राजा रविवर्मांच्या सरस्वतीच्या चित्रात दिसणारी त्यांची प्रेयसी सुगंधा होती ?

शिक्षणाची देवी म्हंटल की डोळ्यासमोर येते सरस्वती..

हिंदू धर्मात तिचं खूप महत्वाचं स्थान आहे. बुद्धीची देवता असणाऱ्या सरस्वतीची पूजा विद्यार्थ्यांपासून शिक्षक कलाकारांपर्यंत प्रत्येकजणच करतो. हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे ज्ञानी लोक कोणत्याही कामाची सुरुवात सरस्वतीची पूजा करूनच करतात.

आपण अनेकदा आपल्या आजूबाजूला काही कॅलेंडर किंवा चित्रात पाहतो की देवी सरस्वती नदीच्या काठावर पांढऱ्या साडीत एका खडकावर बसलेली आहे. नदीत कमळ फुलले असतं. सरस्वतीने दोन हातात वीणा, एकामध्ये पुस्तक आणि दुसऱ्या हातात पांढऱ्या मोत्यांची माळ धारण केली आहे.

हे चित्र तसं बघायला गेलं तर आपल्या सर्वांना अगदी परिचित आहे. पण ऐकूनआश्चर्य वाटेल की आजपासून १२२ वर्षांपूर्वी सरस्वतीचे हे रूप लोकांच्या मनातच नव्हतं. म्हणजे सरस्वती होती कशी हेच सांगणं कठीण होत.

पण सरस्वतीचं हे रूप महान चित्रकार राजा रवि वर्मा यांची देणं आहे.

तज्ज्ञांच्या मते राजा रवि वर्मा यांच्या चित्रांमधल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर आणि ड्रेसवर दक्षिण भारताचा प्रभाव होता. सरस्वतीच्या चित्रात चेहरा, मुकुट, साडी आणि कानात घातलेले दागिने यावर दक्षिण भारतीय शैलीचा स्पष्ट प्रभाव आहे. तिच्या साड्या दक्षिण भारतातील प्रसिद्ध कांजीवरम शैलीशी साम्य असल्याचे सांगितले जाते. जरी रवी वर्मा यांनी हे केले असले तरीही त्यांची छायाचित्रे उत्तर भारतीय वैशिष्ट्यांपासून अजिबात ढळली नव्हती. त्यांनी दोन्ही क्षेत्रातील गुणवत्तेचा काळजीपूर्वक समन्वय साधला होता.

राजा रवि वर्मांच्या या अतिशय लोकप्रिय चित्रापूर्वी सरस्वती किंवा इतर कोणत्याही देवतेचे चित्रण इतके सूक्ष्म आणि सुंदर प्रकारे झालेच नव्हते. राजा रवी वर्मांनी सरस्वतीचं चित्र काढण्यापूर्वी प्रत्येकाच्या मनात वेगळीच सरस्वती होती. त्यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये तिचे चित्र वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केले गेले.

परंतु आश्चर्यकारक प्रतिभेचे चित्रकार राजा रवि वर्मा यांनी सरस्वतीच्या अशा स्वरूपाची रचना केली जी विविधतेने परिपूर्ण भारतातील प्रत्येक प्रांतातील लोकांना सहज स्वीकारली.त्यांचा हा प्रयत्न इतका यशस्वी झाला की रवीबाबूंच्या या ऐतिहासिक कार्याचा परिणाम सरस्वतीच्या सर्व मूर्तींवर स्पष्टपणे दिसू लागला.

पण या सरस्वती बाबतही एक ट्विस्ट होता, म्हणजे वाद होता. 

राजा रवी वर्मा तसं वादग्रस्त व्यक्तिमत्वच होते. हिंदू कट्टरपंथीयांनी राजा रवि वर्मा यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले होते. सर्वात मोठा आरोप धार्मिक भावना दुखावल्याचा होता. त्यांनी असे म्हटले की

रवी वर्मांच्या चित्रातल्या सरस्वतीचा चेहरा त्यांची प्रेमिका ‘सुगंधा’ सारखा दिसतो. तिचे लग्न झाले होते. आणि तिच्याबाबत असेही म्हटले होते की ती एका वेश्येची मुलगी आहे. विरोधकांनी आरोप केला की राजा रवी वर्मा यांनी एका वेश्येच्या मुलीला देवी म्हणून दाखवून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.

हा वाद कमी काय म्हणून त्यांच्यावर उर्वशी आणि रंभाच्या अर्धनग्न चित्रांच्या मार्फत अश्लीलता पसरविल्याचा आरोपही होता. मात्र, दीर्घ चर्चेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावले. पण या प्रकरणामध्ये त्याचे खूप आर्थिक नुकसान झाले होते.

सरस्वती व्यतिरिक्त, राजा रवि वर्मा यांनी लक्ष्मी, उर्वशी-पुरुरवा, नल-दमयंती, जटायू वध आणि द्रौपदी वस्त्रहरण सारख्या शेकडो पौराणिक कथा आपल्या कॅनव्हासवर आणल्या होत्या. त्या आधी, देवता मंदिरांमध्ये मूर्तीच्या स्वरूपात होत्या.

असे म्हटले जाते की, संतप्त लोकांनी मुंबईतील त्यांचे प्रेसही जाळले. केवळ मशीनच नाही तर अनेक मौल्यवान चित्रेही त्यात जळाली. तथापि, अनेक लोक आगीची बाब सत्य असल्याचे मानत नाहीत. आता या वादाव्यतिरिक्त असाही विश्वास आहे की आजपर्यंत या देशात त्यांच्यासारखी तैलचित्रे बनविणारा दुसरा चित्रकार कधीच जन्मला नाही.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.