राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद त्यांच्या दौऱ्यावरून नेहमी नेहरूंच्या कात्रीत सापडायचे.

आपण पाहतोच कि जेंव्हा केंव्हा राज्यांत-देशात नैसर्गिक संकटं येतात तेंव्हा तेंव्हा आपले राजकीय नेते त्या ठिकाणी भेटी द्यायला पोहचतात. तर अशा दौऱ्यांची परवानगी फक्त राजकीय नेत्यांनाच नसते तर संविधानिक पदाधिकार्यांना देखील असते.

तसेच राष्ट्रपतींनादेखील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय असे दोन प्रकारच्या दौऱ्यांची परवानगी असते, तसेच हे दोन्ही दौरे बहुदा सदिच्छा भेटीच्या स्वरूपात असतात. आपल्या भारताचे प्रथम राष्ट्रपती यांना तर या अशा दौऱ्यांची भारी हौस होती. त्यांच्या महागड्या,खर्चिक दौर्यांमुळे ते कित्येकदा वादात अडकले होते. तेंव्हाचे पंतप्रधान नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांच्यात याच मुद्यांवरून एकदाच नव्हे तर सारखी वादावादी होत असायची. 

त्यांच्या परदेश दौऱ्यातबाबत झालेल्या वादांचा काही एक किस्सा नाही तर अनेक किस्से आहेत

तर पहिला किस्सा तेंव्हाचा जेंव्हा बिहारमध्ये एका राष्ट्रीय ऊर्जा संशोधन केंद्राच्या उद्घाटन होणार होतं आणि यासाठी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे दोघेही जाणार होते.

यावेळी राष्ट्रपतींनी एका बड्या उद्योगपतीकडे पाहुणचार घ्यायचा आणि मुक्काम करायचे ठरविले होते. पंतप्रधानसाठीही हि व्यवस्था केली होती मात्र नेहरुंना स्वतःला वाटत होते की, राष्ट्रपतींनी राज्य सरकारचा पाहुणचार घ्यावा. ते म्हणाले राज्य सरकारने तशी तयारीही केली आहे त्यामुळे त्याचा अनादर करू नये

तेंव्हा राजेंद्रप्रसाद यांनी पंतप्रधान यांना प्रतिक्रिया कळवली की, “पंडित नेहरूंनीही राज्यसरकारच्या निवासस्थानात राहावे तर मग राष्ट्रपतीही राहतील”, त्यानंतर पंडित नेहरूंनी आपला हट्ट सोडला.

मात्र डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आपले ‘वेगळेपण’ कायम ठेवले आणि सरकारी निवासस्थानात मुक्काम करतांना त्यांनी आपला बिछाना मात्र बाहेरच घातला आणि मच्छरदाणीची सोय करण्याचा आदेश दिला.

दुसरा किस्सा आहे, जेंव्हा कोसी नदीला महापूर आला होता.  तेंव्हाची घटनास्थळीची राष्ट्रपतींची भेटही  अशीच गाजली होती.

बिहारच्या एका मंत्र्याने बिहारला भेट द्या म्हणून राजेंद्र प्रसाद यांना विनंती केली होती. या दौऱ्यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी रेल्वेची सोय करण्याची तशी सूचना दिली होती. 

मात्र त्यांच्या या दौऱ्यामुळे पंडित नेहरूंना राग आला. त्यांना वाटत होतं की, आधीच तिथे महापूर आला असतांना त्यात या दौऱ्याच्या तमाशाची काय आवश्यकता आहे?

कोसीच्या महापुराने स्थानिक लोकं आधीच त्रस्त आहेत त्यात राष्ट्रपतींच्या दौऱ्याची भर कशाला? बिहारच्या मुख्यमंत्र्याचाही राष्ट्रपतींच्या या दौऱ्याला विरोध असून देखील राष्ट्रपतींनी मात्र आपल्या दौऱ्याचा आग्रह कायम ठेवला आणि तो पार देखील पाडला.

या दौऱ्यानंतर पंतप्रधान नेहरूंनी राष्ट्रपती भवनातील प्रमुख सचिव बीमानेश चॅटर्जी यांना बोलावून घेतले आणि त्यांना सुनावले.

ते म्हणाले, “अनेक चांगल्या गोष्टी करायच्या अजून बाकी आहेत. आपल्याला योग्य आणि व्यापक विचार करून त्यानुसार वागायला हवे. काही चांगल्या व नेमक्या हेतु शिवाय जनतेचा पैसा वाया घालवणे थांबवले पाहिजे. तुम्ही नवी परंपरा निर्माण केली पाहिजे, नव्या प्रथा निर्माण केल्या पाहिजेत. तसे केले तरच जनतेचे डोळे नव्या दिशेकडे वळू शकतील”. त्यानंतर त्यांनी चॅटर्जी यांना हळूच एक सवालही केला. “अशी सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी याहून कमी खर्चिक असा अन्य मार्ग नव्हता का?”

नेहरू जरी हे सर्व राष्ट्रपतींच्या सचिवापाशी बोलत होते तरी ते राष्ट्रपतींना उद्देशूनच बोलत होते हे मात्र स्पष्ट जाणवत होते.

तिसरा किस्सा आहे हैदराबादच्या दौऱ्याचा ..

हैदराबादच्या एका दौऱ्याच्या वेळीही राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या तसाच एक खटका उडाला होता. राष्ट्रपतींनी हैदराबादेत कुठे उतरायचे यावरून हा वाद चालू होता.

ब्रिटिश काळात गव्हर्नर जनरल हे फालुकनामा राजवाड्यात उतरायचे. हा राजवाडा निजामाने खास ब्रिटिश व्हाइसरॉय साठीच बांधलेला होता. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना एकदा या प्रांताचा दौरा करायचा होता. एका मंत्र्याने त्यांना सांगितले की, राष्ट्रपतीने शहरातच रहावे.

राष्ट्रपतींना मात्र या राजवाड्यातच उतरायचे होते.

सदर राजवाडा शहराबाहेर एका टेकडीवजा जागेवर होता. तेथे जाणारे रस्ते फारसे वापरात नसल्यामुळे खराब झाले होते. त्या मंत्र्याने डॉ. प्रसाद यांना सांगितले की, “आपणास तिथे राहायचे असेल तर, रस्त्यांच्या दुरुस्ती पासून कामाला प्रारंभ करावा लागेल”.

हा प्रकार पं. नेहरूंच्या कानी आला. त्यांनी मंत्र्यांचे म्हणणे मान्य केले आणि म्हणाले, “हे पहा आपण आपल्या चौकटीत राहायला हवे. हैदराबादच्या  सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या म्हणण्यानुसार ते रस्ते दुरुस्तीपलीकडे गेले आहेत जर राष्ट्रपतींनी तिथे राहायचा आग्रह धरला तर तेथील प्रशासनावरही ताण पडेल तो. सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्था असा अनावश्यक ताण पडेल तो वेगळा. असे सांगून त्यांनी राष्ट्रपतींच्या सचिवाला हे सगळे राष्ट्रपतींच्या कानावर घालण्यास सांगितले.

या सचिव ही परिस्थिती राष्ट्रपतींना सांगायला आले तेंव्हा राजेंद्रप्रसाद त्यांच्या खोलीत कसलीशी फाईल शोधत होते. सचिवाने दिलेली ही माहिती ऐकून त्यांनी आपले डोके वर केले व शांतपणे म्हणाले, “त्या रस्त्याच्या दुरुस्तीवर व पुनर्बांधणी वर जो खर्च होईल त्यामुळे गरीब मजुरांना रोजगार मिळेल त्यामुळे यात पैशांचा अपव्यय आहे तरी कुठे? म्हणून त्याच राजवाड्यात मी वास्तव करणार हे ठरलंय !

पंडित नेहरू यांची नेहमीच एक तक्रार असायची कि, राजेंद्र प्रसाद आपल्या दौर्‍यात बराच मोठा लवाजमा नेतात.

नेहरू अनेकदा राजेंद्रप्रसाद यांना यावरून टोमणे मारायचे, “ब्रिटिश काळात एक म्हण प्रसिद्ध होती, ‘रॉयल नेव्हीत या नी सारं जग पहा’, आता आपल्याकडे एक नवीन म्हण काढावी लागेल की, “राष्ट्रपती बरोबर रहा नी सारा भारत देश पहा”.

काटकसरीबाबत तुमचे दुर्लक्ष होऊ लागले आहे की काय असे नेहरू राष्ट्रपतींचे सचिव बिमानेश चॅटर्जी यांना नेहमीच म्हणत. या साऱ्या आठवणी खुद्द भिमानेश यांनी त्यांच्या ‘द प्रेसिडेंटशियल प्रेडिक्टमेंट’ या पुस्तकात नोंदवल्या आहेत.

राष्ट्रपतींच्या भल्यामोठ्या लवाजम्यामुळे राज्याच्या प्रशासनाची नेहेमीच पंचाईत होत असायची. तसे गाऱ्हाणेही, त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नेहरूं जवळ मांडले होते. नेहरूंनी सूचना केली की, “दौऱ्यात एकदोन एडीसी, एक खाजगी सचिव, सहा सहाय्यक एवढे लोक राष्ट्रपतींच्या दिमतीला पुरे आहेत”.

पंतप्रधानांच्या सूचनेनंतर चॅटर्जी यांनी राष्ट्रपती यांच्या एका दौऱ्याच्या वेळी मूळच्या यादीतील काही लोकांची नावे वगळली आणि ते राष्ट्रपतींना ते कळले. त्यांनी चॅटर्जी यांना बोलावून घेतले. त्यांच्याकडून सगळी हकीकत समजून घेतली. तेव्हा राष्ट्रपती म्हणाले, ” काही सरकारी खात्यात जी खैरात चालते तिला काही या काटकसरीने आळा बसणार नाही”.

त्यानंतर याच मुद्द्यावर राष्ट्रपती व पंतप्रधान यांची प्रत्यक्षात बोलणी झाली. त्यावेळी नेमके काय झाले याचा तपशील उपलब्ध नाही पण त्या भेटीनंतर पं. नेहरू रागारागाने भवनातून बाहेर पडले, तर राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद अस्वस्थ दिसत होते.

चॅटर्जी आत गेले, तेंव्हा राष्ट्रपती म्हणाले, देशाच्या राष्ट्रपतीने एक सचिव एक लघु लेखक एवढ्यानांच बरोबर घेऊन दौरे करायचे नसतात. माझ्या दौऱ्याच्या तरतुदीत काहीही बदल करण्याची आवश्यकता नाही.

त्यानंतर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या मनासारखेच खर्चिक दौरे केले परंतु त्यात पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे कसलाही बदल केला नाही.

नेहरूही संधी मिळेल तसं राजेंद्रप्रसाद यांना टोमणे मारायचे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर जाणाऱ्यांची यादी पाहून एकदा पंतप्रधान नेहरूं टोमणा मारत म्हटले होते, ” काय मग यावेळी काही यात्रा स्पेशल वगैरे द्यायचा विचार आहे की काय? मला असे दिसते की प्रत्येक यात्रास्थळी त्यांचा मुक्काम आहे. जर देशातील फक्त एका व्यक्तीला मिळालेल्या सर्वोच्च स्थानामुळे देशाला त्यांचा आशीर्वाद मिळणार असेल तर, अशा यात्रांसाठी खास तरतुदी झाल्याच पाहिजेत त्यासाठी गरज भासली तर स्वतंत्र अशी टाकसाळ उघडायला ही हरकत नसावी. 

अशाप्रकारे पं. नेहरूंनी राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या प्रत्येक दौऱ्याबाबत हरकत घेतलेली दिसून येते. त्यांचा कोणताही दौरा लगेचच मंजूर झाला नाही. परदेश दौरे व परदेश विषयक धोरण याबाबत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या मनात सदैव एक खंत राहून गेली.

पं. नेहरूंनी परराष्ट्र धोरण यापासून त्यांना नेहमीच दूर ठेवले त्याच प्रमाणे भारताला भेटी देणाऱ्या विविध परराष्ट्रीय नेत्यांबरोबर चर्चा पासूनही पंतप्रधानांनी आपल्याला जाणीवपूर्वक दूर ठेवले अशी तक्रार खुद्द राजेंद्रप्रसाद यांनी ऐकी ठिकाणी केली होती.

हे ही भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.