राजीव गांधींच्या परदेशातील भाषणात घोळ झालेला पण ते डगमगले नाहीत..!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे भाषण देत होते. तसं तर मोदींच्या भाषणाची तारीफ होत असते. मात्र मोदी बोलत होते आणि अचानक त्यांचा टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग बोलता बोलता अचानक थांबले. काय बोलायचं ते त्यांना सुचेना त्यामुळे ते स्क्रिनच्या उजवीकडेही पाहू लागले. गडबड उडालेल्या मोदींनी कानात हेडफोन लावून आपलं भाषण ऐकू येतं आहे का हे विचारून वेळ सावरून नेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगलेच गोंधळलेले दिसले.

पण अशीच वेळ एकदा राजीव गांधींवर ही आली होती. ही आठवण सांगितलीय पत्रकार अशोक जैन यांनी. 

तर पंतप्रधानांसमावेत काही निवडक पत्रकारांना परदेशी नेलं जातं. तशी जैन यांची निवड मॉरिशस दौऱ्याच्या वेळी झाली. मॉरिशसला जायला जैन फारसे उत्सुक नव्हते. त्यातून गांधी यांचा हा दौरा केवळ दोन दिवसांचा होता. त्यामुळे ते सामील झाले.

पंतप्रधानांसमवेत परदेश दौऱ्यावर जाण्याची ती त्यांची पहिलीच वेळ होती. पंतप्रधानांच्या खास विमानात पत्रकार तासभर आधीच जाऊन स्थानापन्न झाले होते. पंतप्रधान अगदी शेवटच्या क्षणी येणार होते. त्यानुसार ते आले व लगबगीनं विमानात चढणार तोच एक अधिकारी त्यांच्याजवळ आला व काहीतरी कुजबुजला.

राजीव गांधी विचारात पडले, दोन पावलं मागं गेले व एका वरिष्ठ मंत्र्याला त्यांनी बोलावून घेतलं. त्याच्याशी ते काहीतरी चर्चा करू लागले. हे सारं जैन यांना विमानाच्या खिडकीतून दिसत होतं. आणखी दोन चार मंत्री पंतप्रधानांभोवती कोंडाळ करून बोलत होते. काहीतरी अवचित घडलं होतं. हा दौरा होणार की नाही अशी धाकधूक सगळ्या पत्रकारांना वाटू लागली. पण पाचच मिनिटांत राजीवजी आले व विमान सुटलं देखील. 

नंतर कळलं की, बाबू जगजीवनराम अत्यंत गंभीर आजारी होते. त्यांच रुग्णालयात निधन झालंय अशीही कुणकुण होती. पण त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन दोन दिवस जिवंत ठेवा असं सांगण्यात आलं होतं म्हणे. कारण नाहीतर मॉरिशस दौरा रद्द करावा लागला असता. परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं तो दौरा रद्द झाला तर त्याचे विपरीत अर्थ निघाले असते, म्हणून ठरल्याप्रमाणं सर्वजण निघाले.

पंतप्रधानांच्या खास विमानात सारं कसं ऐटबाज, आलिशान असतं. पंतप्रधानांसाठी हवाईफ्लॅटच असतो. दिवाणखाना, शय्यागृह, छोटं ऑफिस, भोजन दालन व लहानसं परिषद दालन असतं. पत्रकार व अधिकारी यांची मागच्या बाजूस बसण्याची व्यवस्था असते. उत्तम सरबराई केली जाते. खास मेनू छापलेला असतो. तोही द्वैभाषिक असतो. म्हणजे फलोंका ताजा रस, उबले हुए अंडे, तली हुई मछलो अशा भाषेत. ज्याला जे हवं ते मागवता येत होतं. सरकारी नियमानुसार मद्य देता येत नसलं, तरी पत्रकारांची ती सोय करण्यात आलेली होती.

मॉरिशसला सगळेजण पोहोचले तेव्हा छान ऊन पडलं होतं. रिवाजानुसार पंतप्रधानांना मानवंदना देण्यात आली. मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांनी राजीवजींचं स्वागत केलं. आता अशा प्रसंगी दोन शब्द बोलण्याची प्रथा आहे, पण राजीव गांधी जवळजवळ अर्धा तास बोलले. त्या वेळी द. आफ्रिकेवर त्यांच्या वंशवादी धोरणाच्या निषेधार्थ भारत व अन्य अनेक राष्ट्रांनी आर्थिक निर्बंध घातले होते. 

आफ्रिकन क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रवेश नव्हता. दक्षिण आफ्रिकेच्या संदर्भात एक जागतिक निधी उभारण्याच्या कामी राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळं ते भाषण करताना वाहवत गेले. आफ्रिकेवर त्यांनी कड़क टीका केली. तिच्याशी आर्थिक संबंध तोडून टाकणं किती आवश्यक आहे हे ठामपणं सांगितलं. त्यांचं हे भाषण ऐकताना मॉरिशसचे पंतप्रधान फारच बेचैन झाले. त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता लोप पावून नाराजीच्या छटा उमटू लागल्या. ते स्वाभाविकही होतं.

कारण मॉरिशसमध्ये साखर उत्पादनाखालोखाल पर्यटन हा महत्त्वाचा उद्योग होता व सर्व बडी बडी हॉटेल्स द. आफ्रिकेतील उद्योगपतींची होती. मॉरिशसमध्ये या क्षेत्रात द. आफ्रिकेनं प्रचंड प्रमाणात पैसा गुंतविला असल्यानं त्यांच्याशी पूर्णत: संबंध तोडणं मॉरिशसला शक्यच नव्हतं. पण हे राजीवजींना ठाऊक नसावं वा त्यांच्या मदतनिसांनी ही माहिती त्यांना दिली नसावी. त्यांच्या भाषणामुळं मोठी पंचाईत झाली. सुदैवानं उत्तरादाखल केलेल्या भाषणात अनिरुद्ध जगन्नाथ यांनी या मुद्याचा उल्लेखच केला नाही.

आमच्या या देशात तुमचं हार्दिक स्वागत असो.

असं औपचारिक बोलून त्यांनी निर्माण झालेला ताण कमी केला. राजीव गांधी अजूनही नवखे आहेत, त्यांच्यात मुत्सद्दीपणाचा अभाव आहे, हे परत एकवार लक्षात आले.

त्याच दिवशी तेथील संसदेत खासदारांपुढं राजीव गांधीचं भाषण होतं. ते तयार केलेलं भाषण होतं. पण तरीही घोटाळा झालाच. राजीव गांधी यांचं भाषण सलग टाईप केलेलं नसे, कागदावर अधेमधे मुद्दे लिहिलेले असत. त्यांचं भाषण चारच पानांचं होतं, पण त्यांच्या हाती देताना सचिवानं गडबड केली होती. पानं नीट लावलेली नव्हती. शेवटचं चौथं पान चुकून आधी म्हणजे, दुसऱ्या पानानंतर एकदम शेवटचं पान लावलं गेलं होतं. राजीवजींनी भाषण वाचायला सुरुवात केली.

ते संपवून खाली बसले तेव्हा एक पान वाचायचंच राहून गेलं हे त्यांच्याच लक्षात आलं. गंमत म्हणजे इतर कोणाच्याही ते ध्यानात आलं नाही वा काही खटकलंही नाही. खरंतर ते भाषण औपचारिक स्वरूपाचं होतं. भारत व मॉरिशसची मैत्री फार जुनी असून ती अशीच टिकून राहो, अशा टाईपचं ते भाषण होतं. त्यामुळे एक पान वाचायचं राहिले यात काहीच बिघडलं नाही. पण राजीव गांधी यांना मात्र रुखरुख वाटत होती. त्यांच्या भाषणानंतर अनिरुद्ध जगन्नाथ आभाराच भाषण करू लागले तेव्हा

“थांबा, थांबा. माझे एक पान वाचायचं राहिलंय.”

असं सांगून राजीवजींनी त्यांना मध्येच थांबवून आपलं राहिलेलं पान  वाचून दाखवलं. एक प्रकारे आपल्या पंतप्रधानांनी जिद्द दाखवलेली. आपण परदेशात आहोत याचं त्यांनी कोणतंही प्रेशर घेतलं नाही. पत्रकार अशोक जैन म्हणतात एखाद्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या उत्साहाने राजीव गांधींनी आपलं भाषण पूर्ण केलं.

मॉरिशसहून परतताना विमानात पंतप्रधानांची रिवाजानुसार पत्रकार परिषद झाली. त्यासाठी परिषद दालनाकडं पत्रकार जाऊ लागले. राजीवजी पॅसेजमध्ये उभे होते. त्यांनी अशोक जैन यांना विचारलं, “काय कसा वाटला दौरा व माझा परफॉर्मन्स ?”

अशोक जैन यांच्या मते राजीव गांधी राजकारणात नवखे होते. त्यांच्या चुकाही होत होत्या मात्र त्यांनी चुका कधी लपवल्या नाहीत.मॉरिशस मध्ये  भाषणात झालेली चूक त्यांनी मोठ्या उमदेपणाने भरून काढली, भारताचं नेतृत्व योग्य हातात आलंय हे त्या दिवशी सिद्ध झालं होतं.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.