पंतप्रधान आपला नियोजित कार्यक्रम सोडून लातूरच्या खेड्याला भेट देतात तेव्हा..

राजीव गांधी देशाला माहिती व तंत्रज्ञानाचे स्वप्न दाखविणारे अन देशाचे आज पर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान पण हेच राजीव गांधीनी एकदा पंतप्रधान असताना महाराष्ट्रातील अवघी जेमतेम 500 (त्याकाळी) लोकसंख्या असलेल्या गावात अचानक भेट देऊन एका शेतकऱ्याच्या झोपडीला भेट देऊन ती शेतकऱ्याची पत्नी स्वयंपाक करत असताना तिला आप ये क्या बना रही है? असा प्रश्न केला होता.

साधारणतः 1987 साली महाराष्ट्रातल्या काही भागांत दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असल्याने तत्कालीन सरकारने हा भाग टंचाईग्रस्त म्हणून घोषित केला होता त्याअनुषंगाने या भागात शासनातर्फे अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या त्या पाहण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे आपल्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते.

त्यांनी आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सोलापूर भागात पाहणी करणार अन दुसऱ्या दिवशी ते लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मनोहर तांडा येथे सुरू असलेल्या पाझर तलावाची पाहणी व नंतर बेलकुंड येथे पाहणी करणार असं ठरवलं होतं, देशाचे पंतप्रधान येणार म्हणल्याने ज्या गावाला जायला नीट रस्ता नव्हता ते रस्ते चकाचक करण्यात आले याशिवाय अनेक शासकीय इमारतींची डागडुजी करण्यात आली होती. तसेच तब्बल आठ दिवसांपासून बेलकुंड व मनोहर तांडा या दोन गावात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आपल्या नियोजित कार्यक्रमा प्रमाणे राजीव गांधी यांनी पहिल्या दिवशी सोलापूर भागात पाहणी करून सोलापूर येथे मुक्काम केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता ते औसा तालुक्यातील मनोहर तांडा येथे हेलिकॉप्टर ने आले त्यांच्यासह सोनिया गांधी, तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, तत्कालीन केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रभा राव, औशाचे तत्कालीन आमदार किसनराव जाधव होते.

 पंतप्रधान येणार यापेक्षा त्या हेलिकॉप्टर चे गावकऱ्यांना अप्रूप होतं.

राजीव गांधी आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार निघणार तेवढ्यात अचानक चिंचोली (सोन) येथील जवळपास 100 लोक थेट तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कडे गेले अन त्यांनी आम्ही ज्या सरकारी योजनेवर काम करत आहोत तिथं आम्हाला वेळेवर पगार मिळत नसल्याचे गाऱ्हाणे घातले. तेव्हा राजीव गांधी यांनी आपला नियोजित मार्ग बदलत ते अचानक पहिल्यांदा चिंचोली (सोन) या गावात गेले.

त्यांच्या सोबत तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे होते तर सोनिया गांधी या हेलिकॉप्टर मध्येच बसून होत्या. सोनियांच्यासोबत चाकूरकर यांच्या पत्नी थांबल्या असल्याचे सांगितले जाते, तर तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर, प्रभा राव व अन्य काँग्रेस नेते हे अगोदरच बेलकुंड येथे येऊन थांबले होते.

राजीव गांधी यांनी आपल्या दौऱ्यात अचानक बदल केला याची माहिती त्यांना नसल्याने यंत्रणा काही काळ बुचकळ्यात पडल्याचे सांगितले जाते.

राजीव गांधींनी गावातील शाळा पाहिली व शाळे शेजारी असलेल्या सरतापे नामक शेतकऱ्याच्या झोपडीत प्रवेश केला असता त्या शेतकऱ्याची पत्नी स्वयंपाक करत होती. तिला माहीत नव्हतं की आपल्या घरी कोण आलं आहे. तिला राजीव गांधी यांनी अगदी सहजगत्या विचारलं आप ये क्या बना रही है? त्या महिलेला हिंदी न कळल्याने मध्यस्थाने तिला मराठीत अनुवाद केल्यावर डाळ शिजू घातली असल्याचं सांगितलं.

ते पाहून राजीव गांधी त्या झोपडीच्या बाहेर पडत असताना त्यांच्या कपाळावर त्या झोपडीवर असलेला पत्रा लागल्याचे नागरिक आज ही सांगतात.

यानंतर राजीव गांधी यांनी ग्रामस्थांनी ज्या ठिकाणी काम करत होते त्या कवळी साठवण तलवाची ही अनपेक्षित पाहणी करून कामात कुचराई करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला निलंबित करून ते पुढील नियोजित बेलकुंड येथे पोहचले.

बेलकुंड येथे त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले होते. त्यांचे औक्षण करण्यासाठी गावातील 5 महिला ताट घेऊन उभ्या होत्या. पण राजीव गांधी यांनी एकाच महिलेकडून औक्षण करून घेतले व ग्रामपंचायत शेजारी बांधण्यात आलेल्या देवणी जातीच्या बैलाच्या पाठीवरून त्यांनी हात फिरवला व बैलाच्या मालकाला त्यांनी 500 रुपये बक्षीस दिल्याचे बेलकुंड गावातील नागरिक आज ही सांगतात.

त्यानंतर उघड्या जीप मधून गावकऱ्यांना नमस्कार करत राजीव गांधी आपल्या हेलिकॉप्टर कडे मार्गस्थ झाले, ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर थांबले होते त्या मनोहर तांडा येथे बंजारा समाजातील काही महिलांनी हेलिकॉप्टर मध्ये बसलेल्या सोनिया गांधी यांना बंजारा समाजाचा पारंपरिक पोशाख भेट दिला होता.

राजीव गांधी यांच्या या दौऱ्यानंतर जवळपास 15 वर्षांनी सोनिया गांधी या पण या भागात दौऱ्यावर आल्या होत्या पण त्यांनी केवळ रोड शो केला होता तर राहुल गांधी हे ही जिल्हात मागील 11 वर्षात 4 वेळेस आले पण त्यांचे दौरे लातूर अन औशा पर्यंतच सीमित राहिले.

राजीव गांधी बेलकुंडला येणार आहेत हे समजताच काम व व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले गावातील अनेक नागरिक त्यादिवशी गावात आले होते त्यातील एक होते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुप्रसिद्ध विधिज्ञ प्रदीप देशमुख.

काही वर्षांनंतर लातूर जिल्हा कॉंग्रेस समितीने चिंचोली (सोन) हे गाव दत्तक घेतले असल्याचे सांगत या गावात अनेक शासकीय योजना रावबु असे आश्वासन दिले होते मात्र गावातील समस्या आज ही जैसे थेच आहेत.

  • शिवशंकर बोपचंडे
    मो:- 9834484743.

विशेष सहकार्य:- सुरेश अपसिंगेकर, शहाजी वाघमारे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.