त्या दिवशी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवत राहिले आणि राजेश पायलट यांचा जीव वाचला..

राजेश पायलट. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री. त्यांची दुसरी ओळख करून द्यायची झाली तर अगदी आडनावात ते कोण होते हे कळून येते. दिल्लीत दूध वाटण्यापासून सुरु झालेला प्रवास, त्यांना अभ्यास आणि मेहनतीने एअरफोर्समध्ये घेऊन गेला. इथं त्यांनी १९७१ च भारत-बांगलादेश विरुद्धच युद्ध देखील लढलं.

एअरफोर्समध्ये असतानाच १९७९ च्या दरम्यान पायलट यांची नियुक्ती एग्रीकल्चर एविएशन विंग मध्ये होती. दिल्लीच्या सफदरजंगमधून उड्डाण करत विमानाने पहाडी भागातील पिकांवर कीटकनाशक फवारण्याचा काम असायचं.

याच सफदरजंगमधून संजय गांधी देखील विमान उड्डाण करायचे. त्यावेळी पायलट आणि गांधी दोघांची एकमेकांशी ओळख आणि मैत्री झाली. पुढे पायलट राजकारणात आले तेव्हा १९८० च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशच्या बागपत मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण संजय गांधी यांनी मात्र आपल्या मित्राला राजस्थानच्या भरतपूर या सुरक्षित मतदारसंघातून निवडणुकीत उतरवलं आणि निवडून देखील आणलं. 

दोघांच्या याच मैत्रीमुळे ज्या दिवशी विमान अपघातात संजय गांधी यांचा मृत्यु झाला होता त्या दिवशी विमानात सोबत बसण्यासाठी संजय यांनी राजेश पायलट यांना बोलावलं होतं.

पण त्यादिवशी राजेश पायलट यांचा जीव वाचवला तो काही शेतकऱ्यांनी. 

संजय गांधी जसे एक निष्णात राजकारणी होते तसेच वेल ट्रेन पायलट देखील होते. १९७६ मध्ये त्यांना कमी वजनाची विमाने उडविण्याचा परवाना मिळाला होता. आणीबाणी नंतर मोरारजी देसाई सरकारने त्यांचा हा परवाना रद्द केला होता. मात्र इंदिरा गांधी सत्तेत आल्यावर हा परवाना पुन्हा मिळाला.

मे १९८० मध्ये इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी संजय यांच्यासाठी ‘पिट्स एस २ए’ विमान भारतात आणले. या विमानाची जोडणी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळावर करून दिल्लीच्या फ्लाईंग क्लबला सोपविण्यात आले होते.

संजय गांधी यांना त्याचवेळी या विमानाची चाचणी करायची होती. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना याची परवानगी मिळाली नाही.

२० जून १९८० रोजी फ्लाईट इन्स्ट्रक्टरने विमानाचे यशस्वी उड्डाण केले.

त्यानंतर २१ जून रोजी संजय यांनी पहिल्यांदा हे विमान उडवले. २२ जून रोजी त्यांनी पत्नी मनेका गांधी, आई इंदिरा गांधी, आर. के. धवन आणि धीरेंद्र ब्रह्मचारी यांना घेऊन जवळपास ४० मिनिटे उड्डाण केले.

त्याच दिवशी संजय गांधींनी राजेश पायलट यांना फोन केला. 

संजय गांधी – राजेश, उद्या आपण उड्डाण करणार आहोत. एक नवीन मशीन आली आहे, पिट्स एस 2ए. खूपच हलकं आहे. रंग देखील चमकदार लाल आहे. सकाळी सफदरजंगवर भेटूया.

राजेश पायलट – बॉस, उद्या सकाळी तर मेरठवरून काही शेतकरी त्यांचे प्रश्न घेऊन मला भेटायला येणार आहेत. त्यांनी बऱ्याच दिवसांपूर्वी वेळ घेऊन ठेवली आहे. त्यामुळे उद्याच अवघड आहे थोडं.

संजय गांधी-  ते मला बाकी काही माहित नाही. आपण उद्या सकाळी भेटतोय.

राजेश पायलट- नो प्रॉब्लम बॉस.

२३ जूनचा दिवस. 

राजेश पायलट यांनी शेतकऱ्यांना भेटून, त्यांचे प्रश्न समजावून घेत त्यावर पुढील कार्यवाही करण्यासाठी पीए ना आदेश दिले. आणि ड्रायव्हरला बोलवण्यास सांगितले, पण तो पर्यंत तिकडे दिल्लीच्या फ्लाईंग क्लबचे चीफ इन्स्ट्रक्टर आणि त्यांचे सहवैमानिक सुभाष सक्सेना यांच्यासह संजय गांधी यांनी हवेत उड्डाण घेतले होते. 

पण त्यानंतर देखील पायलट गडबडीने ड्रायव्हरच्या गाडी काढण्याची वाट न बघता, टॅक्सीने जाण्यासाठी बाहेर पडले, मात्र या सगळ्यामुळे आपल्याला पोहोचायला वेळ होईल हे सांगण्यासाठी ते पुन्हा एकदा घरी आले. फोनकडे जाणार तेवढ्यात बाहेर काही तरी मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला.

राजेश यांना पहिल्यांदा कार अपघात वगैरे वाटलं, पण तिकडे दुर्लक्ष करत त्यांचं लक्ष घड्याळाकडे गेलं.

तेवढ्यात फोन वाजला. संजय गांधी यांच्या बाबतीत माहिती सांगणारा तो फोन होता. उड्डाणानंतर २० मिनिटांच्या आतच हवेत तीनदा सूर मारल्यानंतर चौथा मारताना संजय यांचा विमानावरील ताबा सुटला आणि ते पंतप्रधानाच्या घराजवळीच एका झाडावर कोसळले. 

या दुर्दैवी घटनेत संजय गांधी आणि सुभाष सक्सेना मारले गेले होते.

पण जर त्यादिवशी राजेश यांची मेरठच्या त्या शेतकऱ्यांसोबत बैठक नसती तर कदाचित सुभाष यांच्या जागी विमानामध्ये ते बसलेले असले असते. आणि त्याचवेळी त्यांचा देखील अपघाती मृत्यु झाला असता. पण वाचले होते. 

पुढे २० वर्षानंतर म्हणजेच २००० मध्ये मात्र त्यांचे कार अपघातात निधन झाले. या काळात ते ६ वेळा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. राजीव गांधी आणि नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. संजय, राजीव गांधी आणि राव यांच्या निकटवर्तीय मोजक्या लोकांच्या यादीतील पाहिलं नाव. त्यानंतर ते सोनिया गांधीच्या देखील विश्वासातील बनले होते.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.