राजीव गांधींनी अडवाणींना आग्रह धरला होता की १० जनपथ निवासस्थान तुम्ही घ्या.

काँग्रेसच्या नेत्यांना कोणताही निर्णय घ्यायला सांगितला तर ते दिल्लीतल्या १० जनपथ रोड या बिल्डिंगकडे बघतात. काँग्रेसवासीयांचे सुखदुःखाचे प्रश्न या दस जनपथवरून सोडवले जातात असं म्हटलं जातं. पक्षाचे देशातील सर्वात मोठे पॉवर सेंटर म्हणून या इमारतीकडे बघितलं जातं. अनेक दिग्गज नेते इथून आपल्याला बोलावणं यावं म्हणून चातकाप्रमाणे वाट बघत असतात.

आता कोणा अडाण्याला वाटेल की १० जनपथ हे काँग्रेसचे ऑफिस मुख्यालय वगैरे असेल. तर तस नाही. काँग्रेसचे ऑफिस २१ अकबर रोडवर आहे. मग काय आहे हि बिल्डिंग ? असं कोणतं महत्व १० जनपथला आहे?

या घराचं महत्व म्हणजे हे घर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचं अधिकृत निवासस्थान आहे. आलिशान ल्यूटन्स दिल्लीच्या हृदयस्थानी असलेल्या या सरकारी बंगल्याला ऐतिहासिक महत्व आहे.

तस बघायला गेलं तर हा पंतप्रधान निवासस्थानापेक्षाही मोठा बंगला आहे. लालबहादूर शास्त्री यांच्याकाळात या बंगल्याचा उपयोग पंतप्रधान निवासस्थान म्हणून देखील करण्यात आला. मात्र शास्त्रीजींच्या अकाली निधनानंतर पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधींनी आपले निवासस्थान सफदरजंग रोड येथे हलवले. पुढे अनेक मोठमोठे नेते या बंगल्यात राहिले.

आज जे पंतप्रधान निवासस्थान आहे ते ७ लोककल्याण मार्ग राजीव गांधींच्या काळापासून प्रधानमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान बनले. मात्र या बंगल्याचा आकार १० जनपथ पेक्षा खूप लहान आहे. दिल्लीचा विचार केला तर राष्ट्रपती भवन आणि नेहरूंचे स्मृतिस्थळ असलेले तीन मूर्ती भवन या महत्वाच्या बंगल्याच्या खालोखाल आकाराने सर्वात मोठी बिल्डिंग म्हणजे १० जनपथ.

एवढी महत्वाची इमारत सोनिया गांधींचे निवासस्थान कधी बनली ?

१९८९ साली जेव्हा राजीव गांधींची सत्ता गेली तेव्हा त्यांच्या जागी पंतप्रधान म्हणून व्ही.पी.सिंग यांनी शपथ घेतली. राजीव गांधी यांना ७ रेसकोर्स रोड हे निवासस्थान सोडावे लागले. आता पंतप्रधान राहिलेल्या व्यक्तीला तितकाच तुल्यबळ बंगला द्यावा लागणार म्हणून व्ही.पी.सिंग यांनी त्यांना १० जनपथ रोड हा बंगला दिला. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी या कुटूंबासह राजीव गांधी तिथे राहायला गेले.

या बंगल्याच्या परिसरात मोठी जागा असल्यामुळे राजीव गांधी यांना असलेली एसपीजी कमांडोजची सुरक्षा व्यवस्थेची सोय देखील येथे करता येऊ शकत होती.

ते जवळपास २ वर्षे इथे राहिले. काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी राजीव गांधींनी प्रयत्न या बंगल्यात राहूनच केले. ते या काळात लोकसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. व्ही.पी.सिंग यांना वेळोवेळी खिंडीत पकडण्यात काम त्यांनी केलं.

नेमके याच काळात लालकृष्ण अडवाणी यांनी देशभरात रामजन्मभूमी आंदोलनाचा धडाका उडवला होता. त्यांच्या भाजप पक्षाचा व्हीपी सिंग यांना पाठिंबा होता. मात्र जेव्हा बिहारमध्ये अडवाणींची रामरथ यात्रा अडवण्यात आली तेव्हा भाजपने व्ही.पी.सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला.  

जनता सरकार पडले. पुढे काँग्रेसच्या पाठिंब्यावर जनता दलाचेच चन्द्रशेखर पंतप्रधान बनले. आता काँग्रेसने या सरकारला पाठिंबा दिला असल्यामुळे राजीव गांधींचा विरोधी पक्ष नेता म्हणून हक्क देखील संपुष्टात आला. त्यांनी स्वतः सभापतींना भेटून सांगितले की आम्ही राष्ट्र्पतींच्याकडे चन्द्रशेखर यांना पाठिंबा देणारे पत्र लिहिले आहे आणि म्हणून विरोधी पक्ष नेते पद सोडत आहोत.

त्यावेळच्या लोकसभा अध्यक्षांनी राजीव गांधी यांच्या जागी भाजपच्या लालकृष्ण अडवाणी यांची निवड केली.

अडवाणी सांगतात, दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच मला राजीव गांधी यांचा अभिनंदनाचा फोन आला. ते म्हणाले,

“ज्या प्रमाणे ७ रेस कोर्स रोड हे माझ्यानंतर पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान बनले त्या प्रमाणे १० जनपथ रोड हा देखील विरोधी पक्ष नेत्याचा निवासस्थान बनवा. म्हणून मी हा बंगला खाली करतो आणि तुम्ही इथे राहायला या.”

त्या वेळी अडवाणी पँडोरा पार्क या निवासस्थानी राहात होते. अडवाणींनी मात्र नम्रपणे राजीव गांधी यांची ऑफर नाकारली आणि त्यांनी १० जनपथ येथे जाण्यास नकार दिला. त्यामुळे राजीव गांधी तिथेच राहिले.

पुढे काहीच दिवसात चंद्रशेखर यांचं सरकार देखील पडलं. १९९१ साली मध्यावधी लोकसभा निवडणुका लागल्या. राजीव गांधींनी कंबर कसली. संपूर्ण देशभरात आपल्या प्रचाराचा धडाका उडवला. मात्र याच प्रचारफेरी दरम्यान त्यांच्यावर अतिरेक्यांनी आत्मघातकी हल्ला केला व त्यांचे त्यात दुःखद निधन झालं.

शास्त्रीजींच्या नंतर राजीव गांधींच्या अकाली निधनामुळे १० जनपथ रोड अनलकी आहे यावर दुसऱ्यांदा शिक्का मोर्तब झाला. 

अनेकांनी राजीव गांधी यांच्या पश्चात सोनिया गांधींना हा अशुभ बंगला सोडण्याचा सल्ला दिला मात्र त्या तयार झाल्या नाहीत. खरं तर या मोठ्या बंगल्यावर कित्येकांचा डोळा होता. राजीव गांधी माजी पंतप्रधान लोकसभेत नेते होते पण सोनिया गांधी कोणत्याही सरकारी पदावर नव्हत्या. मग तरीही त्यांनी या बंगल्यात राहणे हे शिष्टाचाराला धरून नव्हते.

पण नुकताच वैधव्य आलेल्या सोनिया गांधींना बंगला खाली करा सांगण्याचं धाडस कोणत्याही अधिकाऱ्याला झाले नाही. शिवाय राजीव गांधींच्या पश्चात त्यांना असलेली विशेष सुरक्षा व्यवस्था सोनिया गांधींना व त्यांच्या कुटूंबाला सुद्धा होती.  त्यांच्या देखील जीवाला धोका होता.

त्यामुळे पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी १० जनपथ हाच बंगला गांधी कुटूंबाला ठेवला. तेव्हापासून आज जवळपास तीस वर्षे झाली सोनिया गांधी याच निवासस्थानात राहात आहेत. त्या काँग्रेस अध्यक्ष बनल्यापासून गांधी घराण्याची ओळख हा १० जनपथ बंगला बनला आहे.

मनमोहन सिंग सरकारच्या काळात पंतप्रधानांच्या पेक्षाही जास्त पॉवर या बंगल्यात होती अशी टीका व्हायची. गेल्या अनेक पराभवानंतर काँग्रेसचा पूर्वीचा रुबाब कायम उरला नाही. मात्र कितीही नाही म्हटलं तरी गांधी घराण्याचे महत्व देशाच्या राजकारणात कायम आहे. म्हणूनच मोदी सरकारच्या काळातही १० जनपथचा दरारा कायम आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.