स्वतः पंतप्रधान राजीव गांधी पुण्यात मॅरेथॉन धावायला उतरले..
राजीव गांधी. भारताला लाभलेले आजवरचे सर्वात तरुण पंतप्रधान. वयाच्या अवघ्या चाळीशीत त्यांना या पदावर बसण्याचा मान मिळाला. अनपेक्षितपणे आणि अनिच्छेने राजकारणात आलेल्या राजीव गांधींनी भारतात टिपिकल राजकारणाचा बाज बदलायचं ठरवलं होतं. यात ते पूणर्पणे अयशस्वी ठरले, ते स्वतःच या राजकारणाचा भाग बनून गेले वगैरे वगैरे गोष्टी जरी खऱ्या मानल्या तरी भारतातील राजकारण्यांना स्मार्ट बनवण्याचं श्रेय त्यांनाच जातं.
राजीव गांधी स्वतः इंग्लंडमध्ये इंजिनियरिंग शिकून आलेले होते. त्यांनी भारतात एअर इंडिया मध्ये पायलट म्हणून नोकरी देखील केली होती. उंचपुरे देखणे राजीव गांधी टेक्नॉलॉजीचे चाहते होते. रेडिओ पासून स्वतःचा लॅपटॉप दुरुस्त करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांना रस होता.
भावाच्या अकाली निधनामुळे त्यांना राजकारणात यावं लागलं. पण त्यांनी आपल्या सोबत उच्चशिक्षित तरुणांना राजकारणात आणलं. लोकांनी त्यांना कॉम्प्युटर टीम म्हणून चेष्टा करण्याचा प्रयत्न केला पण १९८२ सालच्या एशियाड गेम्सच यशस्वी आयोजन करून राजीव गांधींनी आपली क्षमता सिद्ध केली.
पुढे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आली. त्यांनी भारताला एकविसाव्या शतकाकडे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं घोषित केलं. प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचा कॉम्प्युटर असावा, घरी फोन असावा हे त्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. त्यासाठी आपल्या मंत्र्यांनी देखील नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा असा ते आग्रह धरायचे.
राजीव गांधी सुरवातीला राजकारणात आल्यावर एकदा पुण्यात एनडीए च्या दीक्षांत सोहळ्यासाठी आले होते. तेव्हा त्या कार्यक्रमात त्यांची भेट एका उत्साही तरुणाशी झाली. तो देखील एकेकाळी पायलट होता. साधा पायलट नाही तर भारतीय हवाई दलात पराक्रम केलेला पायलट.
नाव सुरेश कलमाडी.
हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर सुरेश कलमाडी यांनी पुण्यात डेक्कनला पुना कॉफी हाऊस नावाच रेस्टॉरंट सुरु केलं होतं. अनेकदा ते तिथे गल्ल्यावर बसलेले दिसायचे. समाजवादी नेते निळूभाऊ लिमये यांच्याकडून त्यांनी हे कॉफी हाउस विकत घेतलेलं.
पुण्यात अनेक दिग्गज मंडळीची पुना कॉफी हाउस उठबस करायची जागा होती.
याच काळात सुरेश कलमाडी यांची ओळख मुंबईचे माजी शेरीफ व जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे संथापक नाना चुडासामा व तेव्हाचे तरुण मंत्री शरद पवार यांच्याशी झाली. पवारांच्या प्रोत्साहनामुळे कलमाडी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकीय कामात सहभागी होऊ लागले.
सुरेश कलमाडी प्रचंड महत्वाकांक्षी होते. काहीच दिवसात त्यांची पुणे युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली.
आणीबाणीच्या काळात पुण्यात आलेल्या मोरारजी देसाई यांच्यावर चप्पल फेकून त्यांनी दिल्लीपर्यंत हवा केली होती. खुद्द संजय गांधी यांनी त्यांना भेटायला बोलावलं होतं. संजय गांधींचा कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखलं जायचं. पुढे शरद पवारांच्या बरोबर त्यांनी पुलोद सरकारवेळी काँग्रेस सोडली.
पण त्या दिवशी एनडीए मधल्या कार्यक्रमात त्यांचे आणि राजीव गांधी यांचे सूर जुळले. दोघेही पूर्वाश्रमीचे पायलट असल्यामुळे त्यांच्या मैत्रीचा तो समान धागा होता.
पुढे कलमाडी राज्यसभेत खासदार झाले. दिल्लीत त्यांची राजीव गांधींशी भेट होत असे. याच काळात त्यांनी पुण्यात मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात केली होती. या छोट्या शहरात खूप मोठा इव्हेंट करण्याचं धाडस त्यानी दाखवलेलं. पुण्याच्या मॅरेथॉनमध्ये परदेशी धावपटूदेखील सहभागी व्हायचे. या कार्यक्रमात आबालवृद्ध पुणेकर उत्साहाने भाग घेत असत. संपूर्ण देशासाठी हा कौतुकाचा कार्यक्रम बनला होता.
स्वतः फिटनेस फ्रिक असणाऱ्या राजीव गांधींना या स्पर्धेबद्दल उत्सुकता होती. एकदा सुरेश कलमाडी यांनी त्यांना पुण्याच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. पंतप्रधानांनी त्यांना होकार दिला.
राजीव गांधी पुण्याला आले. त्यांनी फक्त या मॅरेथॉनला झेंडा दाखवला नाही तर स्वतः ट्रॅक सूट घालून स्पर्धेत धावण्यासाठी उतरले. पुणेकरांना देखील धक्का बसला. स्वतः पंतप्रधान धावत आहेत ही नवलाची गोष्ट होती.
फक्त पुण्यातच नाही तर दिल्लीत देखील जवाहरलाल नेहरू यांच्या जनशताब्दी निमित्त मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते आणि याचे आयोजन देखील राजीव गांधींनी सुरेश कलमाडी यांना दिले होते. सोनिया गांधी, राहुल गांधी या आपल्या परिवारासह राजीव गांधी मॅरेथॉनमध्ये धावले. आरोग्यदायी भारताचा संदेश त्यांनी दिला.
अशाच स्वातंत्र्यदिनाच्या वेळच्या दिल्ली मॅरेथॉनचे व्हिडीओ आपण युट्यूबवर देखील पाहू शकतो.
हे ही वाच भिडू.
- राजीव गांधींनी अडवाणींना आग्रह धरला होता की १० जनपथ निवासस्थान तुम्ही घ्या.
- पुण्याच्या कलमाडींनी कार्यकर्ते नेऊन हरियाणात मारुतीचा कारखाना बंद पाडला
- राजीव गांधींच्या स्वप्नातली डिजिटल क्रांती साकार झाली ती त्यांच्या एका मराठी मित्रामुळे..
- आणि बालेवाडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं श्री शिवछत्रपती स्टेडियम उभं राहीलं..