानली नाही. शांततेच्या नोबल पुरस्कारासाठी देखील त्यांच्या नावाची शिफारस झाली होती.

हो असा एक माणूस होऊन गेला. पण त्याच नाव कित्येक भारतीयांना ठाऊक नाही. ते होते राजा महेंद्रप्रताप सिंह.

महेंद्रप्रताप सिंह यांचा जन्म उत्तरप्रदेशमधल्या मुर्सन संस्थानात झाला. तिथले राजा घनश्याम सिंह यांचे हे तृतीय सुपुत्र. पराक्रमी जाट कुटूंबात जन्मलेल्या महेंद्रप्रताप सिंह यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी हाथरसचे राजा हरनारायण सिंग यांनी दत्तक घेतले. महेंद्रप्रतापसिंह यांचं बालपण हाथरसमधल्या भल्यामोठ्या हवेलीत गेलं.

त्यांचं शिक्षण अलिगढ येथे मोहमेडन अँग्लो इंडियन स्कुलमध्ये झालं.

सुबत्ता आणि अफाट संपत्ती असूनही महेंद्रप्रताप सिंह यांना गोरगरिबांचे दुःख पाहवत नसे. भारतात पसरलेल्या या गरिबीचे कारण इंग्रजांची अन्यायकारी राजवट आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आपल्या देशात जात धर्म वर्ण पंथ आर्थिक स्थिती याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले.

याचंच पहिलं पाऊल म्हणून १९०९ साली वृंदावन इथल्या आपल्या राहत्या राजवाड्यात भारतातलं पहिलं मोफत टेक्निकल शिक्षण देणारं “प्रेम महाविद्यालय” स्थापन केलं.

याच काळात त्यांचा संबंध राजकारणाशी आला. तेव्हा भारताची स्वातंत्र्यलढ्याची चळवळ मूळ धरू पाहत होती. सासऱ्यांच्या विरोध पत्करून महेंद्रप्रताप सिंह हे काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सहभागी झाले. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, बिपीनचंद्र पाल यांच्या नेतृत्वाखाली स्वदेशी चळवळीत स्वतःला वाहून घेतलं. अस्पृश्यता निवारणासाठी अल्मोरा येथे दलित भोजनदेखील केलं.

२० डिसेंबर १९१४ साली वयाच्या २८ व्या वर्षी राजा महेंद्र सिंह यांनी स्वित्झर्लन्ड इथल्या एका कार्यक्रमासाठी म्हणून भारत  सोडला.

हि त्यांची तिसरी परदेशवारी होती. पण यावेळी ते परत आले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी इतर देशांकडून काही मदत मिळते का याची ते चाचपणी करत होते. तेव्हा त्यांचा संबंध वीरेंद्रनाथ चटोपाध्याय उर्फ चट्टो यांच्याशी झाला. चट्टो हे बर्लिन कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांनी महेंद्रसिंह यांचा जर्मनीचे परराष्ट्रमंत्री व्हॉन झिम्मरमन यांच्याशी ओळख करून दिली.

हा पहिल्या महायुद्धाचा काळ. इंग्लंड विरुद्ध जर्मनी मुख्य लढाई होती. गुलामीत असल्यामुळे भारताला बळजबरीने इंग्रजांनी या लढाईत उतरवलं होतं. पण याच युद्धाचा वापर करून इंग्रजांच्या शत्रूंच्या मदतीने भारताला स्वतंत्र करायचं असा प्रयत्न चट्टो, राजा महेंद्र प्रताप सिंह हि मंडळी करत होती. 

दरम्यानच्या काळात चट्टो यांनी पारसी क्रांतिकारक दादा चांजी यांच्या नेतृत्वाखाली एक टीम अफगाणिस्तानला पाठवली होती.

याच काळात इंग्लंडमध्ये श्यामजी कृष्णवर्मा आणि अमेरिकेत लाला हरदयाळ हे दोघे देखील हाच प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नांचा परिणाम  राजा महेंद्र प्रताप सिंह यांना जर्मनीचे सम्राट कैसर विल्यम दुसरा यांनी भेटायला बोलावले. चट्टो यांच्या सोबत राजा महेंद्र प्रताप सिंह बर्लिनला गेले. त्यांच्या सोबत लाला हरदयाळ देखील आले.

कैसर विल्यम हा राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या भेटीमुळे पुरता प्रभावित झाला. त्याने त्यांना ऑर्डर ऑफ रेड फ्लॅग हा पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं. कैसर विल्यमला त्यांनी अफगाणिस्तान मार्गे भारतात घुसण्याचा प्लॅन समजावून सांगितला. सध्या पंजाब मध्ये असलेल्या जिंद, पतियाळा, नभा येथून शिरून भारत जिंकण्याची संधी आहे हे त्यांनी दाखवून दिलं.

राजा महेंद्रप्रताप सिंह यांना लष्करी रणनीतीची प्रशिक्षण देण्यासाठी पोलिश बॉर्डरवर पाठवण्यात आलं. १० एप्रिल १९१५ रोजी त्यांनी बर्लिनला रामराम केला. तिथून त्यांनी अफगाणिस्तानला प्रवास सुरु केला. वाटेत तुर्कस्तान, इजिप्त मध्ये त्यांना कैसर विल्यममुळे अनेक साथीदार मिळाले. तुर्कस्तानच्या सुलतानाचा जावई आणि तिथला संरक्षण मंत्री एन्वीर पाशा याची त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. इराणमधल्या इस्पहान शहरात राऊफ बे याने त्यांचे स्वागत केले आणि दोन हजार सैनिक त्यांना जोडून दिले.

२ ऑक्टोबर १९१५ रोजी ते अफगाणिस्तानला पोहचले. तेव्हा तिथला अमीर हबिबुल्ला याने त्यांचे तिथे स्वागत केलं. त्याच्याच मदतीने १ डिसेंबर १९१५ रोजी राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी भारताचं पहिलं अंतरिम सरकार स्थापन केलं. ते स्वतः या सरकारचे पहिले हंगामी राष्ट्राध्यक्ष बनले. मौलवी बर्कतुल्लाह यांची पंतप्रधान पदी तर मौलवी उबैदुल्ला सिंधी यांची गृहमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली.

ब्रिटिशांविरुद्ध धर्मयुद्धाची घोषणा राष्ट्राध्यक्ष राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी केली. तिथून भारतात शिरण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु होते पण इंग्रजी सत्तेशी असलेल्या संबंधामुळे अमीर हबिबुल्ला संपूर्ण जीव लावून यात उतरत नव्हता. 

या दरम्यान आपल्या क्रांतिकारी विचारधारेमुळे त्यांचे कॉम्रेड लेनिनबरोबर देखील चांगले संबंध होते ज्याने रशियाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांना तिकडे येण्याचे आमंत्रण देखील दिलं होतं. 

जवळपास चार वर्षे राजा महेंद्रप्रताप सिंह यांनी अफगाणिस्तान मधून आपलं अंतरिम सरकार चालवलं. पुढे टिळकांनी देखील हबिबुल्लाशी संपर्क साधून भारतावर हल्ल्याचं निमंत्रण दिल होतं. पण पहिल्या महायुद्धात झालेला जर्मनीचा पराभव, अफगाण इंग्रज युद्धे यामुळे हा प्लॅन साकारू शकला नाही. राजा महेंद्रप्रताप सिंह याना आपलं सरकार विसर्जित करावं लागलं.

कोणत्याही परिस्थितीत त्यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने भलंमोठं इनाम जाहीर केलं. राजा महेंद्र प्रताप सिंह यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली. त्यांना फरार घोषित करण्यात आलं.

राजा महेंद्र सिंह देशोदेशी भटकत राहिले. अखेर १९२५ साली त्यांनी जपान येथे आश्रय घेतला. जपान मधल्या काळात देखील त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठीचे प्रयत्न चालू ठेवले. जगभरात इंग्रजांनी केलेल्या अन्यायाची प्रचिती यावी म्हणून त्यांनी वर्ल्ड फेडरेशन मंथली मॅगझीनची सुरवात केली. 

१९३२ साली एन.ए.निल्सन यांनी राजा महेंद्र प्रताप सिंह यांची शांततेच्या नोबेल साठी शिफारस केली होती. पण इंग्लंडच्या विरोधामुळे हा पुरस्कार त्यांना मिळू शकला नाही.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देखील त्यांनी टोकियो मधून आपली पराकाष्ठा सुरूच ठेवली. भारतासाठीच्या एक्झिक्युटीव्ह कमिटीसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. दुर्दैवाने या महायुद्धात जपानचा इंग्लंड अमेरिकेच्या दोस्त राष्ट्रांनी पराभव केला. राजा महेंद्र प्रताप यांचं स्वप्न अधुरं राहिलं.

पुढे १९४६ साली त्यांच्यावरचे सर्व निर्बंध हटवण्यात आले. महेंद्र प्रताप यांचं मद्रासला आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कन्या मणिबेन पटेल हजर होत्या. भारतात आल्या आल्या राजा महेंद्र प्रताप यांनी वर्ध्याला महात्मा गांधींची भेट घेतली. 

पुढे काही वर्षातच भारताला स्वातंत्र्य मिळालं. राजा महेंद्र प्रताप मात्र काँग्रेसमध्ये सामील झाले नाहीत. त्यांनी राजकारणातील वाटचाल एकाकी चालू ठेवली. अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक लढवली पण पहिल्यांदा त्यांचा पराभव झाला. पण दुसऱ्या वेळी त्यांच्या विरुद्ध उभ्या असणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांनी राजा महेंद्र प्रताप यांनाच मतदान करावे असे मतदारांना आवाहन केले आणि स्वतःचा पराभव स्वीकारला.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.