ज्युबिली कुमारच्या नुसत्या स्माईलने सिनेमा सुपर हिट व्हायचा..

बॉलिवूडमध्ये कायमच हिट व्हायचं असेल तुम्हाला सुपरहिट सिनेमे देणं गरजेचं असतं. सिनेमा कायम फ्लॉप ठरत तर हिरोवर अपयशी हिरोचा ठपका बसला जातो. पण बॉलिवूडमध्ये एक असा हिरो होता ज्याच्या नुसत्या स्माईलने सिनेमा हिट व्हायचा आणि त्याला लोकं ज्युबिली कुमार म्हणून ओळखायचे. तर आज आपण बॉलिवूडच्या या ज्युबिली कुमार बद्दल जाणून घेऊ.

६० च्या दशकातला हँडसम हंक म्हणजे राजेंद्र कुमारला ओळखलं जायचं. ज्याने बॉलिवूडमध्ये फक्त आपल्या स्माईलने लोकांना वेडं केलं नाही तर बॉक्स  सिनेमांचा दबदबा निर्माण केला. राजेंद्र कुमारच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर २५ आठवड्याहून अधिक काळ चालण्याचा भीमपराक्रम केला होता.

त्यात राजेंद्र कुमारच्या राज, मेरे मेहबूब, दिल एक मंदिर, आयी मिलन कि बेला, आरझू  आणि सूरज या सिनेमांनी राजेंद्र कुमारला ज्युबली किंग हि ओळख मिळवून दिली. १९६० च्या दशकातील निर्माते कायम राजेंद्र कुमारच्या नावाने आश्वस्त राहत असे, कारण राजेंद्र कुमारच्या नुस्त्या नावाने सिनेमागृह हाऊसफुल व्हायचे. सिनेमे सुपरहिट देण्याचा खरा ट्रेंड राजेंद्र कुमारपासून सुरु झाला.

२० जुलै १९२७ ला राजेंद्र कुमारचा जन्म झाला. राजेंद्र कुमारचा परिवार मूळचा पंजाबचा. त्याचे वडील आणि आजोबा यशस्वी उद्योजक होते. पण भारत पाकिस्तान फाळणीमुळे त्यांचा परिवार स्थलांतरित झाला. मुंबईत आल्यावर राजेंद्र कुमारने सिनेमांमध्ये काम करायला सुरवात केली. पण सुरवातीला जेव्हा राजेंद्र कुमार बॉलिवूडमध्ये आला तेव्हा त्याला हिरो वैगरे बनायचं नव्हतंच. तो तेव्हा त्याकाळच्या दिग्दर्शकांसोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचा.

अनेक सिनेमांच्या वेळी असिस्टंट डिरेक्टर म्हणून राजेंद्र कुमार काम बघत होता पण १९५० च्या वेळी जोगन या सिनेमात एक छोटा रोल त्याला मिळाला. पुढे त्याच्यातली अभिनय क्षमता ओळखून त्याला काम मिळत गेले. पण राजेंद्र कुमार खऱ्या अर्थाने नावारूपाला आला ते म्हणजे मदर इंडिया या सिनेमातून. या सिनेमात नर्गिस यांच्या मुलाचा रोल राजेंद्र कुमारने केला होता. 

मेन लीड म्हणून राजेंद्र कुमारला वचन नावाचा सिनेमा मिळाला, हा सिनेमा तेव्हा सुपरहिट ठरला आणि या सिनेमाचं मानधन म्हणून त्याला दीड हजार रुपये मिळाले होते. पण इथून राजेंद्र कुमारच्या ज्युबली किंग बनण्याची सुरवात झाली होती.

राजेंद्र कुमार हा फक्त एक उत्कृष्ट अभिनेताच नव्हता तर तो उत्तम निर्माता सुद्धा होता. आपला मुलगा कुमार गौरव याला लाँच करण्यासाठी राजेंद्र कुमारने लव्ह स्टोरी सारखा उत्तम चित्रपट उतरवला होता. लव्ह स्टोरी सिनेमा चांगला चालला पण कुमार गौरव काय चालला नाही. पण राजेंद्र कुमारने मुलाची नौका किनाऱ्याला लावायचीच असं ठरवलं होतं म्हणून  संजय दत्त सोबत नाम सिनेमा केला. नाम सिनेमामुळे कुमार गौरव आणि संजू बाबाची चांगलीच चर्चा झाली, सिनेमा सुपरहिट झाला होता. 

राजेंद्र कुमार इंडस्ट्री मध्ये दोस्तीसाठी सुद्धा फेमस होता. संजय दत्त प्रकरणात त्याने सुनील दत्त यांना मोठा आधार दिला होता. राजेंद्र कुमारचं करियर हिट होण्यामागे मोहम्मद रफींचा आवाज सुद्धा कारणीभूत होता. रफींची अनेक गाणी राजेंद्र कुमारवर चित्रित झाली आणि हि गाणी अजरामर झाली.

पडद्यावर राजेंद्र कुमारची जोडी अनेक हिरोईनसोबत चांगली जमली. सायरा बानो, साधना, मीना कुमारी, वैजयंती माला अशा उत्तम अभिनेत्रींसोबत राजेंद्र कुमारने अभिनय केला. राजेंद्र कुमार हा नंतर सिनेमांपासून दूर गेला याला कारण होतं राजेश खन्ना पर्व. पण अभिनयाची सेकंड इनिंग सुद्धा राजेंद्र कुमारने यशस्वी ठरवली.

सिनेमातील भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारने राजेंद्र कुमारला १९६९ मध्ये पदमश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

१२ जुलै १९९९ रोजी राजेंद्र कुमारचं निधन झालं. पण राजेंद्र कुमारने ज्युबली कुमार हि ओळख लोकांच्या कायम स्मरणात ठेवली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.