विमानतळावर उभं राहून राजीव गांधींनी पाटलांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा लिहून घेतला

राजीव गांधी. पायलट ते राजकारणी असा प्रवास. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने ऐतिहासीक ४०३ जागा जिंकल्याची नोंद आहे. भारताचे ६ वे आणि सर्वात तरुण पंतप्रधान. संगणक क्रांती, टेलिकॉम क्रांती यासाठी त्यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागते. शांत आणि सुस्वभावी अशी प्रतिमा.

पण याच राजीव गांधी यांचा काहीसा लहरी आणि तडकाफडकी निर्णय घेण्याचा स्वभाव अशी ही काहीशी ओळख त्यांच्या पक्षात होती. आणि याची बड्याबड्यांना आणि काँग्रेस पक्षाला झळ बसली होती.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९८३ साली हैदराबाद विमानतळावर आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री टी. अंजैया यांचा राजीव गांधी यांनी जाहीर पाणउतारा केला. इंदिरा गांधींनी अंजैया यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेतल्यावर एन. टी. रामाराव यांनी तेलुगू भाषिकांच्या ‘आत्म गौरवम’चे पर्व सुरू करीत काँग्रेसला आंध्रातून दोन दशके हद्दपार केले.

असाच काहीसा तडकाफडकी निर्णय त्यांनी १९९० मध्ये कर्नाटकमध्ये घेतला होता. ज्यामुळे लिंगायत समाज कॉंग्रेसपासून दुरावलाच पण पुढे कर्नाटकात स्वबळावर सत्तेत येण्यासाठी काँग्रेसला १० वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

कर्नाटक राजकारणचा सामाजिक प्रारुपाने विचार केला तर ते मुख्यत्वे अवलंबुन आहे ते लिंगायत आणि वोक्कलिगा या दोन समाजावर.

द इकोनॉमिक टाइम्सच्या आकडेवारीनुसार, लिंगायत समाजाचा प्रभाव २२४ विधानसभा मतदारसंघांपैकी १०० मतदारसंघावर स्पष्टपणे जाणवतो. आतापर्यंत या समुदायाचे ९ मुख्यमंत्री झाले, तसेच पक्ष कोणताही असो मंत्रिमंडळात लिंगायत चेहऱ्यांचा समावेश दिसतोच.

८० च्या दशकात लिंगायत समाजाने तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडेंना समर्थन दिले होते. तर त्यानंतर १९८९ मध्ये वीरेंद्र पाटील यांना समर्थन दिले होते. म्हणजे लिंगायत ज्यांच्या बाजूने त्यांचा मुख्यमंत्री असे अलिखित समीकरण तयार झाले होते.

त्यामुळे कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाला दुखवण्याचे धाडस कोणताही राजकीय नेता करत नाही. पण हेच धाडस राजीव गांधी यांनी केले.

गोष्ट सुरु होते १९८९मध्ये. राज्यात जनता दलाचे युतीमध्ये सरकार होते आणि मुख्यमंत्री होते रामकृष्ण हेगडे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका चालू होत्या. निकाल लागल्यानंतर देशभरात कॉंग्रेस मागे पडला होता. जागांची संख्या कमी झाली होती. केंद्रातील सत्ता गमावली होती.

मात्र त्याचवेळी कर्नाटकमधील कॉंग्रेसची कामगिरी जोरदार होती.

राज्यातल्या २८ पैकी २७ जागा कॉंग्रेसने जिंकल्या, तर जनता पक्ष केवळ एक जागा जिंकू शकली. १९८९ साली कॉंग्रेसच्या या ऐतिहासिक यशातही राज्यातील लिंगायत समाजाने कॉंग्रेसच्या बाजूने मतदान केल्याचे मानले जात होता. आणि या विजयाचे नायक होते लिंगायतांचे नेते विरेंद्र पाटील.

वीरेंद्र पाटील हे कर्नाटकचे अतिशय आदरणीय नेते. आणि विशेष म्हणजे ते लिंगायत समाजातील होते. पाटील पुर्वी जनता पक्षामधील. जनता पक्षाच्या कारकीर्दीत ते मुख्यमंत्रीही झाले. १९७८ च्या चिक्कमंगलूरच्या प्रसिद्ध लोकसभा पोटनिवडणूकीत ते इंदिरा गांधींच्या विरोधात उभे होते. ती निवडणूक इंदिरांनी जिंकली तेव्हा जनता पक्षामध्ये त्यांच्या विरोधात अंतर्गत वादाला सुरुवात झाली.

संतप्त पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देत काही काळानंतर इंदिरा कॉंग्रेसचे सदस्यत्व घेतले.

१९८९ मध्ये जेव्हा राजीव गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने केंद्रात झालेल्या निवडणुका गमावल्या तेव्हा वीरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भव्य विजय मिळविला. २२४ जागांपैकी १७८ जागांवर विजय मिळवत वीरेंद्र पाटील हे राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

लिंगायत पट्ट्यांमध्ये मुंबई-कर्नाटक आणि हैदराबाद-कर्नाटकमध्ये कॉंग्रेसला सर्वसमावेशक विजय मिळवून देण्याची लिंगायत्यांमध्ये पाटील यांची लोकप्रियता होती.

राज्यातील समीकरण व्यवस्थित बसले होते. पण एक वर्षभरातच ऑक्टोंबर १९९०मध्ये वीरेंद्र पाटील यांची प्रकृती खालावली. सोबतच त्याचवेळी चालू असलेल्या अडवणींच्या कर्नाटकमधील रथयात्रेनंतर दावणगिरीमध्ये जातीय दंगली उसळल्या आणि त्या आटोक्यात आणण्यात त्यांना अपयश आले होते.

त्यानंतर राजीव गांधी यांनी विरेंद्र पाटील यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी आणि दंगलीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कर्नाटकला भेट दिली. पाटील यांना भेटल्यानंतर त्यांच्या निवासस्थानावरुन दिल्लीला परतण्यासाठी ते एचएएल विमानतळावर आले

पण निवासस्थानपासून विमानतळावर जाईपर्यंत राजीव यांच्या काय मनात आले न् त्यांनी एक-दोन दिवसांत कर्नाटकला नवीन मुख्यमंत्री मिळेल अशी धक्कादायक घोषणा केली.

नुसती घोषणाच नाही केली तर वीरेंद्र पाटील यांना विमानतळावर बोलावून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले.

यानंतर अफवा पसरली की राजीव गांधी पाटील यांच्याशी काहीच बोलले नाही आणि काही मिनिटांतच त्यांना दूर करण्याचा निर्णय घेतला. सोबतच दोन दिवसांनंतर राजीव गांधींनी एस.एन. बंगारप्पा यांना राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. या घोषणेनंतर लिंगायत समाजालाही मोठा धक्का बसला.

याचा थेट परिणाम १९९१च्या लोकसभा निवडणुकीत. वीरेंद्र पाटील यांनी निवडणुकीत लिंगायतांचा अपमान म्हणून हा मुद्दा प्रसिद्ध केला. तेव्हापासून लिंगायत समाजाने पाठ फिरवली. आणि भाजपला कमळ जिंकण्यासाठी मदत झाली.

बिदर, तुमकुरु, बेंगळुरू दक्षिण आणि मंगलोर मतदारसंघात भाजपने बाजी मारली. त्याचवेळी, भाजपाचे बी एस येडियुरप्पा लिंगायत समाजात अधिक लोकप्रिय झाले, तर दिवंगत खासदार अनंत कुमार यांचे अटल-अडवाणी यांच्याशी असलेले चांगले संबंध.

त्यानंतरच्या १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत देवेगौडा यांच्या पक्षाने ११५ जिंकल्या आणि सत्ता स्थापन केली. भाजपाने ४० जागा जिंकल्या. तर अवघ्या ३४ जागा जिंकत कॉंग्रेस मुख्य विरोधी पक्ष देखील होवू शकला नाही.

गुजराल, अजैंया, पाटील यांचे राजीनामे हे काँग्रेसला पिछाडीवर टाकणाऱ्या अनेक कारणांपैकी हे एक. कर्नाटक राज्य स्वातंत्र्यानंतर १९५२ ते १९८९ पर्यंत कॉंग्रेससाठी एक अभेद्य किल्ला राहिला होता. या काळात लोकसभेच्या बहुतांश निवडणुका कॉंग्रेसच्या उमेदवारांनी जिंकल्या. लिंगायतांना पाठिंबा देत असेपर्यंत कॉंग्रेसचा किल्ला, विशेषत: राज्यात, अभेद्य होता. पण राजीव गांधींच्या पाटील यांना हटवण्याच्या घोषणेनंतर हा मतप्रवाह येडियुरप्पांच्या नेतृत्त्वाखालील भाजपकडे वळला आणि भाजपला ‘गेट वे टू दक्षिण’ ओपन झाले.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.