आज मुंबईचे धनाढ्य स्वत:साठी ॲन्टेलिआ बांधतात पण त्याने मुंबईसाठी देखणं टॉवर बांधलं

मुंबईत श्रीमंतांची घरं हा चर्चेचा विषय असतो. समुद्रकिनारी असणारं जगातलं सर्वात महागडं घर म्हणजे अंबानी यांच ॲन्टेलिआ. पहिल्यांदा मुंबईत येणाऱ्या माणसाला शाहरूखच्या मन्नत पासून ते अंबानीचं ॲन्टेलिया पहायचं असतं. या माणसांना मुंबई शहराने मोठ्ठं केलं. मुंबईच्या सौदर्यांत भर घालतील अशा बिल्डींग त्यांनी उभा देखील केल्या. पण यात एकच खटकणारा मुद्दा आहे. या सर्वांनी स्वत: पैसे मिळवले व स्वत:साठी घर बांधलं.

इथेच एक वेगळा मुद्दा येतो तो म्हणजे मुंबईसाठी बांधलेल्या इमारतीचा. मुंबईत तशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत पण या वास्तुला वेगळा स्पर्श लाभलेला आहे. एकेकाळी मुंबईची उंच वास्तू म्हणून लोक इथे फिरायला येत असतं.

या ऐतिहासिक वास्तूचं नाव म्हणजे राजाबाई टॉवर.

१८ वं शतक संपायला काही वर्ष बाकी होती तेव्हाची ही गोष्ट. आता जरी मुंबईत जागोजागी उंचच उंच इमारती असल्या तरी त्या काळात उंच वास्तू उभारण्याची प्रथा नव्हती. १८६० ते १८६६ दरम्यान अमेरिकेत सिव्हिल वॉर सुरू होतं. या युद्धाचा स्वतःच्या व्यापारासाठी फायदा उठवत अनेक व्यापारी श्रीमंत झाले.

या कारणामुळे असेच श्रीमंत झालेले कापसाचे व्यापारी म्हणजे प्रेमचंद रायचंद. त्यांनी मिळालेल्या पैशाचा विनियोग मुंबईच्या विकासासाठी करण्याचं ठरवलं. १८६५ मध्ये आई राजाबाईच्या नावाने त्यांनी एक इमारत बांधण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी चार लाख रुपये दिले.

चार लाख ही त्यावेळी निश्चित फार मोठी रक्कम होती.

सर ए. गिल्बर्ट स्कॉट यांनी मुंबईत कधीही पाऊल ठेवले नाही. परंतु प्रेमचंद यांच्या सांगण्यावरून केवळ कल्पनाशक्ती लढवून त्यांनी या वास्तूचा आराखडा तयार केला. चार लाख रकमेवर जे काही व्याज मिळाले ते सुद्धा प्रेमचंद यांनी या वास्तु उभारणीच्या कामासाठी द्यायचं ठरवलं.

या पैशातून वाचनालय सुद्धा निर्माण केलं जाणार होतं. बांधकामाला सुरुवात झाली. आणि १८७८ रोजी ही इमारत बांधून तयार झाली.

ही इमारत म्हणजे ‘राजाबाई टॉवर’.

या टॉवरच्या बांधकामाबाबत सांगायचं झालं तर…

राजाबाई टॉवरचं संपूर्ण बांधकाम हे दगडी आहे. इमारतीच्या प्रत्येक टप्प्यावर विविध पुतळे बसवण्यात आले आहेत. या पुतळ्यांमुळे या टॉवरची शोभा अजून वाढली आहे.

त्याकाळी बांधकाम विभागातील इंजिनियर मुकुंद रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी हे पुतळे बनवले. अखेर १८८० मध्ये ‘राजाबाई टॉवर’चं उद्घाटन झालं आणि ही इमारत सामान्य जनतेला पाहण्यासाठी खुली करण्यात आली.

आर्थिक फायदा चांगला झाल्याने प्रेमचंद रायचंद यांनी राजाबाई टॉवर उभारण्यासाठी पैशांच्या बाबतीत अजिबात हात आखडते घेतले नाही.

तसेच हा टॉवर आधी लोखंडी असणार होता. परंतु मुंबईत बरसणारा जोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटामुळे टॉवरला कोणतेही नुकसान होऊ नये, म्हणून टॉवरचं दगडी बांधकाम करण्यात आले.

‘राजाबाई टॉवर’ लोकांना पाहण्यासाठी खुला झाल्यावर मुंबईकरांची झुंबड उडाली होती.

या टॉवरमधून संपूर्ण मुंबई दिसायची. तेव्हा मुंबईत इतर इमारती फारच कमी असल्याने पार माहिम भागात राहणाऱ्या लोकांना सुद्धा हा टॉवर दिसायचा. इतका हा टॉवर उंच होता. या टॉवरचं आणखी एक आकर्षण म्हणजे यामध्ये घड्याळ बसवण्यात आलं आहे.

या घडाळ्यात पूर्वी १६ प्रकारे संगीत वाजत असे. मुंबईकरांना हे सर्व नवीन असल्यामुळे त्याकाळी या घड्याळामधून येणारा आवाज, संगीत, गजर ऐकायला मुंबईकरांची गर्दी व्हायची. या १६ संगीतामध्ये ब्रिटिशांच्या राष्ट्रगीताची सुद्धा धून होती.

पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर घड्याळ्याचं नुकसान करून ही धून बंद करण्यात आली.

सामान्य नागरिकांसाठी खुला असणारा हा टॉवर १८८९ साली मात्र बंद करण्यात आला.

२५ एप्रिल १८८९ ची गोष्ट. बचुबाई अर्देसर गोदरेज आणि फिरोजबाई सोराबजी कामदिन या दोन पारशी महिला या टॉवर वरून मुंबई बघण्याच्या इच्छेने आल्या. परंतु एका आडदांड व्यक्तीने या दोघींवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

यामुळे या दोन महिलांनी घाबरून जवळपास २०० फूट उंच असलेल्या या टॉवरवरून खाली उडी मारली. आणि यात या दोघी जागीच गतप्राण झाल्या. या घटनेची तेव्हा सर्वत्र चर्चा झाली होती. यानंतर हा टॉवर सामान्य जनतेसाठी बंद करण्यात आला.

तर अशी होती ‘राजाबाई टॉवर’च्या निर्मितीची कहाणी.

आजही फोर्ट येथे असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या येथे हा टॉवर दिमाखात उभा आहे. जाणारा येणाऱ्या प्रत्येक मुंबईकराची ‘राजाबाई टॉवर’वर दिवसातून एकदा तरी हमखास नजर पडतेच. आधुनिक काळातील टोलेजंग इमारतींसमोर राजाबाई टॉवर स्वतःचा अनोखा क्लासिकपणा आजही जपून आहे.

पुढच्यावेळी जेव्हा मुंबईत जाल तेव्हा अंबानींच ॲन्टालिआ, शाहरूखचा मन्नत नक्कीच बघा पण राजाबाई टॉवरला भेट द्यायचं विसरू नका, कारण कसय मुंबईने लय जणांना भरभरून दिलं पण रिटर्नमध्ये मुंबईला काहीतरी देणारे खूप कमी लोकं आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.