ते राजीव गांधीना म्हणाले,” मी तुमच्यासारखा एयरहोस्टेस कडून इंग्रजी शिकून आलेला नाही.”

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. तेव्हा देशातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून राजीव गांधी निवडून आले होते. भारताला एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी कॉम्प्युटरची आवश्यकता आहे अशी नव्या युगाची भाषा बोलणारे ते पंतप्रधान. सळसळत्या रक्ताच्या प्रत्येक तरुणाप्रमाणे त्यांना देशात वेगाने बदल घडावा अशी घाई होती. पण या नादात कधीकधी जेष्टांचा अपमान देखील त्यांच्या हातून व्हायचा.

असच एकदा झालं. लोकसभेत चर्चासत्र चाललं होतं. महाराष्ट्राची समाजवादी मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार मधू दंडवते  बोलत होते. आपला मुद्दा मांडत असतांना त्यांच्या भाषणात इंग्रजीची काहीतरी चूक झाली. तेव्हा अचानकपणे उठून राजीव गांधी यांनी दंडवतेंना त्यांच्या इंग्रजीवरून छेडलं.

मधू दंडवते हे लोकसभेतील एक जेष्ठ नेते होते. सर्वच पक्षांना त्यांच्याविषयी आदर होता. आणि राजीव गांधी सारख्या नवोदित पंतप्रधानाने त्यांना अस छेडणं, त्यांना संताप आणणारे होते. ते ही राजीव गांधीना खवळून म्हणाले,

“‛मी काही इंग्रजीचे धडे हवाई सुंदरींकडून घेतलेले नाहीत.”

राजीव गांधी पूर्वी इंडियन एअर लाईन्समध्ये वैमानिक होते. त्यालाच उद्देशून दंडवतेंनी हा टोमणा मारला होता. त्यावरून सदनात चांगलंच रणकंदन माजलं. सत्ताधारी व विरोधक दोन्ही बाजूनी गोंधळ सुरु झाला.  आत्ता आत्ता आलेलं पोरगं आपल्याला शहाणपणा शिकवतोय असेच भाव दंडवतेंच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

तेवढ्यात दंडवतेंना निरोप आला की, पंतप्रधानांनी भेटायला बोलावलंय. ते राजीव राजीव गांधींच्या संसदभवनातील कार्यालयाकडे तावातावाने जात असताना जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांना भेटले. त्यांच्या रागाचा पारा काय उतरलाच नव्हता. जाता जाता ते रागातच म्हणाले की,

“निरोप आला म्हणून चाललोय, चांगलाच खडसावून येतो आता.”

थोड्याच वेळात ते पंतप्रधानांना भेटून बाहेर आले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते. राग तर कुठच्या कुठं उडून गेला होता. तेव्हा अशोक जैन यांनी सहज त्यांना विचारलं,

“काय, कशी झाली मीटिंग ? चांगलं ठणकावून आलात ना ? असतील ते पंतप्रधान म्हणून काय झालं ? तुमच्यासारख्या आदरणीय आणि जेष्ठ नेत्याला वाट्टेल ते बोलायचं म्हणजे काय ? “

त्यावर दंडवते शांतपणे म्हणाले,

“पण तो वागायला फारच सज्जन आहे. मी त्यांना भेटायला गेलो तर ते म्हणाले, दंडवतेजी, मुझपर इतना गुस्सा क्यू ? आप तो मेरे पितासमान है। एखादबार गलती हो जाती है। आप बडे है, आपको तो माफ कर देना चाहीये। तो हे इतक्या अदबीनं बोलला की, आपण त्याला काही सूनवायला आलोय हे मी विसरूनच गेलो. “

पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीची नम्रता आणि त्यांनी चूक मान्य करून माफी मागण्याचा दाखवलेला मोठेपणा बघून दंडवते विरघळूनच गेले.

हा किस्सा अशोक जैन यांनी आपल्या ‘राजधानीतून ‘या पुस्तकात वर्णन केलेला आहे.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Pratima Joshi says

    दंडवते विज्ञानाचे प्राध्यापक होते. ते मोडकंतोडकं इंग्रजी कसे बोलतील? किस्सा लिहिताना तारतम्य हवेच.

Leave A Reply

Your email address will not be published.