शेतजमीन विकल्याने दिड कोटी मिळाले, १० दिवसात ५५ हजारांची दारू पीला अन् मेला..

– काय झालंय?

अहो, ४-५ दिवस झालेत माझा मुलगा घरी आलेला नाहीये. कुठेच सापडत नाहीये. एकुलता एक आहे हो… काळजाचा तुकडा आहे माझ्या.

– राहणार कुठले?

ग्योडी गाव, महोबा जिल्हा (उत्तर प्रदेश)

– बरं, नाव आणि वय काय?

२२ वर्षांचा आहे, राजन सिंग.

– दिसतो कसा?

गोरा आहे छान. तसा सडपातळ आहे. मात्र दाढी, केसांची ठेवण अगदी नीटनेटकी आहे. उंची साडेपाच फुटांपर्यंत असेल. अगदी हिरो दिसतो माझा मुलगा. पण काय कोणाची नजर लागली कळेना… कुठे गेलाय कुणास ठाऊक? रुसला तर नसेल ना माझ्यावर? काही बरं वाईट व्हायला नको… भीती वाटतेय.. एकटाच आधार आहे हो आम्हा  मायलेकींचा… काही वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झालेला. लवकरात लवकर शोधा त्याला…

– हो, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोच आणि तुम्हाला कळवतो.

खूप उपकार होतील हो… मला काहीच नको फक्त माझा मुलगा परत हवाय… कुठे असेल काय की.. जीव घाबरतोय आता…

२० मार्च २०२२ ला राजन बेपत्ता झाला होता.

पाणावलेल्या डोळ्यांनी राजनची आई रानी सिंह पोलिसांकडे विनवणी करत होती. आपल्या मुलाच्या सुखरूपतेची प्रार्थना देवाजवळ करत होती. त्या माय-माऊलीच्या डोळ्यातील पाणी आटत नव्हतं.

मात्र तिच्या सगळ्या प्रार्थना फोल गेल्या आणि भीतीने विजय मिळवला.

२७ मार्चला वृत्तपत्रांमध्ये बातमी झळकली –

“उत्तर प्रदेशातील महोबा इथं एका युवकाच्या मृत्यूनं राज्यात खळबळ माजली आहे. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्यानं घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. मृत युवकाच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत.”

गावातील सत्येंद्र सिंग यांच्या अंगणातील विहिरीत सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. ज्यावर गावकऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. तेव्हा तो राजनचा असल्याचा कळलं. सत्येंद्र सिंग हे राजनच्या मावशीचे पती होते. काही दिवसांपूर्वीच राजन त्याच्या मावशीच्या घरी आला होता. 

खूप संशयास्पद परिस्थितीत त्याचा मृतदेह होता. एकतर सडलेला होता, खूप घाण वास येत होता. शिवाय त्याच्या शरीरावर ठीकठिकाणी व्रण होते जे दाखवत होते त्याला जब्बर मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला होता. 

मुलाचा मृतदेह सापडल्याने आई बेशुद्ध झाली होती. तिची हालत बघवली जात नव्हती. तर लहान अल्पवयीन बहीण सुन्न पडली होती. दोघींचं जग चिर्रर्र शांततेने घेरलं होतं. 

पोलिसांसमोर प्रश्न होता, हे कुणी केलं? आणि का?

याचा खुलासा झाला पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर. 

रिपोर्टमध्ये साफ साफ कळत होतं की, त्याचा मृत्यू खूप दारू पिल्याने आणि मारहाण झाल्याने झालाय. पोलिसांनी माग काढला तेव्हा कळलं हे काम केलं होतं त्याच्या मित्रांनी. राजनच्या मित्रांनी त्याला जाळ्यात अडकवत दारूचं व्यसन लावलं. 

१० दिवसांत त्याला तब्बल ५५ हजारांची दारू पाजली होती. ज्यामुळे त्याच्यावर ५५ हजारांचे कर्ज झालं. इतकंच नाही तर त्यानंतर त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागले. ज्यामुळे राजन मानसिक तणावाखाली गेला होता. 

त्यानंतर मित्रांनीच हा प्रकार केल्याचा संशय होता आणि त्यांच्या मागावर पोलीस लागले होते. मात्र…

यात एक प्रश्न येत होता की, मित्रांनी इतकी दारू पाजली कशी? आणि कोणत्या आधारावर राजनकडे पैशांची मागणी करत होते?

याचं उत्तर होतं बुंदेलखेड एक्सप्रेस हायवे. 

बुंदेलखेड एक्सप्रेस हायवे बनवण्यासाठी ज्या शेतजमिनी घेण्यात आल्या होत्या त्यात राजनच्या कुटुंबाची शेतजमीन गेली होती. राजांच्या आईच्या नावावर असलेली ११ एकर जमीन अधिग्रहण करण्यात आली होती. त्यामुळे रानी सिंह यांना ‘दीड कोटी’ रुपये आर्थिक भरपाई मिळाली होती. 

राजांच्या आईने या पैशांमधून महोबा इथं ३२ लाख रुपये खर्च करून प्लॅट खरेदी केला होता. राजनसाठीच त्यांनी हा फ्लॅट घेतलेला. तर रमईपूर इथेही ७ लाखांची जमीन विकत घेतली. शिवाय राजनच्या नावावरही ५ एकर जमीन होती. 

याच श्रीमंतीच्या जोरावर राजन सातव्या आकाशावर पोहोचला होता. त्याच्यात खुमारी चढली होती, ज्याने त्याला वाईट लोकांकडे खेचलं. मित्रांच्या नादी लागून तो वाईट संगतीला गेला. पैसे मिळाल्यानंतर राजन मित्रांसोबत पार्टी करत होता. त्याला दारूचं व्यसन जडलं. त्यानंतर हा प्रकार घडला होता.

“पैशांची चिंता करू नका, आपल्याकडे लई पैसे आहेत, तुम्ही खर्च करा मी देऊन टाकीन”,

असं म्हणत राजन कर्जात गेला. जेव्हा मित्र पैसे मागू लागले तेव्हा मात्र तणावात गेला… याच दरम्यान मित्रांशी वादावादी होऊन अघटित घडलं असावं, असा अंदाज पोलिसांनी दिला.

काही कागदाच्या चिंध्यांनी राजनला नरकाच्या दारात नेलं होतं. तर त्याच्या आई-बहिणीचं हसतं खेळतं जग काळ्या धुक्याच्या आड गेलं होतं. ‘सिंग’ कुटुंब बर्बाद झालं होतं. आता त्या दीड कोटींकडे वळूनही बघण्याची इच्छा नव्हती.

 दीड कोटी काळ बनून राजनवर चालून आले होते..!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.