शरद पवार आणि राजीव गांधी यांच्या भांडणात बिचाऱ्या सुशीलकुमार शिंदेंचा बळी गेला

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. पुलोदचा प्रयोग फसल्यावर शरद पवार काँग्रेसमध्ये परतले होते. ज्या वसंतदादा पाटील यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला म्हणून चर्चा होती त्यांनी देखील पवारांना माफ केल होतं. त्या वेळच्या बंडातले सहकारी तर पवारांच्या आधीच पक्षात परतले होते.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व राजीव गांधी यांच्याकडे होते. ते तरुण होते, कॉम्प्युटर व इतर टेक्नॉलॉजीचे भोक्ते होते. भारताचं राजकारण उच्चशिक्षित तरुणांनी चालवावे यावर त्यांचा मनापासून विश्वास होता. युवकांनी काँग्रेस पक्ष संगठणेशी सामील व्हावं यासाठी ते प्रयत्नशील होते.

त्यातूनच राजीव गांधी यांनी शरद पवारांना काँग्रेसमध्ये परत आणलं, इतकंच नाही तर त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीदेखील बनवलं.

दोघे समवयस्क होते, विचार देखील मिळतेजुळते होते. त्यांच्यात लगेच मैत्री जमली. मात्र शरद पवारांचं काँग्रेसमधील पुनरागमन पक्षातल्या अनेक नेत्यांना आवडलं नव्हतं. विशेषतः महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक नेते पवारांना मिळत असलेले महत्व अनावश्यक आहे या मताचे होते.

मुख्यमंत्रीपद हा काटेरी मुकुट असतो, यात विरोधकांबरोबर स्वपक्षातील स्पर्धकांशी देखील सामना करावा लागतो. पवारांना याचा अनुभव लवकरच आला.

याला निमित्त ठरले तेव्हाचे पंतप्रधान चंद्रशेखर.

व्ही.पी.सिंग सरकारचा भाजपने पाठिंबा काढून घेतल्यावर जनता दल सेक्युलर या नव्या पक्षाचे चंद्रशेखर हे पंतप्रधान बनले. काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. राजीव गांधींच्या मदतीनेच चंद्रशेखर पदावर आले पण या दोघांच्यात सुरवातीपासूनच विसंवाद होता.

चंद्रशेखर यांची व शरद पवार यांची अनेक वर्षांपासून व्यक्तिगत पातळीवर गाढ मैत्री होती. एकेकाळी काँग्रेसमध्ये तरुण तुर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटाचे ते शिलेदार होते. त्यांचे एकमेकांशी घरगुती संबंध देखील होते.

चंद्रशेखर यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी वेळी शरद पवारांची संपूर्ण फॅमिली दिल्लीला उपस्थित होती.

या कार्यक्रमानंतर शरद पवारांनी मुलगी सुप्रिया सुळे हिने चंद्रशेखर यांना सहज गंमतीने घरी जेवणास या असे निमंत्रण दिले. आश्चर्य म्हणजे चंद्रशेखर यांनी देखील होकार दिला.

तेव्हा मात्र पवारांची पंचाईत झाली.

एक तर शरद पवार यांच तेव्हा दिल्लीत घर नव्हतं, ते महाराष्ट्र सदन येथे उतरत असत. खुद्द पंतप्रधानांनी तिथे जेवायला येणे प्रोटोकॉलला धरून नव्हते. पण चंद्रशेखर म्हणजे मोकळंढाकळ अस्सल ग्रामीण व्यक्तिमत्व. ते कधी अशा प्रोटोकॉलची पर्वा करणारे नव्हते.

कार्यक्रमाला थोडीशी औपचारिकता आणण्यासाठी पवारांनी राजीव गांधी व अन्य मोठ्या नेत्यांना देखील आमंत्रण दिले.

पंतप्रधान महाराष्ट्र सदनात जेवणासाठी आले, तिथे त्यांचे धडाक्यात स्वागत झालं.

मात्र या कार्यक्रमाचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले. शरद पवारांची ही कृती पक्षविरोधी आहे हा समज राजीव गांधींना करून देण्यात आला. पक्ष श्रेष्ठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर नाराज झाले.

पवारांनी दिल्लीत केलेल्या कार्यक्रमाचा निषेध म्हणून महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांनी बंड पुकारलं.

यात सर्वात पुढे होते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे.

खरंतर सुशीलकुमार शिंदे यांना राजकारणात आणण्यात पवारांचा मोठा वाटा होता. पुलोदवेळी वसंतदादा यांचे सरकार पाडण्यात शिंदे पवारांच्या सोबत उभे होते. दोघांच्यात कौटुंबिक पातळीवर दोस्ती होती.

पण दिल्लीतून आदेश आल्यामुळे सुशीलकुमार शिंदेंना नाईलाज झाला होता.

१४ जानेवारी संक्रांतीच्या दिवशी पवारांच्या मंत्रिमंडळातील विलासराव देशमुख, रामराव आदिक,जवाहरलाल दर्डा, शिवाजीराव देशमुख, सुरुपसिंग नाईक, जावेद खान या मंत्र्यांनी मुख्यमंत्री हटवा अशी घोषणा देत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी सुशीलकुमार शिंदे, शंकरराव चव्हाण, बॅ.अंतुले हे काँग्रेसमधील मोठे नेतेदेखील उपस्थित होते.

शरद पवार यांच्यावर मोठं वादळ उद्भवलं होतं. बंड करणाऱ्या सगळ्या नेत्यांनी आपला राजीनामा सादर केला होता. त्यांच्या रोज होणाऱ्या पत्रकार परिषदा पाहून पवारांच्या लक्षात आले की एवढी हिंमत हे मंत्री करत आहेत याचा अर्थ या बंडामागे दिल्लीचा हात आहे.

शरद पवारांनी विधिमंडळातील काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली.

याचे निरीक्षक म्हणून दिल्लीहुन मुपन्नार व गुलाम नबी आझाद हे दोन नेते आले. त्यांनी प्रत्येक आमदाराशी गुप्त चर्चा करून कोणाच्या बाजूने संख्याबळ आहे याचा अंदाज काढला. पवारांचं पारडं जड होतं.

पुढच्या दोनच दिवसात राजीव गांधी यांचा पवारांना फोन आला. त्यांनी विचारलं,

“मुंबईत काय चालू आहे?”

शरद पवार म्हणाले,

“माझ्या पेक्षा तुम्हालाच याची जास्त कल्पना असणार.”

यावर राजीव गांधी दिलखुलासपणे हसले आणि म्हणाले,

“झाड नुसता हलवा, मुळापासून उखडून टाका असं मी त्यांना सांगितलं होतं. झालं गेलं ते बाजूला ठेवूया. मंत्रिमंडळात थोडे बदल करावे लागतील.”

पवारांनी त्यांना निक्षूण सांगितलं,

“मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मलाच पार पाडायची असेल तर मंत्रिमंडळ बदलाबाबत देखील मीच निर्णय घेणार.”

राजीव गांधींनी त्यांच्या मनात काय आहे हे विचारलं. तेव्हा शरद पवार म्हणाले,

“सुशीलकुमार शिंदेंना मी मंत्रिमंडळात स्थान देणार नाही. त्यांच्या मनात माझ्याविषयी विरोध नाही याची मला कल्पना आहे. दिल्लीतून तुम्ही देत असलेल्या सूचनांची ते केवळ अंमलबजावणी करत होते मात्र महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आपल्याच मुख्यमंत्र्यांविरुद्ध राजरोसपणे बोलतो हे खपवून घेणे मला जमणार नाही.”

राजीव गांधी यांनी पवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्या म्हणण्यावर ठाम होते.

बंड करणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळात घ्यायचे असेल तर मी राजीनामा देईन अशी थेट धमकी दिली. दोघांच्यात बराच वाद प्रतिवाद झाला अखेर शिंदे सोडून इतर नेत्यांना मंत्रिमंडळात घ्यायचे या मुद्द्यावर तडजोड झाली.

कोणतीही चूक नसताना बिचाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांचे मंत्रिपद गेलेच याबरोबर त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली.

त्यांच्या जागी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले.

पवारांना विलासराव देशमुख व इतर नेत्यांनी भेटुन आपली बाजू मांडली. दिल्लीच्या नेत्यांनी आमचा वापर केला व तोंडघशी पाडलं हे सांगितलं. पवारांना देखील याची कल्पना होती.

अखेर हे पेल्यातील वादळ शमले. मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर याचा खूप मोठा परिणाम झाला. पवार आणि राजीव गांधी यांचं भांडण त्यांचा बळी घेणारी ठरली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.