या बाबांच्या आदेशामुळे राजीव गांधींनी राम मंदिराचा शिलान्यास केला.

आपल्या वादग्रस्त विधानासाठी फेमस असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी काल एका नव्याच वादाला सुरवात केली. त्यांचं म्हणण आहे की

राम मंदिर निर्माणात नरेंद्र मोदी यांचे कोणतेही योगदान नाही. योगदान असेल तर ते राजीव गांधी व नरसिंहराव यांचे योगदान आहे. 

कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंग व इतरांनी देखील याच प्रकारचे विधान केले आहे. नेमक प्रकरण काय आहे समजावून घेऊ.

अयोध्यातील बाबरी मशिदीची जागा ही अनेक शतकापासून विवादित मानली जात होती. साधारण १८५३ साली पहिल्यांदा निर्मोही आखाड्याने ही जागा ताब्यात घेऊन ही प्रभूरामचंद्र यांची जन्मभूमी असल्याचा दावा केला होता. तेव्हा पासून अनेक वाद झाले. ब्रिटीश काळात देखील कोर्ट केसेस लढल्या गेल्या.

पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर डिसेंबर १९४९ रोजी मशिदीत हिंदू संघटनांनी राममूर्तीची प्रतिष्ठापना केली व दावा केला की,

रामलल्ला यांची मूर्ती आपोआप प्रगट झाली.  

यानंतर रामाच्या दर्शनासाठी दूरवरून भक्त अयोध्येला येऊ लागले. येथेच मुस्लीम नमाज देखील पढत होते. दंगलसदृश्य स्थिती उत्पन्न झाली. कोणताही हिंसाचार होऊ नये म्हणून फैजाबादच्या पोलिसांनी मशिदीच्या गेटला कुलूप ठोकले.

हिंदूमुसलमान कोणालाही या विवादित जागेत प्रवेश नाकारण्यात आला.

पुढे अनेक वर्षे बाबरी मशिदीचे गेट बंदच राहिले. हिंदू संघटनानी रामाच्या पूजेसाठी तर मुसलमानांनी नमाज पढण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली. अनेक वर्षे केस चालली.

साधारण १९८४ साली विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमीसाठी आंदोलन छेडले. दुर्दैवाने याच काळात भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. भारतात शिखांविरुद्ध दंगल सुरु झाली.

याच सहानुभूतीच्या लाटेत राजीव गांधी पाशवी बहुमत घेऊन निवडून आले, पंतप्रधान बनले.

त्याकाळात हिंदुत्ववादी संघटनासुद्धा भाजप ऐवजी राजीव गांधी यांच्या पाठीशी उभ्या होत्या. विश्वहिंदू परिषदेने देखील काही काळासाठी आपले आंदोलन मागे घेतले होते.

पण १९८५ साली त्यांनी रामजन्मभूमी आंदोलन पुन्हा जोरात सुरु केले. याच काळात उमेशचंद्र पांडे नावाच्या वकिलाने बाबरी मशिदीत हिंदुना प्रार्थना करू देण्याची परवानगी मागितली. कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल दिला. त्याकाळच्या राजीव गांधी सरकारने या निकालाविरुद्ध अपील केली नाही.

१ फेब्रुवारी १९८६ रोजी बाबरी मशिदीतल्या रामजन्मभूमीचे दार उघडले गेले.

या पूर्वी फक्त एका पुजाऱ्याला आत जाऊन राममूर्तीची पूजा करण्याची परवानगी होती. मात्र आता दार उघडल्यामुळे मुस्लीमांच्यात नाराजी पसरली. अस म्हणतात की मुस्लिमांच्या समाधानासाठी राजीव गांधी यांनी शाहबानो प्रकरणात तीन तलाकच्या बाजूने भूमिका घेतली. अननुभवी राजीव गांधी हे आपल्या सहकाऱ्यांच्या सल्ल्यामुळे एका मागून एक चुका करत चालले होते.

१९८९ च्या निवडणुका जवळ आल्या तसे राजीव गांधी सरकारविरुद्ध वातावरण पेटले होते. बोफोर्स घोटाळयामध्ये त्यांचे नाव समोर आले होते व त्यांच्या मंत्रिमंडळातील व्ही.पी.सिंग यांनी बंडखोरी केली. ही निवडणूक जड जाणार याची राजीवजींना खात्री पटली.

अशात  एकदा त्यांना गृह मंत्री बुटासिंग यांनी आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनच्या देवराहा बाबा यांचे दर्शन घेण्याचा सल्ला दिला.

देवराहा बाबा याचं उत्तरप्रदेश मध्ये खूप मोठ प्रस्थ होतं. लाखो लोक त्यांचे भक्त होते. ते हिमालयातून आले आहेत, ते सिद्ध योगी आहेत, ते कायम शरयू नदीच्या किनारी १२ फुट उंच मचाणावर बसतात अशी त्यांची प्रसिद्धी होती. मोठमोठे राजकारणी, फिल्मस्टार, अधिकारी त्यांचा आशीर्वाद घ्यायचे.

भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी हे देखील देवरहा बाबांचे भक्त होते अस सांगितल जातं.

तेव्हाचे युपीचे मुख्यमंत्री एन.डी.तिवारी यांनी एका पत्रकाराला या काळची एक आठवण सांगितली आहे. ते म्हणतात की बुटासिंग यांनी एका आयएएस अधिकाऱ्याच्या मार्फत पंतप्रधान राजीव गांधी यांची देवराहा बाबा यांची भेट घालून दिली.

६ नोव्हेंबर रोजी राजीव गांधी हे आपली पत्नी सोनिया गांधी यांच्यासमवेत देवराहा बाबा यांच्या भेटीसाठी आले. तेथे बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला,

“बच्चा, हो जाने दो.”

रामजन्मभूमी मध्ये आधारशीला बसवण्याचा कार्यक्रम होणार होता. राजीव गांधी यांचे या गोष्टीवर कोणती भूमिका घेऊ हे नक्की होत नव्हते. पण देवराहा बाबांनी आदेश दिला की शिलान्यास करून टाका. राजीव गांधी यांनी तिथेच आपला निर्णय घेतला.

विहिंपचे अशोक सिंघल हे देवाराहा बाबांचे भक्त होते. त्यांच्या संघटनेतील नेता श्रीशचंद्र दीक्षित यांना बाबांनी निरोप पाठवला की,

” आप निश्चिंत रहें, हमने प्रधानमंत्री से उसी जगह पर शिलान्यास करने को कहा है. जहां आप लोगों ने झंडा गाड़ा है”

तो पर्यंत सरकारचे म्हणणे होते की राम मन्दिरची आधारशीला बसवायची असेल तर ती विवादित जागी बसवू नका. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचे देखील असेच म्हणणे होते. पण देवाराहा बाबा यांनी रामजन्मभूमीतच शिलान्यास होणार असे जाहीर केले.

तिवारींना समजावून सांगण्यासाठी राजीव गांधी यांनी गृहमंत्री बुटासिंग यांना दिल्लीहून लखनौ येथे पाठवले. महामुश्कीलीने त्यांची समजूत घातली गेली. 

९ नोव्हेबर १९८९ रोजी राममंदिराचे भूमीपूजन केले गेले. योगी आदित्यनाथ यांचे गुरु अवैद्यनाथ यांनी पहिली कुदळ मारली. कामेश्वर चौपाल नावाच्या दलित युवकाच्या हस्ते पहिली शिळा रोवली गेली.

आपल्या पासून दूर होणारी हिंदू मते काबीज करण्यासाठी राजीव गांधी यांनी राम मंदिर स्थापनेची पहिली पावले उचलली अशी टीका त्याकाळात केली गेली.

पण निवडणुकीत याचा फायदा त्यांना झाला नाही व पंतप्रधान पदावरून त्यांना पायउतार व्हावे लागले.

पुढच्या जनता सरकारने राम मन्दिर विरोधात भूमिका घेतली. लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढून सगळ्या देशामध्ये राम मन्दिरच्या बाजूने वातावरण बनवले. ६ डिसेंबर १९९२ रोजी हजारो कारसेवकांनी बाबरी मशीद पाडून टाकली.

पुढे अनेक वर्ष चालेल्या कोर्ट केस नंतर सुप्रीम कोर्टाने येथे राम मन्दिर उभारण्यास परवानगी दिली आहे. 

या रामजन्मभूमी आंदोलनामुळे भारताचा राजकीय इतिहास बदलून गेला. अनेक दंगली झाल्या, अनेक लोक मारले गेले, भारतीय जनता पक्षाला राम मंदिर आंदोलनाने सत्तेच्या परिघात आणून सोडले. आज पुरोगामी सेक्युलर मंडळी राममंदिर ही चूक मानतात तर हिंदुत्ववादी राम मन्दिर हे आपल्या युद्धाचा विजय मानतात.

बाबरी मशीद पाडून तिथे राममंदिर बनवणे हे चूक बरोबर काहीही असल तरी त्याच्या निर्माणातल्या पापपुण्याचे भागीदार राजीव गांधी सुद्धा आहेत हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.