ज्या पिक्चरमध्ये जीव तोडून काम केलं, त्याच्याच प्रीमिअरला जायला राजेश खन्ना घाबरत होता…

दिग्दर्शक सावनकुमार टाक यांना सुपरस्टार राजेश खन्नाला घेऊन एक चित्रपट बनवण्याची खूप इच्छा होती. सत्तरच्या दशकात जेव्हा राजेश खन्ना करियरच्या सर्वोच्च पदावर होते त्यावेळी एकदा सावनकुमार राजेश खन्ना यांना भेटले आणि एक चित्रपट बनविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी चित्रपटाचे कथानक देखील ऐकवले.

राजेश खन्नाला कथानक आवडले. परंतु त्याने त्याची डायरी त्यांच्यासमोर ठेवली आणि “डायरी खाली नाही!” असे सांगून त्यांना परत पाठवले.

काळ बदलला. दिवस पालटले . ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला राजेश खन्ना यांचे अनेक चित्रपट लागोपाठ फ्लॉप होत गेले. बंदिश, फिफ्टी-फिफ्टी, अमरदीप, अशांती. 

त्यावेळी राजेश खन्नाला सावनकुमार यांची आठवण झाली.

सावनकुमार यांना भेटून त्याने त्यांच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सावनकुमार यांनी लगेच चित्रपटाची सुरुवात केली. टीना मुनीम हिला नायिका म्हणून घेतले तर दुसरी नायिका म्हणून पद्मिनी कोल्हापुरेला घेतले. चित्रपटाचे संगीत उषा खन्ना यांनी दिले होते. 

हा चित्रपट मॉरिशसमध्ये चित्रित झाला होता. चित्रपट होता ‘सौतन’. 

लागोपाठ चित्रपटांना मिळणाऱ्या अपयशामुळे राजेश खन्ना मनातून ‘सौतन’ या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी देखील खूप घाबरला होता. न जाणो हा चित्रपट देखील फ्लॉप होतो की काय अशी त्याला कायम भीती वाटत होती. म्हणून त्याने या चित्रपटाच्या ट्रायलला त्याचे जुने मित्र शक्ती सावंत आणि रामानंद सागर यांना बोलावलं.

यावर दिग्दर्शक सावन कुमार खूप चिडले कारण आपला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या ऐवजी आधीच दुसऱ्या दिग्दर्शकांना दाखवणं त्यांना अजिबात आवडलं नव्हतं पण तरी त्यांनी राजेश खन्नाच्या विनंतीला मान देऊन चित्रपटाची ट्रायल ठेवली.

इंटरव्हल पर्यंत सर्व ओके होतं. परंतु त्यानंतर चित्रपट संपल्यानंतर राजेश खन्ना , शक्ती सावंत आणि रामानंद सागर हळूहळू आवाजात कुजबुजू लागले. सावनकुमार यांच्या ते लक्षात आले; काहीतरी बिघडले आहे.

दुसऱ्या दिवशी राजेश खन्ना सावनकुमार यांच्याकडे आल्यानंतर म्हणाला,” या सिनेमाचा क्लायमॅक्स आपण बदलूया. चित्रपटात शेवटच्या पाच मिनिटात एक गाणं सुरू होतं. ‘मै तेरी छोटी बहना हू…’  आणि ही गोष्ट अतिशय चुकीची आहे ते गाणं आपण एक तर आधी घेऊ किंवा सिनेमातून काढून टाकू!”

सावन कुमार म्हणाले ,”बॉस, आता हे शक्य नाही कारण माझ्या ओव्हरसीजच्या प्रिंट्स ऑलरेडी गेलेल्या आहेत त्यामुळे आता यात बदल होणे शक्य नाही आणि हे गाणे (मै तेरी छोटी बहना हूं समझ ना मुझको सौतन) तुम्हाला खूप आवडत होते. तुम्ही हे गाणे चित्रपट घेण्यासाठी खूप आग्रही होतात. त्यामुळे आता यात बदल होणे शक्य नाही!”

त्यावर राजेश खन्ना खूप चिडला आणि म्हणाला, “तुम्हाला काय करायचे ते करा” त्यावर सावनकुमार यांनी सांगितले, “आणखी दोन दिवसांनी दिल्लीला या सिनेमाचा प्रीमियर आहे.” त्यावर राजेश खन्नाने  गुश्श्यातच सांगितले, “मी प्रीमियर ला येणार नाही!” सावनकुमार यावर ठीक आहे म्हणून एकटेच दिल्लीला निघून गेले.

दोन दिवस राजेश खन्ना यांचा काहीही फोन आला नाही. पण प्रीमियरच्या दिवशी दुपारी मुंबईहून राजेश खन्नाचा फोन आला, “मी दिल्लीला यायला निघतोय!” त्याप्रमाणे राजेश खन्ना दिल्लीमध्ये आले आणि हॉटेलमध्ये दिग्दर्शक सावनकुमार यांना भेटले.

पुन्हा त्यांना चित्रपटाच्या प्रीमियरच्या आधी नर्वस वाटू लागले आणि त्यांनी सावनकुमार सांगितले , “मी प्रीमियर ला येणार नाही तुम्ही जा.” परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांची जी भीती, अपयशाची शंका,असे नकारात्मक विचार येत असतात तशी अवस्था राजेशची झाली होती.

खूप मेहनतीने त्याने यातली भूमिका केली होती. कारण लागोपाठ सात ते आठ सिनेमे त्याचे फ्लॉप झाले होते. ‘सौतन’ हा सिनेमा त्याने खूप मनापासून केला होता आणि या चित्रपटाला जर पुन्हा अपयशाचा सामना करावा लागला तर त्याच्यासाठी हा फार मोठा ‘सेटबॅक’ असणार होता! त्यामुळे तो खूप नर्वस होता.

मनातून प्रीमियरला जावे तर वाटत होते पण अपयशाची भीती सारखी डोके वर काढत होती. काय करावे? पण शेवटी प्रीमियरला जायला राजेश खन्ना तयार झाला! दोघेही प्रीमियरला निघाले.

थेटरपाशी पोहोचले. तेव्हा राजेश खन्नाच्या फॅन्सनी इथे खूप गर्दी केली होती. सगळ्यांनी राजेश खन्नाला पाहून खूपच आनंद व्यक्त केला आणि त्याच्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्याची गाणी, डॉयलॉग जोरजोरात म्हणू लागले. राजेश खन्नाला हे सर्व नवीन होतं. अनपेक्षित होतं! 

राजेश खन्ना चित्रपट पाहायला आत गेला तेव्हा त्याच्या प्रत्येक डायलॉगवर पब्लिक जाम खुश होते.  राजेश खन्ना मनातून खूप आनंद होत होता. इंटरव्हलला त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि इंटरव्हलमध्ये तो स्वतः स्क्रीनच्या समोर जाऊन उभा राहिला आणि त्याने प्रेक्षकांना अभिवादन केले.

प्रेक्षकांचा गोंगाट आणखी वाढला. प्रत्येकजण राजेश खन्नाला भेटायला इच्छुक होता. सिक्युरिटीने राजेश खन्नाला बाहेर काढले. चित्रपट पुन्हा सुरू झाला. राजेश खन्नाला पुन्हा चित्रपट पाहायचा होता. पण आता सिक्युरिटीने सांगितले की आता तुम्हाला सिनेमा पाहता येणार नाही कारण लोकांच्या लक्षात आले आहे की तुम्ही थिएटरमध्ये आहात! शेवटी राजेश खन्नाने बाल्कनीत उभे राहून संपूर्ण सिनेमा पाहिला.

जे गाणे सिनेमातून काढून टाका असा तो आग्रह करत होता त्या गाण्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

चित्रपट सुपर हिट होणार हे त्याच्या लक्षात आले. चित्रपट संपायच्या आतच राजेश खन्ना पुन्हा आपल्या गाडीत येऊन बसला आणि हॉटेलवर पोहोचला!

संपूर्ण भारतात या सिनेमाने प्रचंड बिजनेस केला. राजेश खन्नाचा तो पुन्हा कमबॅक करणारा असा सिनेमा ठरला. १९८३  हे वर्ष राजेश खन्ना साठी तसे खूप लकी होते. कारण यावर्षी त्याचे तीन चित्रपट सुपरहिट ठरले अवतार, अगर तुम ना होते आणि सौतन!

३ जून १९८३ रोजी संपूर्ण भारतात ‘सौतन’ प्रदर्शित झाला आणि बंपर हिट झाला.’शायद मेरी शादी का खयाल …’ हे गाणे तर त्या वर्षीचे सुपर हिट गाणे ठरले. बिनाका गीत माला ते पहिल्या क्रमांकावर होते.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू: 

Leave A Reply

Your email address will not be published.