ती त्याच्या आयुष्यात आली तो सुपरस्टार झाला. ती गेली ते त्याच स्टारडम घेऊनच..
राजेश खन्ना उर्फ काका . याच्या सुपरस्टारपणाचे किस्से आजपण लोकांच्या साठी दंतकथा आहेत .
आज आज्ज्या झालेल्या तेव्हाच्या तरुणी राजेश खन्नासाठी वेड्या झाल्या होत्या. काही काही जन म्हणतात की मुंबईमध्ये फिल्मसिटी मध्ये त्याची पांढरी इम्पाला कार उभी असली तर फॅन्स राजेश खन्ना समजून त्या कारलाच कीस करायच्या. मुलींच्या लाल लिपस्टिक मूळं पांढरी इंम्पाला लाल होऊन जायची.
रोज येणारे रक्ताने लिहिलेले लव्ह लेटर वेगळेच. एवढ क्रेझी भक्त मोदीजींचे पण नसतील पण काकाचे होते.
असा हा बॉलीवूडचा खऱ्या अर्थाने स्टारडम भोगलेला पहिला सुपरस्टार. अख्खा भारत त्याच्यामागे वेडा होता मात्र तो एका मुलीसाठी वेडा होता. तुम्ही म्हणाल माहित आहे तीच नाव. काकाची बायको आणि अक्षयकुमारच्या सासू बाई डिंपल कपाडिया.
गलत जवाब.
तीच नाव आहे अंजू महेंद्रू. काय? ये नाम तो पेहले कभी नही सुना?
अंजू महेंद्रू मुंबईमधली एक मॉडेल होती.दिसायला भारी तर होतीच पण काळाच्या मानानं बोल्ड आणि बिनधास्त पण होती. एकेकाळी वेस्ट इंडीजचा लिजेंडरी आॅल राउंडर आणि कप्तान सर गॅरी सोबर्स हा तिच्या प्रेमात पडला होता.
मुंबईच्या एका पार्टीमध्ये डान्स करताना दोघांची एकमेकांशी ओळख झाली, गोष्ट एवढी वाढली की दोघांनी एकमेकांशी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. आपल्या भाषेत सांगायचं तर सतरा वर्षाची अंजू आणि गॅरी यांचा साखरपुडा झाला. पण गॅरी परत गेला वेस्ट इंडीजला आणि अंजूला तिकड जायचं नव्हत. त्यामुळ सगळ बारगळलं.
मग झाली आपल्या काकाची एन्ट्री.
काका तेव्हा अजून सुपरस्टार राजेश खन्ना झाला नव्हता. त्याचं खर नाव जतीन खन्ना. फिल्मफेअरची टॅलेंट हंट स्पर्धा जिंकल्यामुळे त्याला फिल्ममध्ये चान्स मिळाला होता. अजून त्याचे स्ट्रगल सुरु होते.
बंधन नावाच्या फिल्मच्या सेटवर त्याला अंजू भेटली. तिचा सिनेमामध्ये छोटा रोल होता. पण इंग्लिश मध्ये फाडफाड बोलणारी ही टंच पोरगी काकाला खूप आवडली. रीतसर दोघे प्रेमात पडले. अंजूशिवाय त्याचं पान हलेना झालं.
बंधन बरोबरच त्याच सुमारास राजेश खन्नाचा आणखी एक सिनेमा रिलीज झाला नाव होत,”आराधना”.
आराधना गाजला. नुसता गाजला नाही तर या पिक्चरने धुमाकूळ घातला. या पिक्चरने भारतीय फिल्म इंडस्ट्री ला तीन सुपरस्टार दिले. राजेश खन्ना, किशोर कुमार आणि आर डी बर्मन.
“मेरे सपनोंकी राणी कब आयेगी तू”
डोळे मिचकावून मान हलवत गाणं गाणारा हा गुलछबु राजेश खन्ना सगळ्यांना आवडला.
अंजू त्याच्या आयुष्यात आली आणि काकाचे अच्छे दिन आले. एका पाठोपाठ एक असे नऊ सिल्व्हर ज्युबली सिनेमे त्याने दिले. त्याच्या घराबाहेर मुली ठाण मांडून बसू लागल्या. पण ज्याची वाट त्या बघायच्या तो काका असायचा अंजूच्या घरात.
अंजू बॉम्बे गर्ल होती. अनेक उच्चभ्रूच्या पार्ट्या मध्ये तिची उठबस असायची. तिचं मॉडेलिंग पण भारी चाललेलं. दिवसाला ती चाळीस सिगरेट ओढायची. राजेश खन्नाला हे सगळं आवडायचं नाही. अंजूला त्याने मॉडेलिंग वगैरे सोडायला लावलं. त्याच्यासाठी तिने दोन सिनेमेदेखील सोडले.
राजेश खन्नाने आता तिच्या मागे आपण लग्न करू म्हणून लकडा लावला. अंजूला ही त्याच्याशी लग्न करायचं होत पण तिला त्याचं ओव्हरपझेसिव्ह असण थोडं खटकायचं.
एक दिवस दोघांच तिचा खास मित्र संजीव कुमार याच्या वरून जोराचं भांडण झालं. त्यानं तिच्या मॉडर्न कपड्यावरही तोंडसुख घेतलं. अंजूला वाटलं हा सुपरस्टार राजेश खन्ना आपल्याला नकोय. आपण प्रेम करत असलेला जुना जतीन खन्ना आता उरला नाही.
दोघांच ब्रेक अप झालं.
राजेश खन्नाच्या डोक्यात त्याच्या यशाने आणि स्टारडम ने हवा भरली होती. तिरमिरीत येऊन त्याने आपल्यापेक्षा पंधरा वर्षाने लहान असलेल्या सोळावर्षीय डिम्पल कपाडिया बरोबर लग्न केले. राजेश खन्नानं मुद्दाम आपल्या लग्नाची वरात अंजूच्या घरासमोरून वाजतगाजत नेली.
डिम्पलचा अजून पहिला सिनेमा बॉबी रिलीज व्ह्यायचा होता. लग्नानंतर तो रिलीज झाला, सुपरहिट झाला. त्यान बॉबी नंतर तीच पिक्चर मध्ये काम करायचं बंद केलं. काका या बोल्ड आणि ब्युटीफुल छोट्या पोरीत अंजूलाच पाहत होता.
तिथून अंजूच त्यान सोळा वर्ष तोंड पण बघितलं नाही. त्यांच ब्रेक अप झालं पण अंजू महेंद्रूनं त्यानंतर कधीच कोणाशी लग्न केलं नाही.
ज्या संजीव कुमारमूळ त्यांच ब्रेकअप झालं होत त्याच्यावर राजेश खन्नाचा विशेष राग होता. एकदा आप की कसम या पिक्चरमध्ये दोघे एकत्र आले त्यावेळी एका सीन मध्ये राजेश खन्नाला संजीव कुमारला थोबाडीत मारायची होती. त्याने जुना राग काढून एवढ्या जोरात संजीव कुमारला कानाखाली मारली की काही वेळा साठी त्याचा कान बंद झाला.
या दरम्यानच्या काळात राजेश खन्नाचा अॅरोग्न्स टोकाला पोहचला होता. पण जशी अंजू त्याच्या आयुष्यातून गेली तसं त्याच्या करीयरची नौका पण बुडायला सुरवात झाली.
सत्तरच्या दशकात नव्या सुपरस्टारचं आगमन झालं होत. नाव अमिताभ बच्चन .त्या अँग्री यंग हिरोच्या अॅक्शनच्या वादळात राजेश खन्नाचा नाजूक हिरो उडून गेला.
राजेश खन्नाचे पिक्चर पडू लागले. त्याचं आणि त्यची बायको डिंपलच घरगुती भांडण सुरु झालं. अल्लड वयाची डिंपल आपल्या दोन्ही मुलीना घेऊन घर सोडून निघून गेली. काका दारूच्या नादी लागला. त्याचे अनेक अफेअर्स सुरु होते. यात टीना मुनीम बरोबरच अफेअर सगळ्यात जास्त गाजलं.
काही वर्षात राजेश खन्ना फिल्म इंडस्ट्री साठी इतिहास झाला.
इकडे अंजू अजूनही त्याची वाट बघत होती. नव्वदच्या दशकात दोघे परत एकत्र आले. उतरत्या वयात राजेश खन्नाला कोणाची तरी साथ हवीच होती. अंजू राजेश खन्ना बरोबर लिव्ह इन रिलेशन मध्ये राहू लागली.
कसोटी जिंदगी की सारख्या टीव्ही सिरीयल मधून तिन अभिनयामध्ये देखील सेकंड इनिंग सुरु केली. राजेश खन्नाला तिनं आधार दिला. त्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तिने देखभाल केली. १८ जुलै २०१२ रोजी काकाच्या जाण्यान त्यांच्या अनाम लव्ह स्टोरीला कायमचा फुलस्टॉप मिळाला.
हे ही वाचा भिडू.
- करियअरची सुरवात एका अपमानापासूनच होते, किशोरकुमारचं देखील तसंच झालं !
- मायानगरीत येणारा प्रत्येकजण सुपरस्टार बच्चन होत नाही, काही जण गुरबचन सुद्धा होतात !
- तर रजनीकांत हवेत सिगरेट उडवू शकला नसता !
- या पिक्चरमधून त्याला बाहेर काढलं नसत तर तो आज बच्चन नसता !