राजदीप सरदेसाईंनी अंबानींविरोधात रान उठवलं; अंबानींनी थेट चॅनेलच विकत घेतला

अदानींनी  NDTV  विकत घेतल्यासाची काल बातमी आली. त्याआधी NDTV वर अदाणींबद्दल दोन बातम्या चर्चेत होत्या. त्यातली पहिली बातमी होती अदाणींना भरमसाठ कर्ज देण्यात आलेल्या एका रिपोर्टची आणि दुसरी होती या बातमीमुळे अडणींच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीची. आणि सर्वात शेवटची बातमी अदानींनी NDTV चे २९ टक्के शेअर्स विकत घेतल्याची आणि अजून २६ टक्के शेअर्स विकत घेण्यासाठी दिलेल्या ऑफरची.

पण त्याचवेळी NDTV समूहाने एक परिपत्रक काढलं आणि अदानींनी केलेल्या या सौद्याची आम्हला कोणतीच आयडिया नव्हती असं म्हटलं. मात्र अदानी समूहाने केलेल्या हा सौदा कायदेशीर दृष्ट्या चुकीचा नव्हता असं जाणकार सांगत आहेत.

मात्र असाच एक सौदा झाला होता जेव्हा अंबानींनी नेटवर्क १८ ग्रुप विकत घेतला होता. 

अगदी तीच स्क्रिप्ट NDTV घेताना अंबानींनी रिपीट केली आहे. मार्च २०१४ ची गोष्ट आहे. जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई तेव्हा सीएनएन-आयबीएनचे मुख्य संपादक होते. त्यावेळी त्यांना एक फोन आला. फोनच्या दुसऱ्या बाजूला भारतातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होती.  

तुम्ही नेहमी माझया विरोधातच का बातम्या देता ? असं स्वतः मुकेश अंबानींनी राजदीप सरदेसाईंना विचारलं होतं. तेव्हा केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने अंबानी यांच्याविरोधात मोर्चा वळवला होता.

पत्रकार परिषदा, भाषणे, रॅली ते भ्रष्टाचारविरोधी शाखेकडे निवेदने देऊन केजरीवाल अंबानींवर तुफान हल्ला चढवतर होते. त्यांनी अनेक आरोप केले होते.अंबानीं म्हणजे क्रोनी कॅपिटॅलिस्ट अशी इमेज देशभर निर्माण होत होती.

केजरीवालांनी एवढयावरच नं थांबता पूर्व किनार्‍यावरील कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील नैसर्गिक वायूच्या किमतीत कथित अनियमितता केल्याबद्दल रिलायन्स आणि काही केंद्र सरकारचे मंत्री आणि अधिकार्‍यांविरुद्ध एफआयआर देखील दाखल केला. 

हे सगळं २४*७ लाइव्ह टीव्हीवर दाखवण्यात येत होतं. त्यामुळे रिलायन्स समूहाची देशभर बदनामी होत होती. कंपनीकडून प्रसिद्ध पत्रकं काढण्यात येत होती. अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची धमकी देण्यात येत होती. मात्र याचा कोणताही फरक पडत नव्हता.

मग यातून बाहेर पाडण्यासाठी रिलायन्सने एका अंतरराष्ट्रीय PR एजेन्सीची मदत घेण्याचं ठरवलं. त्यानुसार कंपनीनं न्यू सेंच्युरी या लंडनच्या कंपनीला रिलायंसला या संकटातुन बाहेर काढण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. न्यू सेंच्युरीने सांगितलेल्या पहिल्या काही उपायांमधला एक महत्वाचा उपाय होता तो म्हणजे न्यूज चॅनलवरील रिलायन्स बाबतीतचं कव्हरेज तातडीनं थांबवणे. 

आणि यामुळंच राजदीप सरदेसाईंना स्वतः अंबानींनी कॉल केला होता असं सांगण्यात येत होतं. रिलायन्सची CNN-IBN ने केजरीवाल आणि आप यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकावा अशी मागणी होती. मात्र राजदीप सरदेसाई यांनी या मागणीला स्पष्ट शब्दात नकार दिला होता.

त्यामुळे नेटवर्क 18 ज्याच्या अंतर्गत  CNN-IBN चॅनेल येत होता त्या ग्रुपचे संस्थापक आणि मॅनेजिंग डिरेक्टर राघव बहल यांच्यावरही दबाव वाढत होता. मुकेश अंबानींचे राइट हॅन्ड समजले जाणारे मनोज मोदी यांनी राघव बहल यांना स्वतः फोन करून झापलं होतं.

‘तुम हमको डाकू बुलाते हो, तुम चिल्ला रहे हो की हम क्रोनी कॅपिटॅलिस्ट है. अगर ऐसा था तो डाकू से पैसे मांगने क्यों आये द? तुम कौन से दूध के धुले हो?’

अशा शब्दात अंबानींच्या सर्वात खास माणसाकडून देशातल्या सगळ्यात मोठ्या न्यूज मिडिया कंपनीचे मालक असणाऱ्या राघव बहल यांची खरडपट्टी काढण्यात आली होती.

मात्र राघव बहल यांना हे सर्व ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता कारण अंबानींच्याच पैश्यांवर चॅनेल चालत होता. २०१२ च्या सुरवातीस  मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने डिबेंचर्सच्या बदल्यात राघव बहल यांना कर्ज दिलं होतं. डिबेंचर्सनुसार रिलायन्सला या कर्जाचं नेटवर्क18 च्या शेअर्स मध्ये कन्व्हर्ट करण्याचा ऑप्शन होता. कर्ज दिल्यापासून १० वर्षांच्या आत ते असं करू शकत होते.

मात्र रिलायन्सने त्यांच्या समूहाची होणारी वाढती बदनामी टाळण्यासाठी अडीच वर्षातच हा ऑप्शन वापरायचं ठरवलं. एकदम तडकाफडकीत हा निर्णय झाला होता.आणि बहल यांनी तो मान्य केला होता. २७ मे २०१४ च्या बोर्ड मीटिंगमध्ये  बहल यांनी म्हटलं होतं.“त्यांना कंपनी पूर्णपणे ताब्यात घ्यायची  आहे आणि ते पूर्णतः त्यांच्या अधिकारात आहेत. म्हणून मी डिलमध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी एक ऑफर दिली की मी मायनॉरिटी स्टेकहोल्डर म्हणून पुढे राहू शकतो परंतु मी कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. “

दोन दिवसांनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने जाहीर केले की ते नेटवर्क18 चं  संपूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी ₹ 4,000 कोटी खर्च करतील. अशाप्रकारे भारताच्या मीडिया उद्योगातील सर्वात मोठ्या टेकओव्हर अंबानींनी केलं होतं.

नेटवर्क18 वर ताबा मिळवल्यामुळे in.com, IBNlive.com, Moneycontrol.com, Firstpost.com, Cricketnext, Homeshop18, bookmyshow.com आणि कलर्स, CNBC TV18, CNN-IBN, IBN7 , CNBC आवाज, IBN लोकमत आज रिलायंसच्या मालकीची झाली आहेत. 

अंबानींनी केलेल्या टेकओव्हरननंतर  राजदीप सरदेसाई, सागरीख घोष आणि इतर मोठ्या पत्रकारांनी CNN-IBN चॅनेल सोडण्याचा निर्णय घेतला होता.

कधी काळी राजदीव सरदेसाई यांनी ज्या NDTV पासून आपल्या करियरची सुरवात केली होती आज त्या ग्रुपवर देखील हीच वेळ आली आहे. डिबेंचर्सने कर्ज घेतलं मग कर्ज देणार्याने कर्जाची रक्कम शेअर्समध्ये रूपांतरित करून कंपनीचाच ताबा घेतला. त्यामुळे अडाणी केवळ अंबानींची स्पर्धाच करत नसून त्यांचे हातखंडे देखील वापरत आहेत एवढं नक्की. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.