राजीव गांधींचा प्रचार कॅम्पेनिंग सांभाळणाऱ्या तरुणाने भारतातलं पहिलं न्यूजपोर्टल सुरु केलं

सध्याच्या मार्केटमध्ये दोनच गोष्टींचा बोलबाला आहे. एकतर इलेक्शन कँपेन चालवणारे आणि दुसरे न्यूज पोर्टल वाले. एमपीएससीच्या परीक्षा पार पडल्या की पुण्याच्या गल्लीबोळात रोज एक नवीन पोर्टल तयार होतंय आणि दोन इलेक्शन कॅम्पेन चालणाऱ्या कंपन्या सुरु होतात.

या सगळ्याची सुरवात करणारा गुरु कोण माहिताय ?

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. भारतात अजून नव्वद टक्के लोकांना कॉम्प्युटर काय असते हेच ठाऊक नव्हतं. ज्यांना ठाऊक होत त्यांना वाटायचं कॉम्युटर म्हणजे कामगारांचा शत्रू, सगळ्या देशाच्या नोकऱ्या घालवणार.

पण या कॉम्प्युटरची ताकद त्याकाळातच ओळखली होती भारताच्या पंतप्रधानांच्या मुलाने

नाव राजीव गांधी

पंतप्रधान बनण्याच्या आधीपासून राजीव गांधींनी इंदिरा गांधींना कॉम्प्युटर विषयक धोरण बदलायला लावून एकविसाव्या शतकाची तयारी सुरु झाली आहे याचे सूतोवाच केले होते. या बदललेल्या धोरणांमुळे आयआयटी, आयआयएम सारख्या दर्जेदार संस्थेत शिकून परदेशी जाणाऱ्या तरुणांचा ओघ थांबला. अनेकांनी स्वतःचा स्टार्टअप सुरु केला.

यातच होते अजित बालकृष्णन

अजित बालकृष्णन शिकले केरळ विद्यापीठाचे ग्रॅज्युएट होते आणि त्यांनी आयआयएम कलकत्ता येथून एमबीए केलं होतं. त्यांनी आणि अरुण नंदा, मोहम्मद खान या  मित्रानी मिळून एक कंपनी स्थापन केली होती नाव होत रेडिफ्युजन.

कॉलेजमधून पास आउट झाल्या झाल्या त्यांनी ही कंपनी सुरु केली होती. त्यांचं काम जाहिरातीच कॅम्पेनिंग चालवणे हे होतं. इंडिया टुडे मासिक जेव्हा लॉन्च झालं तेव्हा त्याच पहिलं पब्लिसिटी मार्केटिंग रेडिफ्युजनने केलं होतं. आजवर ज्या पद्धतीने जाहिराती बनत त्याच्यापेक्षा रेडिफ्युजन वेगळ्या पद्धतीने काम करायची. याचे चारही पार्टनर कॉम्प्युटर चालवायला शिकलेले,

या कम्प्युटरचा वापर करून ते स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करायचे आणि त्यातून जाहिरात कॅम्पेन डिझाईन करायचे.

अजित बालकृष्णन यांचा एक पार्टनर अरुण नंदा हा राजीव गांधी यांच्या शाळेत सोबत होता. दोघेही डून  स्कुलमध्ये एकत्र होते. त्यांची चांगली मैत्री होती. संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर नुकताच त्यांनी पायलटची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षाचे महासचिव म्हणून येणाऱ्या निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर होती.

साल १९८३. अरुण नंदाच्या प्रयत्नांमुळे रेडिफ्युजनला आणि एका अमेरिकन कंपनीला राजीव गांधींना इलेक्शन कॅम्पेनिंगचं प्रेझेन्टेशन सादर करायची संधी मिळाली. पंतप्रधान निवासस्थानात एका संध्याकाळी त्यांची मिटिंग ठरली. हि मिटिंग मध्यरात्री पर्यंत चालली.

राजीव गांधी लक्ष देऊन कॉम्प्युटरवर दिल्या जाणाऱ्या प्रेझेन्टेशनकडे पाहत होते. अचानक त्यांचा एक सहकारी त्या खोलीत आला, त्याने राजीव गांधींना मनीला एअरपोर्टवर झालेल्या एका नेत्याच्या हत्येची बातमी दिली. मिटिंग पुढे सुरु झाली पण त्या हत्येच्या बातमीमुळे इलेक्शन कॅम्पेनिंगचा मुद्दाच बदलला.

१९८४ सालच्या इंदिरा गांधींच्या इलेक्शन प्रचाराचा मुद्दा ठरवण्यात आला अंतर्गत सुरक्षितता. देशावर रोज होणारे हल्ले, पंजाब आसाम इथल्या अशांततेचा प्रश्न, अतिरेकी हल्ले, मुंबई मधील वाढती संघटित गुहेगारी यावर भर देण्यात आला होता. यातून जर सुटका हवी असेल आणि देशाची एकता टिकवायची असेल तर काँग्रेसला मत द्या अशा जाहिराती बनवण्यात आल्या.

त्यांची टॅगलाईन होती,

Vote for congress, Vote for unity

दिवस रात्र राबून अजित बालकृष्णन यांनी आणि त्यांच्या टीमने बनवलेलं इलेक्शन कॅम्पेन काँग्रेस पक्षाच्या ग्रीन सिग्नल साठी थांबलेलं. सलग चार आठवडे या जाहिराती चालणार होत्या. अजित आणि रेडिफ्युजनची टीम त्यांच्या बाकीच्या जाहिरातींच्या कामात गुंग झाली होती.

आणि एक दिवस त्यांच्या डोक्यावर बॉम्ब फुटला,

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. त्यांच्या दोन शीख बॉडीगार्डनीच त्याचाय्वर गोळ्या चालवल्या होत्या. संपूर्ण देश सुन्न झाला होता. पंजाब आणि दिल्ली दंगलीत जळत होती.

लवकरच निवडणूक जाहीर करण्यात आल्या. काँग्रेसची सूत्रे राजीव गांधींच्या हातात देण्यात आली. त्यांनी काही महिन्यांपूर्वी तयार केलेलं रेडिफ्युजनच इलेक्शन कॅम्पेन आहे तस चालवलं. इंदिराजींच्या मृत्यूच्या सहानुभूतीच्या लाटेत ते प्रचंड गाजलं. कधी नव्हे ते काँग्रेसचे चारशेच्या वर खासदार निवडून आले.

अवघ्या ४० वर्षांचे राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले.

रेडिफ्युजनच्या कँम्पेनिंगच देखील हे यश मानलं गेलं. तिथून कंपनी सुसाट सुटली. त्यांना पुढचं काम भाजपचं मिळालं. ८४च्या निवडणुकीत त्यांचे फक्त २च खासदार निवडून आले होते. त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा जनतेपर्यंत नेण्याचं काम रेडिफ्युजननेच केलं होतं.

तो पर्यंत नव्वदचं दशक उजाडलं होतं. राजीव गांधींची हत्या झाली होती. भाजपचं राममंदिर रथयात्रा जनतेच्या मनात घर केली होती, बाबरी मशिदीचे पतन, दंगली, मुंबई बॉम्बस्फोट, हर्षद मेहता स्कॅम या प्रश्नांना व्यवस्थित हाताळू न शकल्यामुळे काँग्रेसची पीछेहाट होत गेली आणि त्यांची जागा भाजपने  भरून काढली.

१९९६ साली भारतात एका नव्या गोष्टीचा चंचू प्रवेश झाला होता. त्याच नाव म्हणजे इंटरनेट !

इंटरनेट येणार येणार म्हणून खूप दिवस चर्चा सुरु होती. मार्केटचा अभ्यास करणाऱ्या अजित बालकृष्णन याना अंदाज आला होता कि पुढचं जग आता इंटरनेटचं असणार आहे. त्यांनी आपल्या इतर पार्टनरना सांगितलं आता कंपनीची जबाबदारी तुम्ही उचला मी पूर्णवेळ या नवीन इंटरनेटसाठी देणार आहे.

भारतात इंटरनेट आलेल्याला एक महिना देखील झाला नव्हता तेवढ्यात अजित बालकृष्णन यांनी आपल न्यूजपोर्टल लॉन्च केलं,

रेडीफ न्यूज ऑन नेट

भारतात मोजकेच लोक इंटरनेट वापरत होते. तरी अजित बालकृष्णन यांनी त्यांना बातम्या वाचायला मिळाव्यात म्हणून मोठमोठ्या पत्रकारांना आपल्या कंपनीत घेतलं होतं. मोठमोठे दिग्गज लोक रेडीफ न्यूज ऑन नेट साठी कॉलम लिहीत होते. थोड्या दिवसांनी त्यांनी आपल्या वेबसाईटचं नाव rediff.com असं बनवलं.

असं म्हणतात कि भाजपच्या हिंदुत्वाच्या प्रोपोगांडा पसरवण्याचं सुरवातीचं काम रेडीफच्या न्यूज पोर्टलने केलं.

लवकरच त्यांनी रेडीफमेल नावाची ईमेल सुविधा देखील सुरु केली. भारतातील सुरवातीच्या काळातली ईमेल सुविधा म्हणून रेडीफला ओळखलं जातं. एक काळ होता जेव्हा रेडीफने अख्ख इंटरनेट गाजवलं होतं. त्यांनी प्रचंड पैसा कमवला. याहूनही महत्वाचं म्हणजे देशवासियांसाठी नवी रोजगाराची दालने खुली केली.

आजही रेडीफमेल, रेडीफ बातम्या आपल्याला इंटरनेटवर दिसत असतात. एकविसाव्या शतकाच्या लढाईत त्यांनी कसबस तग धरलं आहे हेच त्यांचं यश आहे. राजीव गांधींच्या निवडणूक कॅम्पेन पासून सुरु झालेला हा प्रवास आज अनेकांना आपल्या न्यूज पोर्टलसाठी, नवीन स्टार्ट अप साठी, कॅम्पेन मॅनेजमेंट साठी प्रेरणादायी आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.