मोदींनी ज्या क्रांन्तीगाथा संग्रहालयाचं उद्धाटन केलं त्या बंकरचा शोध विलास मोरेंनी लावलाय.. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते क्रांती गाथा या भूमिगत दालनाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. वास्तविक क्रांति गाथा हे राजभवनातल्या बंकरमध्ये उभारण्यात आलेलं क्रांतिकारकांच्या आठवणी जपणार संग्रहालय. इथे भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे क्रांतिकारक लढले त्यांच्या आठवणी जतन करण्यात आलेल्या आहेत. 

साधारण १२ फुट उंचीच आणि १५० मीटर लांबीच्या या बंकरचा शोध २०१६ साली लागलेला. इतकं मोठ्ठं बंकर असूनही त्याची माहिती कशी काय नव्हती आणि याचा शोध नेमका कोणी लावला तेच सांगणारा हा किस्सा.. 

या बंकरचा शोध लावणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे विलास रामचंद्र मोरे. विलास रामचंद्र मोरे हे राज्यपालांचे जमादार. राज्यपालांच्या फोटोच्या मागे अनेकदा गणवेष धारण केलेली व्यक्ती तुम्ही पाहीली असेल तर हेच ते विलास मोरे. राजभवनात चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी असणाऱ्या मोरेंना या बंकरचा शोध लावण्याचं क्रेडिट जातं.. 

तर विलास मोरे यांचे वडिल रामचंद्र मोरे हे देखील राजभवनात कामाला होते.

त्यामुळे विलास मोरे लहानपणापासून राजभवनात यायचे. वडिलांकडूनच त्यांना या बंकरबद्दल माहिती झालेलं. पण राजभवनाखाली एक भुयार आहे इतकिच ही माहिती होती. 

पुढे विलास मोरे देखील राजभवनात कामाला लागले. ते साल होतं १९७८ चं. संदेश वाहक म्हणून राजभवनात लागलेले विलास मोरे जमादार झाले. त्यांनी सादिक अली, ओपी मेहरा, आयएच लतीफ, शंकर दयाल शर्मा, कासू ब्रह्मानंद रेड्डी, सी सुब्रह्मण्यम, पी.सी अलेक्झांडर, विद्यासागर राव, भगतसिंग कोश्यारी अशा एकूण १४ राज्यपालांच्या सोबत काम केलं. 

या कालावधीत राजभवनाचा चालता बोलता इतिहास म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. प्रत्येक ठिकाणाचा इतिहास त्यांचा तोंडपाठ असायचा. 

साल होतं २०१६ 

सी. विद्यासागर राव हे तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल होते. विद्यासागर राव हे इतिहास प्रेमी. कोणत्याही गोष्टीचा एकदा पाठपुरवा घेवून ती गोष्ट तडीस घेवून जाणं ही त्यांची वृत्ती.. 

राजभवन हे समुद्रकिनाऱ्यावर आहे. किनारा आणि राज्यपालांचे निवासस्थान यांच्या दरम्यान जुनी जलचिंतन इमारत आहे. तिथून खाली समुद्राकडे जाण्यासाठी पायऱ्याची वाट जाते. इथूनच खाली उतरताना विटांची भिंत दिसायची. 

इथे विटांची भिंत का? असा प्रश्न विलास मोरेंना पडायचा. पण सापांच्या भितीने ही वाट बंद असल्याने तिथे जाण्याचा प्रश्न देखील नव्हता. सी विद्यासागर राव यांना मॉर्निंग वॉक घेण्याची सवय होती. या सवयीमुळे रोज समुद्राकडील वाटेनं जावं लाग. राज्यपालांच्या मागोमाग जात असताना रोज या भितींच्या मागे काय असावं? वडिलांनी सांगितलेलं भूयार इथेच असाव का असा प्रश्न विलास मोरेंना पडायचा… 

त्यातूनच अनेकदा त्यांनी पाठपुरावा पण केला होता पण म्हणावं अस काम झालं नाही.

विद्यासागर राव मात्र इतिहासप्रेमी होते. यातूनच राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्या कानावर त्यांनी ही गोष्ट घातली. या भिंतीच्या मागे नक्कीच काहीतर असावे आपण याचा पाठपुरावा राज्यपालांकडे करावा अशी मागणी त्यांनी केली.. 

उमेश काशीकर यांनी ही गोष्ट राज्यपालांच्या कानावर घातली. राज्यपालांना देखील यात इंटरेस्ट आला. त्यांनी तात्काळ ही भिंत पाडून टाकण्याचे आदेश दिले. पण प्रशासनाचा अनुभव फक्त आपल्यालाच येतो अस नाही. तीन महिने हे काम काहीना काही कारण सांगून लटकत राहिलं.

अखेर प्रकरण तडीस लावायचं म्हणून विद्यासागर राव यांनी व्यक्तिश: आदेश दिले. भिंत पाडा. भिंत पाडण्यात आली तेव्हा १५० मीटर लांबीचे, १२ फूट उंचीचे एक भलेमोठ्या बंकरचा शोधच लागला. 

त्यानंतर माध्यमातून या बंकरच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीश: या बंकरला भेट देवून माहिती घेतली. खुद्द  विद्यासागर राव प्रत्येकाला बोलवून हे बंकर दाखवत.

ब्रिटीशकाळात दारूसाठा ठेवण्यासाठी इंग्रजांमार्फत हे बंकर तयार करण्यात आलं असण्याची शक्यता इतिहासतज्ञांनी बोलून दाखवली होती. त्यानंतरच्या काळात या बंकरच काय करता येवू शकत याचा अंदाज घेण्यात आला. इतिहासकार विक्रम संपत यांनी या ठिकाणी क्रांतिकारकांचा आठवणींचा वारसा होवू शकतो अशी कल्पना मांडली. व आज राज्यपाल कोश्यारी यांच्यासह अनेकांच्या प्रयत्नातून क्रांतिगाथा हे दालन उभारण्यात आलं. 

मात्र अशा वेळी विलास मोरेंची प्रयत्न विसरून चालणार नाही हे देखील नक्की… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.