ते वार्षिक अडीच हजार कोटींची उलाढाल करणारे भारताचे पहिले दलित उद्योजक आहेत
दलित या शब्दाची गरज आहे का? एक माणूस सर्वसाधारण कुटूंबातून पुढे आला आणि इतका श्रीमंत झाला तर त्याच्या जातीचा उल्लेख करुन जातीयवाद करण्याची गरज आहे का?
मध्यंतरी दलित समाजातून आलेला हा मुलगा भारताचा १०० विकेटस घेणारा पहिला फास्टर बॉलर ठरला ! अशी स्टोरी बोलभिडूवर प्रकाशित करण्यात आली होती. इथेही दलित समाजातून आलेला असा उल्लेख करण्याची गरज काय असा प्रश्न विचारण्यात आला होता, या स्टोरीची हेडलाईन वाचून देखील असाच प्रश्न परत विचारला जाईल म्हणून मुद्दामहून एक गोष्ट सांगू वाटते.
ती म्हणजे जातीयवाद म्हणजे काय, शेतकऱ्यांच्या मुलाने केलेली किमया किंवा रिक्षावालाचा मुलगा असा उल्लेख करुन यशाचे दाखले दिले जातात तेव्हा त्याच्या पार्श्वभूमीला दुखावण्याचा हेतू नसतो तर त्याच पद्धतीच्या पार्श्वभूमीत आज जगणाऱ्या, स्वप्न पहाणाऱ्या मुलांना याने केलं तर तुम्हीही करू शकता हे दाखवण्याचा उद्देश असतो.
राहता राहिला विषय तर जातीचा तर तो उल्लेख करायला हवा कारण आजही जातीव्यवस्थेचा सामना कराव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रात काहीतरी करु पाहणाऱ्यांना यामुळे इन्स्पेरेशन मिळावं, तो करू शकतो तर मी देखील करू शकतो इतकच…
असो तर मुळ विषयावर येवुया,
राजेश सरैया अस त्यांच नाव स्टील क्षेत्रात आज कित्येक देशात नावारुपास आलेल्या स्टील मोंट या कंपनीचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आज त्यांनी निर्माण केलेलं विशाल साम्राज्य पाहीलं तर कोणाला पटणार देखील नाही ते एका गरिब, हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेले आहेत.
राजेश यांचा जन्म उत्तरप्रदेशातल्या सीतापूर जिल्ह्यातल्या सैनी गावचा. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. आपल्या मुलांने खूप शिकावे आणि प्रगती करावे हे त्यांच्या डोक्यात पक्क भिनलेलं होतं. इतकं की त्या काळात आपल्या मुलाचं नाव देखील त्याला शोभणारं असावं असा विचार करून त्यांनी १९६९ साली आपल्या मुलाचं नाव राजेश ठेवलं.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात चमकणारा राजेश पुढे देहरादूनला गेला. तिथे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्या काळात म्हणजे १९९० च्या काळात तो रशियाला एअरोनॉटिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी गेला.
शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्याला चांगल समजून चुकलं होतं. शिक्षण पुर्ण होताच एका खाजगी कंपनीमध्ये ते काम करु लागले. कामाचं स्वरुप म्हणजे इंटरनशिप होती. हाताला थोडेच पैसै शिल्लक रहात होते पण शिकायला खूप काही मिळत होतं.
त्यानंतर ते निप्पोन इस्पात या कंपनीत नोकरीला लागले. या कंपनीचे मालक होते ते लक्ष्मी मित्तल. अशा या बलाढ्य कंपनीत उद्योजकतेचे धडे ते गिरवू लागले.
१९९३ साली म्हणजे साधारण शिक्षणाच्या दोन तीन वर्षातच त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कंपनीचं नाव स्टील मोंट. कंपनीची आजची गोष्ट सांगायची झाली तर एकूण ८० हून अधिक देशात कंपनीचं नाव आहे. स्टील, इतर धातू, कोळसा, खनिज, कृषिविषयक माल अशा विविध क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या मालाच्या पुरवठ्यासह स्टील क्षेत्रातील इतर उद्योगांना अर्थसहाय्य, मालाचा पुरवठा, लॉजिस्टिक, शिपिंग अशा सेवा कंपनीमार्फत ग्राहकांना देण्यात येत आहेत.
या कंपनीची स्थापना करण्यात आली ती भारतापासून हजारो किलोमीटर दूर युक्रेनमध्ये. कंपनीचे सर्व व्यवहार पार पाडले जातात ते लंडनमधून. गेल्या २५ वर्षापासून बाहेर असणारे राजेश मात्र भारतीय पासपोर्ट खिश्यात बाळगून राहणारे खरे भारतीय असल्याचं प्रत्येकाला सांगत असतात.
आज राजेश हे दलित समाजातून येणाऱ्या कित्येक युवकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. ते सांगतात गरिब म्हणून जन्माला येणं हा गुन्हा नाही पण गरिब म्हणून मरणं हा गुन्हा आहे. भारत सरकारने २०१४ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं आहे.
त्यापूर्वी त्यांनी प्रवासी भारतीय पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे. दलित इंडियन चेंबर ऑऱ कॉमर्स इंडस्ट्रीज मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला होता. कंपनीचा टर्नओव्हर सांगायचा तर तो वार्षिक अडीच हजार कोटींच्या घरात जातो. म्हणूनच त्यांना भारताचा पहिला दलित अब्जाधिश म्हटलं जातं.
हे ही वाच भिडू
- दलित कुटुंबातून आलेल्या पैकाबाई भारतातल्या पहिल्या महिला उद्योजिका होत्या.
- मायावतींच्याही आधी देशभरात दलित राजकारणाचं नेतृत्व शांताबाईंनी गाजवलं होतं
- MSEB चा पाया देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून रचण्यात आलाय.