राजीव गांधी जोकर म्हणाले म्हणून मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यायचं ठरवलं होतं

आज कोरोनामुळे जगभरात अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारताचा जीडीपी २३ % नी घसरला आहे. या अभूतपूर्व संकटाच्या परिस्थितीमध्ये भारताचे माजी पंतप्रधान, अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांची आठवण काढली जात आहे.

भारताचे सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांना एकदा पंतप्रधान राजीव गांधी जोकर म्हणाले होते.

काय होत नेमकं प्रकरण?

मनमोहनसिंग हे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे गोल्ड मेडल मिळवलेले थोर अर्थशास्त्रज्ञ आहेत. संयुक्त राष्ट्रामध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांची कीर्ती ऐकून इंदिरा गांधी यांनी त्यांना भारतीय रिझर्व्ह बँके गव्हर्नरपदी नेमणूक केली.

डॉ. मनमोहन सिंग यांची गव्हर्नरपदाची कारकीर्द गाजली. काही कठोर निर्णय घेऊन त्यांनी अर्थव्यवस्थेला सावरण्याच काम केलं. पुढे जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्यांचे सुपुत्र राजीव गांधी पंतप्रधान बनले तेव्हा डॉ. सिंग यांना प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष बनवण्यात आले.

त्याकाळी प्लॅनिंग कमिशन उर्फ नियोजन आयोग ही भारतीय प्रशासनातील सर्वात महत्वाची संस्था होती.

स्वतः पंतप्रधान त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असायचे. देशाचे पंचवार्षिक धोरण कसे असावे, कोणती आर्थिक नीती अंमलात आणली गेली पाहिजे, विकासासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत हे सर्व ही संस्था ठरवत होती.

पंतप्रधान अध्यक्ष असले तरी नियोजनाचे उपाध्यक्ष सर्व धोरण निश्चिती करायचे. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिलेला होता.

मनमोहनसिंग यांनी नियोजन आयोगाचे आव्हान लिलया उचललं. राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये विकासाची दिशा कोणती असली पाहिजे हे मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ठरत होते.

राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते.

राजकारणात त्यांची अनिश्चेने एन्ट्री झाली होती. आईच्या अकाली मृत्यूमुळे देश सांभाळायची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. राजकारणाचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता.

राजीव गांधी स्वतः तंत्रज्ञानप्रेमी होते. येणारे २१ वे शतक हे संगणकाचे असणार आहे हे त्यांना ठाऊक होतं. त्याला सामोरे जाण्यासाठी भारताला आधुनिक बनवण्याचं स्वप्न ते पाहत होते. त्यासाठी धडाडीने निर्णय घेत होते.

पण भारतीय प्रशासनव्यवस्था कित्येक वर्षांपासून निवांतपणाला सोकावली होती.

त्यात एका झटक्यात असे क्रांतिकारी बदल घडणे शक्य नव्हते. पण राजीव गांधी यांच्या तारूण्यसुलभ घाई मुळे त्यांच्यात व प्रशासकिय अधिकाऱ्यांमध्ये खटके उडू लागले होते. या काळात राजीव गांधी यांचा स्वभाव थोडासा हेकेखोर बनला होता.

डॉ.मनमोहनसिंग यांच्या नियोजन आयोगाशी देखील त्यांचे मतभेद होऊ लागले.

परदेशी शिकून आलेल्या राजीव गांधींचा भर नागरीकरणावर होता. संगणकावर आधारित उद्योग, मोठे मॉल्स, अत्याधुनिक हॉस्पिटल, वेगवान रेल्वे, एअरफिल्डची निर्मिती म्हणजे विकास हे त्यांच्या मनात पक्क बसलं होतं.

पण डॉ. मनमोहनसिंग यांनी या विकासात शेतीआधारीत ग्रामीण भाग दुर्लक्षित राहू नये यासाठी दोन्हीचा मेळ घालण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता.

राजीव गांधींच्या निर्णयांना काही वेळा सबुरीचा सल्ला दिला जात होता.

एक वेळ तर हा वाद इतका टोकाला पोहचला की राजीव गांधी यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये डॉ. मनमोहनसिंग यांच्या नियोजन आयोगाची संभावना बंच ऑफ जोकर्स अशी केली.

दुसऱ्या दिवशी देशभरात खळबळ उडाली. मीडिया मध्ये उलटसुलट चर्चा तर्कवितर्क याला उधाण आले.

पंतप्रधान नियोजन आयोगाला जोकर म्हणतात हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं होतं. निश्चितच राजीव गांधी यांनी केलेली ही चूकच होती.

manmohan singh 080219 040328

मनमोहनसिंग यांचे तेव्हाचे सहकारी व पुढे जाऊन भारताचे कॅग बनलेल्या सी.जी.सोमय्या यांनी आपल्या The Honest Always Stand Alone या आत्मचरित्रात हा प्रसंग लिहून ठेवला आहे.

सोमय्या जेव्हा मनमोहनसिंग यांना भेटायला घरी गेले ते कधी नव्हे ते रागावलेले दिसत होते. पंतप्रधानांनी केलेल्या अपमानामुळे नाराज होऊन डॉ.मनमोहनसिंग यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी केली होती.

सोमय्या यांनी त्यांना शांत केलं. तासभर त्यांची समजूत काढली.

“पंतप्रधान अननुभवी आहेत. त्यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले आहे. अशावेळी तुम्ही राजीनामा दिल्यामुळे देशाचं नुकसान होणार आहे. पंतप्रधानांना सोडून देण्यापेक्षा त्यांना समजावून सांगणे ही आपली जबाबदारी आहे.”

सोमय्या यांच बोलणं मनमोहन सिंग यांना पटलं. देशाप्रती असलेल्या कर्तव्यापोटी अपमानाचे हलाहल पचवून त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला. याच काळात त्यांचे काम पाहिलेल्या नरसिंहराव यांनी पुढे पंतप्रधान झाल्यावर भारताची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी मनमोहनसिंग यांना थेट अर्थमंत्री बनवलं.

या दोघांनी १९९१ साली घेतलेल्या जागतिकीकरणासारख्या क्रांतिकारी निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था कायमची बदलून गेली.

या नंतर राजीव गांधींच्या पत्नी सोनिया गांधी यांनी डॉ.मनमोहनसिंग यांच्यावर अखंड विश्वास दाखवला. त्यांची सत्ता आल्यावर स्वतःच्या वाट्याला आलेले पद मनमोहन सिंग यांच्याकडे सुपूर्द केले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.