राजीव गांधींना मारण्यापूर्वी धनु व्ही. पी. सिंग यांच्या पाया का पडली होती?

२१ मे १९९१ च्या रात्री १० वाजून २१ मिनिटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये जे घडलं ते भीषण होतं. ३० वर्षांची एक बुटकी, सावळी आणि जाडी धनु नावाची मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन राजीव गांधी यांच्या दिशेनं चालू लागली.

ती राजीव गांधी यांच्या पाया जवळ पोहचली आणि पाय पडण्यासाठी वाकली. राजीव यांनी तिला वर उठवण्यासाठी हात लावला आणि…. तो पर्यंत धनुने कमरेला असलेलं बटन दाबलं. आसमंत हादरला, कानठळ्या बसणारा एक स्फोट झाला.

तिकडून फार तर दहा फूटांवर तेव्हाच्या गल्फ न्यूजच्या प्रतिनिधी आणि सध्या बंगळुरूच्या डेक्कन क्रॉनिकलच्या निवासी संपादकपदी असणाऱ्या नीना गोयल होत्या. राजीव गांधींच्या सहकारी सुमन दुबे यांच्याशी त्या तिथे बोलत उभ्या होत्या.

त्या घटनेबद्दल आठवण सांगताना नीना म्हणतात,

बाँब फुटण्याआधी फटाके फुटण्याचा आवाज आला होता. त्यानंतर काही क्षणांच्या शांततेनंतर जोरात बाँबस्फोट झाला. त्या धक्क्यातून बाहेर येत जेव्हा मी पुढे आले तेव्हा आजूबाजूच्या लोकांच्या कपड्यांना आग लागलेली दिसली.

लोक जीवाच्या आकांतानं ओरडत होते, चारही बाजूंना पळापळी दिसत होती. आम्हाला हे देखील माहित नव्हतं की राजीव गांधी जिवंत आहेत की नाही.

धनु आणि राजीव गांधी यांच्या आसपास उभ्या असलेल्या १६ लोकांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले होते. 

पण याच धनुने राजीव गांधी यांना मारण्यापुर्वी अगदी १० दिवस आधी माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचे पाय धरले होते. आणि त्यानंतरच हल्ल्याच्या अंतिम टप्प्याला सुरुवात करण्यात आली होती.

लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन आणि यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणारे पत्रकार एम. आर. नारायणस्वामी यांच्या ‘इन साइड एन इल्युसिव माइंड’ मध्ये हा दावा करण्यात आला आहे.

या पुस्तकाच्या अनुसार १२ मे रोजी या आत्मघातकी हल्ल्याची रंगीत तालीम करण्यासाठी लिट्टेचा हा गट माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सभेमध्ये गेला होता. मद्रास पासून ४० किलोमीटर लांब थिरूवलूर या ठिकाणी सिंह यांची हि सभा करुणानिधी यांच्या समर्थनासाठी आयोजित करण्यात आली होती.

नियोजनानुसार हा गट सिंह यांच्या सभेत देखील एक तास आधी पोहचला. त्यांनी स्टेज जवळील सुरक्षेचा आढावा घेतला. एखाद्या माजी पंतप्रधानांना कशी सुरक्षा व्यवस्था असू शकते याचा अभ्यास केला. सभा संपल्यानंतर धनूने पुढे जाऊन सिंह यांना हार घालून पाया पडून नमस्कार केला. फरक फक्त एवढाच कि राजीव यांच्या हत्येवेळी कमरेला बॉम्ब होता.

लेखकाच्या म्हणण्यानुसार मुख्य दिवशी कोणतीही कमतरता राहायला नको यासाठी या पूर्ण सीनच व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आला होत. त्यानंतर ते गटाने सातत्याने पुढेच ७ दिवस बघत राहिला. धनुच ते पाया पडणं, सभांमध्ये मोठ्या नेत्यांपर्यंत कसं पोहचायचं अशा अनेक बारीक सारीक गोष्टींची काळजी घेण्यात आली होती.

या हल्लेखोरांच्या हालचालींना आणि या अभ्यासाला गुप्तचर संस्था तेव्हा पकडू शकली नाही आणि नंतर राजीव गांधी यांच्या सभेवेळी देखील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त केला नाही . त्यामुळेच राजीव गांधी यांची हत्या टळू शकली नाही.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.