विलासराव देशमुखांमुळे शासकीय पातळीवर शाहू महाराजांची जयंती सुरू झाली.

काय म्हणतां राजर्षी शाहू महाराजांची जयंती यापूर्वी होत नव्हती. होय भिडू कधीकधी धक्का बसावा अशा गोष्टी समजतात.

आत्ता हेच बघा शासकीय पातळ्यांवर शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यास कधी सुरवात झाली याची तारीख मिळते २६ जुलै १९९९ ची.

यापूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार असे एकसे एक मातब्बर नेते पश्चिम महाराष्ट्रातून मुख्यमंत्री होवून गेले मात्र कोणत्याही नेत्याने राजर्षी शाहू महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

हे प्रयत्न का झाले नाहीत याच नेमकं कारण सांगायचं तर,

शाहू महाराज कोणत्याही एका जातीगटात अडकले नाहीत. शाहू महाराजांचे हे पूरोगामित्त्व त्यांच्यासाठी अडचणीचं ठरलं आणि दूसरी गोष्ट म्हणजे शासकीय पातळीवर शाहू जयंती सुरू करावी असा विचार देखील यापूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या मनात आला नव्हता.

मात्र शाहू महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी व्हावी यासाठीचा प्रस्ताव प्राध्यापक हरी नरके यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे मांडला.

याचा किस्सा खुद्द प्रा. हरी नरके यांनी आपल्या ब्लाॅगमध्ये मांडला आहे.

ते लिहतात,

विलासराव नुकतेच मुख्यमंत्री झाले होते. शिक्षणमंत्री असताना त्यांचा आणि माझा परिचय होता. त्यामुळे शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी म्हणून मी तसा अर्ज मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे घेवून गेलो. विलासरावांनी त्यावर एक नजर टाकली आणि म्हणाले,

कसं शक्य आहे?

आजवर तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले कितीतरी मुख्यमंत्री झालेले असतानाही शाहू महाराजांची जयंती शासनामार्फत साजरी होत नाही. यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा, शरदराव पवार शाहूंना विसरले असणं शक्य वाटत नाही.

ज्याअर्थी जयंती साजरी होत नाही त्याअर्थी काहीतरी गंभीर कारण असणार तुम्ही मला मराठवाड्यातल्या माणसाला कशाला अडचणीत आणता?

विलासरावांनी याबाबत शासकीय अहवाल मागवण्याची सूचना केली. राज्याचे तत्कालिन उपसचिव भूषण गगराणी यांना बोलावून शाहू जयंती ग्रामपंचायत ते मंत्रालय पातळीवर साजरी करण्यासंबधी अहवाल मागवण्यात आला.

भूषण गगराणी यांनी शाहू जयंती साजरी करण्याबाबत अनुकूल अहवाल सादर केला.

त्यानूसार २५ जूलै रोजी रात्री उशीरा शासकीय आदेश काढण्यात आला. हा आदेश काढताना संबधित अधिकारी बाईंनी खोडसाळपणा करून रात्री उशीरा आदेश काढला त्यामुळे तो दूसऱ्या दिवशी उशीरा देखील पोहचू शकला नाही. शिवाय खोडसाळपणे या आदेशात फक्त एकच वर्ष जयंती साजरी करण्यात यावी अशी सूचना केली.

हि गोष्ट प्रा. हरी नरके यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या नजरेत आणुन दिली. पुन्हा चक्रे फिरली आणि दरवर्षी शासकीय पातळीवर शाहू जयंती साजरी करण्यात यावी असा जीआर काढण्यात आला.

पुढील काळात सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी २६ जूलै अर्थात शाहू महाराजांच्या जयंतीला समता दिन साजरा करण्यात यावा असा आदेश काढला.

मात्र इथेही २६ जूलै की २६ जून याबाबत घोळ सुरू झाला.

शाहू महाराजांची जयंती तोपर्यन्त २६ जुलै रोजी साजरी करण्यात येत होती. मात्र डाॅ. बाबांसाहेब आंबेडकर यांच्या एका पत्राद्वारे शाहू महाराजांची जन्मतारीख २६ जून असल्याचे स्पष्ट झाले व त्यानुसार २६ जून रोजी शाहू महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्यात आली.

प्रा. हरी नरके यांच्यासमवेत भूषण गगराणी, शुध्दोधन आहेर, सुशिलकुमार शिंदे, डाॅ. एस.एन. पठाण यांच्या पाठपुराव्यामुळे व विलासराव देशमुख यांच्या ठाम निर्णयामुळे जयंती साजरी होवू शकली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.