राजीव गांधींवर गोळीबार सुरु झाला. पंतप्रधानांसोबत राष्ट्रपतींचेही प्राण पणाला लागले होते..

काय होईल जेंव्हा, संसदीय लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांवरही एकाच वेळी जीवघेणा हल्ला झाला तर? काही बरंवाईट झालं तर? मग या देशाच्या शासन व्यवस्थेचे काय होईल? याची कल्पना करणे ही किती भयंकर वाटते.

पण अशाच एका हल्ल्याचा प्रयत्न आपल्या देशातही झाला आहे.

आता तुम्ही विचार करत असाल की, मी त्या प्रसंगाचा उल्लेख करतेय जेंव्हा, ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्या सुरक्षारक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली होती. तर ही घटना मी सांगत नाहीये, तर त्याच घटनेच्या २ वर्षांनंतर घडलेल्या एका घटनेबद्दल सांगतेय ज्यात देशाचे अध्यक्ष ग्यानी झैल सिंग आणि पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर अत्यंत जवळून गोळीबार करण्यात आला होता.

तो दिवस होता २ ऑक्टोबर १९८६. त्या दिवशी महात्मा गांधी यांची ११७ वी जयंती साजरी केली जात होती.

परंपरेनुसार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी महात्मा गांधींची समाधी असलेल्या राजघाटावर पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सोनिया गांधी ही होती. दोघेही राजघाट कॅम्पसमध्ये शिरले. ते समाधीच्या दिशेने जाऊ लागले. सोबतच सुरक्षा एजन्सी आणि गुप्तचर यंत्रणांचा मोठा ताफा होता. वेळ ६:५५ वाजताची होती.

तेव्हा अचानक आवाज सगळ्यांच्या कानावर आला. कोणालातरी वाटलं स्कूटर किंवा एखाद्या वाहनाचे इंजिन फुटले असेल, पण कुणाला वाटलं ही फायरिंग चा आवाज आहे. आणि लगेच सुरक्षा अधिकारी आणि जवान सावध झाले.

राजीव गांधी नेहेमीच्याच चालीत समाधीच्या दिशेने जात होते. दरम्यान, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग देखील राजघाट कॅम्पसमध्ये प्रवेश केला. राजीव यांच्या किंचित नंतर आलेले ग्यानी झैलसिंग राजीवजींच्या अगदी मागेच होते.

या सगळ्या घडामोडी सुरु होत्या आणि राष्ट्रपती पंतप्रधान हे दोघेही समाधीस्थळावर प्रार्थना सभांना उपस्थित झाले. एकीकडे प्रार्थना सुरू होती आणि दुसरीकडे सुरक्षा यंत्रणा आलेल्या आवाजाचा तपास करायला लागले.

आपण पाहतोच कि, महापुरुषांच्या जन्म-पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांची समाधी आणि तेथील परिसर फुलांनी सजवलेला असतो. पण या सजावटीवर सुरक्षा यंत्रणेची कडक नजर असते. कारण तिथे येणाऱ्या व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेला कोणताही धोका पोहोचू नये याची काळजी घेतली जाते. म्हणूनच फुलांच्या सजावटीखाली जमिनीवरचा भाग पाण्याने ओला ठेवला जातो, चिखल ही ठेवला जातो. याचे कारण असे कि, या खाली जर कोणी स्फोटक जमिनीखाली गाडले असेल, तर ते काही वेळात निष्प्रभावी होऊन जावे.

त्या दिवशी राजघाटावरही असेच केले गेले होते. काही सुरक्षा कर्मचार्यांना वाटले की कदाचित शस्त्र जमिनीत गाडले गेले असेल आणि त्या शस्त्रातून गोळीबार होत असावा.

घटनास्थळावर लगेच स्निफर डॉग स्क्वॉड सक्रिय करण्यात आले. काही लोकांना वाटले की राजघाट कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूच्या इमारतीतून कोणीतरी गोळीबार करत आहे. इमारतींची झडतीही सुरू झाली. या सर्वांच्या दरम्यान राजघाटावर प्रार्थना सभाही सुरूच होती.

इतक्यात प्रार्थना सभेदरम्यानच आणखी एक फायरिंग झाली आणि यावेळी झाडली जाणारी गोळी पंतप्रधानांच्या अगदी मागे फुलांमध्ये जाते आणि जमिनीत घुसली. आतामात्र सुरक्षा कर्मचारी अजून सतर्क झाले. त्यांनी ताबडतोब पंतप्रधान आणि राष्ट्रपतींभोवती सुरक्षा वेढा बांधला. ते सुरक्षेसाठी तयार केलेल्या कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या कैनोपीजपर्यंत ते पोहचले (जिथे सुरक्षा कर्मचारी तयार दिसतात अशा टेकडीसारख्या उंच ठिकाणी) आणि कमांड घेतला.

अखेर आवाज कोठून येतोय, हे समजत नसल्यामुळे सुरक्षा अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणा चिंतेत आल्या होत्या.

प्रार्थना बैठकीनंतर व्हीव्हीआयपींना दिल्लीला कसे आणि कोणत्या मार्गे पोहोचवायचे यावर दिल्ली पोलिस उपायुक्त गौतम कौल आणि एसपीजीचे डिप्टी डायरेक्टर एम.आर रेड्डी यांच्यात चर्चा सुरू झाली.

रेड्डी यांना वाटत होतं कि,पंतप्रधान व राष्ट्रपतींना बाहेर काढण्यासाठी नवीन मार्ग निश्चित करायचा, तर गौतम कौल यांना असं वाटत होतं की, नवीन मार्ग निश्चित केला तर इतक्या कमी वेळेत त्या मार्गवर सुरक्षा व्यवस्था करता येणार नाही. लवकरात लवकर व्हीव्हीआयपींना येथून बाहेर काढणं महत्वाचं आहे म्हणून ते ज्या मार्गावरून आले आहेत, त्याच मार्गाने त्यांना सुरक्षितपणे घरी परत पाठवणे योग्य राहील.

अखेर यावरच एकमत झालं आणि ते कामाला लागले.

8 वाजता प्रार्थना सभा संपली. सर्व व्हीव्हीआयपी आपापल्या गाड्यांकडे जायला निघतात. पंतप्रधान राजीव आणि राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग एकत्र चालत होते, तेव्हा झैलसिंग राजीव गांधींना म्हणाले,

“हा हल्ला कोण करत असतील ?”

राजीव गांधी त्यांना अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने उत्तर देत म्हणाले,

“मी आलो तेव्हा माझं असं स्वागत झालं होतं. मला वाटतं, आता पुन्हा फायरिंग करून कदाचित निरोप दिला जात असेल.”

अन पुन्हा अचानक तिसऱ्या फायरिंगचा आवाज ऐकू आला. यावेळी मात्र राजीव गांधी यांना धक्का बसला. त्यांनी ताबडतोब झैलसिंग यांना त्यांच्या बुलेटप्रूफ मर्सिडीज मध्ये बसवल व स्वतः सोनिया यांना घेऊन आपल्या एम्बेसेडर कारमध्ये लपले. त्यानंतरच्या फायरिंग मध्ये दोन जणांना गोळ्या लागल्या, ते म्हणजे कॉंग्रेसचे आमदार ब्राजेंद्रसिंग मावई आणि राजस्थानमधील बयानाचे माजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रामचरण लाल. ते राजीव गांधींच्या अगदी मागे चालत होते.

सर्व सुरक्षा एजन्सी, SPG, दिल्ली पोलिस, NSG, इंटेलिजेंसची लोकं, या सर्वांनाच धक्का बसला. आग कोठून येत आहे, कोण गोळीबार करत आहे हे कोणालाच समजत नव्हते. तो गोळीबार कोण करत होता? का करत होता?

तोपर्यंत गृहमंत्री बुटा सिंग हेही महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटावर पोहोचले होते. पण दरम्यान, काही सुरक्षा कर्मचार्यांना १० फूट उंच छावणीच्या वरच्या बाजूने धूर उठताना दिसला. ती कैनोपी, समाधीपासून २५-३० फूट अंतरावर होती. जवान आणि सुरक्षा दल तिथे धावतात, आणि त्या २४-२५ वर्षांच्या एका क्लीन शेव्ड तरुणाला, देशी कट्ट्यासह ताब्यात घेतले जाते.

गृहमंत्री बुटा सिंग यांनी सुरक्षा कर्मचार्यांवर ओरडले कि, “त्याला गोळी मारा”.
पण तेव्हा गौतम कौल म्हणाले, “त्याला गोळी मारू नका”.

त्यावर तो तरुण दोन्ही हात वर करून ओरडला कि, “मी सरेंडर करतोय.”

त्या तरुणाला जिवंत पकडण्यात आलं, चौकशी करण्यात आली, संभाषणादरम्यान त्याचे नाव करमजित सिंग असल्याचे कळले. २ वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या वेळी तो अभियांत्रिकीचे विद्यार्थी होता. यमुनापार भागात हल्लेखोरांनी त्याच्या शीख मित्राची हत्या केली होती. हा मात्र त्यातून वाचला.

त्या घटनेनंतर तो गांधी घराण्याचा तिरस्कार करायला लागला. परंतू सुरक्षा यंत्रणांना त्याच्यावर विश्वास बसत नव्हता.

दुसरीकडे, हैराण, परेशान झालेल्या राजीव गांधींना, कसेबसे सुरक्षित पंतप्रधान निवास ७ रेसकोर्स रोडकडे नेण्यात आले. परत येताना त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांसमवेत तीन तास बैठक घेतली दिल्ली डिप्टी कमिश्नर (सुरक्षा) गौतम कौल यांना तातडीने निलंबित करण्यात आले. या प्रकरणाचा तपास इंटेलिजन्स ब्युरो कडे सोपवण्यात आला.

गौतम कौल यांचा कथित निष्काळजीपणा –

या घटनेच्या काही दिवस आधीआरएचे संचालक रंजन राय यांना लुधियाना कडून गुप्तचर माहिती मिळाली. २७ सप्टेंबर १९८६ रोजीच त्यांनी एसपीजीसह सर्व सुरक्षा एजन्सींना माहिती दिली. या इनपुट नुसार, ‘पंतप्रधान राजीव गांधींवर २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीसाठी राजघाटावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो. हल्लेखोर एक क्लीन शेव्ड शीख तरुण असू शकतो. तो माळीच्या वेषात येऊ शकतो किंवा वाहनांमध्ये तो लपू शकतो.’

आयबीचे अतिरिक्त संचालक पी. एन मल्लिक यांनी स्वत: गौतम कौल यांना ही माहिती दिली.
परंतु दिल्ली पोलिस आणि इतर सुरक्षा एजन्सींच्या सुरक्षा शाखेने हा रूटीन वॉर्निंग म्हणून घेतला ज्यामुळे हल्लेखोर यशस्वी झाला. मात्र, ज्येष्ठ पत्रकार तवलिन सिंग यांनीही या घटनेतील सुरक्षा त्रुटी मान्य केली. त्यांनी हे सोनिया गांधींच्या जावं लागेल.

तवलिन सिंग यांनी आपल्या ‘दरबार’ या पुस्तकात लिहिले आहे कि,

हल्ल्याच्या वेळी सोनियाही राजीव गांधींसोबत असल्याचे मला कळले तेव्हा मी त्यांना फोन केला. सोनिया यांनी मला सांगितले की, सर्वात वाईट धक्का हा होता कि, राजीव यांचा नवीन आणि उच्च प्रशिक्षित SPG ने हा बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकल्याबरोबर राजीवजींची साथ सोडली होती.

दुसऱ्या दिवशी पुन्हा एक हल्ला 

तारीख ३ ऑक्टोबर १९८६ . राजघाटच्या घटनेला २४ तास उलटले होते. एकीकडे सुरक्षा यंत्रणा करमजित सिंग यांची चौकशी करत असतानाच जालंधरमध्ये आणखी एक घटना घडली. पंजाबचे डीजीपी ज्युलिओ रिबेरो आणि त्यांची पत्नी मेल्बा रिबेरो या घटनेतून थोडक्यात बचावले.

पोलिसांच्या गणवेशात असलेल्या व्हॅनमधील काही अतिरेकी जालंधरमधील शेरशाह सूरी मार्गावरील पंजाब आर्म्ड पुलिस हेडक्वार्टरमध्ये प्रवेश केला आणि अचानक ज्युलिओ रिबेरो येथे गोळीबार सुरू करतात. रिबेरो सह सुरक्षा कर्मचारीही गोळीबाराला उत्तर देऊ लागले.

CRPF जवान कुलदीप राज मात्र यात शहीद झाले.रिबेरो आणि त्याची पत्नी मात्र सुदैवाने बचावले.

या घटनेनंतर राजघाट प्रकरणाचा तपास करणाऱ्यांचा संशय अधिकच गडद झाला. या दोन्ही हल्ल्यांमध्ये कॉमन लिंक असल्याचा संशय सर्वांनाच आला होता. करमजित सिंग यांची चौकशी करण्याची प्रक्रिया आणखी कडक करण्यात आली. परंतु तरीही पोलिस आणि सुरक्षा एजन्सींना दोन्ही घटनांमध्ये कोणताही समान दुवा सापडला नाही. ८ वर्षांनंतर, १९९४ मध्ये राजघाट गोळीबार प्रकरणात करमजित सिंग यांना कोर्टाने दोषी ठरवले. परंतु २००० मध्ये त्याला चांगल्या वर्तणुकीसाठी सोडण्यात आले.

हा करमजित सिंग कोण होता?

हा करमजित सिंग हे संगरूरचे आहे. ८० च्या दशकाच्या सुरुवातीला तो इंजीनियरिंगच्या अभ्यासाच्या उद्देशाने दिल्लीला आला होता. २००९ मध्ये त्यांनी Sify.com वेबसाइटला मुलाखत दिली. त्यात तो म्हणाला,

”मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो. दिल्लीच्या मानसरोवर पार्कमध्ये माझा मित्र बलदेव सिंग याच्यासोबत राहत होतो . त्यादरम्यान, इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि त्यानंतर शीख विरोधी दंगली उसळल्या. ३ नोव्हेंबर १९८४ रोजी अचानक माझ्या परिसरात आंदोलकांची गर्दी जमली.

शिखांना शोधून शोधून मारण्यात आले. त्यामुळे माझा घरमालकही घाबरला होता, त्याने मला जीव वाचवण्यासाठी ताबडतोब केस आणि दाढी दाढी काढण्यासाठी सांगितले. बलदेव आणि मी घरमालकाचे ऐकले आणि केस आणि दाढी दाढी केली.

त्यानंतर आम्ही दोघं वेगवेगळ्या मजल्यांच्या बाथरूममध्ये लपलो. त्यानंतर हल्लेखोर आमच्या घरात शिरले आणि बाथरूमचे दार जोरजोरात आपटायला लागले. त्यांनी कापलेले केस खाली पडलेले पाहिले होते, त्यामुळे या घरातही शीख असल्याची त्यांचा संशय खरा झाला. त्यांनी माझ्याही बाथरूमच्या दाराला बाहेरून आपटलं, तेव्हा मी आतून म्हणालो, “यार, कोण अंघोळीमध्ये डिस्टर्ब् करतंय?”

‘मग त्यांना मी शीख नाही याची खात्री पटली. पण दुसऱ्या मजल्यावर बाथरूम मध्ये लपून बसलेल्या बलदेवने दरवाजा उघडला. त्याचे टक्कल पडलेले डोके पाहून जमावाला वाटले की तो शीख आहे. त्याला आधी छतावरून खाली फेकून दिले आणि मग ठार करण्यात आले.

काही तासांनी पोलीस आले.. मला श्यामलाल कॉलेजच्या रिलीफ कैंप मध्ये नेण्यात आलं. तिथे कित्येक दिवस जेवणा शिवाय राहावं लागलं.. कधीकधी मला फक्त १ पोळीवर दिवसभर राहावं लागायचं..

या सगळ्यादरम्यान राजीव गांधींनी एक विधान केलं, “जब बड़ा पेड़ गिरता है तो धरती हिलती ही है”, त्यांच्या या विधानाने मी खूप निराश झालो आणि मी गांधी घराण्याचा तिरस्कार करू लागलो.

मग मी नियोजन सुरू केलं. राजस्थानच्या श्रीगंगानगर मधून 300 रुपयांमध्ये देशी कट्टे विकत घेतले. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती ची तारीख निवडली. राजघाटची जागा मला योग्य वाटली. पण त्या दिवशी तिथे सुरक्षा व्यवस्था कडक असेल हे मला माहीत होतं, त्यामुळे तिथे पोहोचणं शक्य होणार नाही. म्हणून मी आवश्यक सामान, अन्न घेऊन, १० दिवसांपूर्वी २२ सप्टेंबरला राजघाट आवारात शिरलो. तिथे १० फूट उंच कॅनोपीवर दहा दिवस तिथेच राहिलो. मधमाश्यांनी त्रास द्यायची भीती वाटत होती, पण पावसामुळे त्याचा धोका कमी झाला होता.

२ ऑक्टोबरच्या सकाळी मी पूर्ण तयारीने तिथे होतो. राजीव गांधी आत येताना दिसले. मी फायरिंग सुरु केलं.

तीन गोळी फायर केल्यानंतर मला सुरक्षा यंत्रणांनी पकडलं. चौकशी झाली. ५६ दिवसांची पोलीस कोठडी होती. त्यात खूप छळ झाला. दोन वेळा राजीव गांधीही मला भेटायला आले होते. दोन्ही वेळा त्यांनी मला, जर मी माफी मागितली तर मला माफ केले जाईल. पण मी नकार दिला. मला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती, पण २ मे २००० रोजी माझ्या चांगल्या वागणुकीबद्दल माझी सुटका झाली.

मी तुरुंगात असताना ग्रॅज्युएशन आणि पोस्ट-ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पण जेल अथॉरिटी ने मला लाॅ करू दिलं नाही. तुरुंगातून सुटल्यानंतर माझं लग्न झालं आणि मग मी LL.B. पूर्ण केलं”.

सध्या  करमजित सिंग पटियाला येथे लॉ प्रॅक्टिस करत आहेत. २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. अपक्ष उमेदवार म्हणून. पण काँग्रेस उमेदवार आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी पर्णीत कौर यांच्यासमोर त्याची हार झाली, करमजित सिंगला केवळ ४५९१ मते मिळाली.

तर ही होती, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांवर झालेल्या हल्ल्याची घटना. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांवर इतक्या जवळून गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराकडे अत्याधुनिक शस्त्रे असती किंवा तो त्या दिवशी गोळीबार करण्यात यशस्वी झाला असता तर किती मोठा अनर्थ घडला असता, याचा विचारही करावासा वाटत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.