भारतात निवडणुकीसाठीची वॉर रूम ही कन्सेप्ट सगळ्यात आधी राजीव गांधींनी आणली

निवडणुका जवळ आल्या की, सगळ्यात जास्त कोण ऍक्टिव्ह होते ? आता हा डायरेक्ट प्रश्न विचारला कारण विषयच तसा आहे. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आणि आजचा विषय म्हणजेवॉर रूम’.

 इलेक्शन आणि राजकीय पक्षांच्या वॉर रूमचा संबंध तसा फार जवळचा आहे.  थोडक्यात निवडणुकीचा प्रचार, पक्षांच्या जाहिराती कशा बनतात हा कायमच औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. संपूर्ण प्रचाराच्या काळात पक्षाचे कामकाज चालते ते म्हणजे वॉर रूम मधून. पण या वॉर रूमची कंसेप्ट नेमकी कुणी आणली ?

राजीव गांधींनी सर्वप्रथम हि पक्षाची देखील वॉर रूम असावी अशी संकल्पना मांडली.  राजीव गांधी असतांना या वॉर रूम ची सुरुवात झाली….पण कशी सुरु झाली त्यामागचे एक स्टोरी आहे.

२४ अकबर रोडच्या प्रांगणात, कँटीन शेजारी, अवघडलेल्या अवस्थेत, गर्दी अन् पसाऱ्याने व्यापलेली एक खोली. कंट्रोल रूम तिचे नाव.

रात्रंदिवस कामात व्यस्त असलेल्या या खोलीत, सैन्यदलातला एक निवृत्त मेजर, त्याचा सचिव, एक नॉन कमिशन्ड अधिकारी आणि इतर तीन लोक, मुख्यालयात सतत येणारे फोन, फॅक्स मेसेजेस रिसिव्ह करतात. त्यांना उत्तरे देतात, देशभरातल्या निरोपांची देवाण घेवाण करीत, कायम कम्प्युटरवर खिळलेले असतात. ही खोली कधीही बंद नसते. 

२४ अकबर रोडच्या मुख्यालयात, २४ तास कार्यरत असलेली एक कंट्रोल रूम असली पाहिजे, ही कल्पना राजीव गांधींना सर्वप्रथम सुचली १९८९ साली…..ते हि काँग्रेस सत्तेवर नसतांना.

मुख्यालयाच्या समोरच भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांचे निवासस्थान होते. एके दिवशी कोणत्या तरी निमित्ताने राजीव गांधी तिथे गेले. तिथे योगायोगाने त्यांचा परिचय मेजर दलबीरसिंग नावाच्या शीख तरूणाशी झाला.

सैन्यदलातून निवृत्ती घेऊन दलबीर आपल्या वडीलांच्या यशस्वी बांधकाम व्यवसायात त्यांना मदत करीत होता. व्यावसायिक कौशल्य असलेल्या प्रोफेशनल्सनी पक्षाचे दैनंदिन कामकाज  सांभाळावे, फौजेतून लवकर निवृत्ती घेणाऱ्या शिस्तबद्ध तरुणांना, काँग्रेस पक्षाच्या कामात दाखल करून घ्यावे, असे राजीव गांधींना मनोमन वाटत असत.

त्यांच्या या मिशनला मदत करण्यासाठी, राजीवच्या कल्पनेतल्या ‘कंट्रोल रुम’चे व्यवस्थापन करण्यासाठी, दलबीरसिंग सारखा फौजी तरूण तत्परतेने तयार झाला. 

ही बातमी ऐकल्यावर, काँग्रेसच्या एक्स सर्व्हिसमेन सेलचे काम पहाणारे निवृत्त एअर व्हाईस मार्शल आणि राजेश पायलट दोघांनाही आश्चर्यच वाटले.  दलबीर म्हणाला, मी स्वतः लगेच जॉईन व्हायला तयार आहे, पण माझी एक विनंती आहे. 

काँग्रेसच्या दैनंदिन कामकाजाच्या नियोजनासाठी, साधन सामुग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काँग्रेसवर प्रेम असलेल्या हवाई, नाबिक व सैन्यदलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांची एक टीम राजीवजींनी तयार केली पाहिजे, जी या मिशनला सर्वतोपरी साथ देईल. 

त्याचा उत्साह पाहिल्यावर राजीव दलबीरला म्हणाले, तू या कल्पनेवर आणखी सखोल विचार कर आणि मला पुन्हा भेट.

दलबीर या ऑफरने इतका सुखावला की त्या रात्री त्याला झोपच लागली नाही. 

दुसऱ्या दिवशी सकाळीच राजीव गांधींना आपल्या प्लॅनसह तो भेटला. दलबीरचा प्लॅन पाहून राजीव गांधी खुश झाले. २४ अकबर रोडच्या मुख्यालयात, या खोलीत तेव्हापासून एखाद्या चुंबकासारखा तो चिकटलेला होता. कुशल व्यावसायिकांची टीम तयार करणे हे काही सोपे काम नव्हते. 

बाहेरच्या जगाला कांग्रेस मुख्यालयातल्या या कंट्रोल रूमचे महत्व कधी लक्षातच आले नाही. राजीव गांधींच्या मार्गदर्शनाखाली या रूमने मात्र एक विशाल नेटवर्क तयार केले. संचार साधनांचा सुरेख वापर करून जनसंपर्काच्या उत्तम सुविधा कार्यरत केल्या.

 इथल्या टीमने उभ्या आडव्या माहितीचे सारे प्रवाह त्याच्या डेटासह गोळा केले. झटपट निर्णय घेऊन हालचाली करायला, काँग्रेस नेतृत्वाला त्यामुळे मोठी मदत होऊ लागली. 

सत्तेत नसतांना देखील काँग्रेस पक्ष फॉर्म मध्ये होता ते याच वॉर रूम मुळे…

उदाहरणच द्यायचे तर काँग्रेस पक्ष १९८९ ते ९१ आणि १९९६ ते २००३ केंद्रात सत्तेत नव्हता. या काळात कंट्रोल रूम हा काँग्रेस नेतृत्वासाठी माहितीचा में सोर्स होता. जगभरातल्या महत्वाच्या नेत्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणते महत्वाचे निर्णय घेतले, कोणाचे निधन झाले, कोण प्रकाशझोतात आले, अशा सान्या गोष्टींची माहिती कंट्रोल रूमच त्यांना पुरवीत असे.

वेळीच हस्तक्षेप करून कोणत्याही स्थितीत प्रश्न मार्गी लावण्यात कंट्रोल रुमचा हातखंडा होता, अशी अनेक उदाहरणे आहेत.

जिल्हा व प्रदेश काँग्रेस समित्यांचा २४ अकबर रोडच्या मुख्यालयाशी थेट संबंध प्रस्थापित व्हावा, यासाठीही कंट्रोल रुमने मोठी कामगिरी बजावली आहे. अ.भा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्याचे कार्यक्रम आणि कार्यालयीन रेकॉर्डस्, कंट्रोल रूम द्वारेच संबंधित राज्य आणि जिल्हा काँग्रेस समित्यांना पाठवले जातात. इतकेच नव्हे तर या समित्यांच्या लहान मोठ्या समस्या सोडवणे, पक्षाची सारी परिपत्रके, आवश्यक माहिती, इत्यादी सारे काही, आधुनिक संचार माध्यमांद्वारे कंट्रोल रूमतर्फेच सर्वांना पाठवले जाते.  

काँग्रेस अध्यक्षांचे लक्ष वेधण्यासाठी, त्यांना हवी माहिती पुरवण्यासाठी, तत्पर असलेली कंट्रोल रूम, अल्पावधीत धांडोळा घेऊन सहजपणे ती माहिती त्यांना पुरवतात. अनेक वेळा गोपनीयता आवश्यक असते. 

विधानसभेच्या अथवा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी, पक्षाच्या निरीक्षकांना सहा महिने अगोदर देशाच्या विविध भागात, प्रत्यक्ष स्थितीची चाचपणी करण्यासाठी पाठवले जाते. अशावेळी कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीचा या निरीक्षकांना मोठा आधार वाटतो. 

शेकडो निरीक्षकांचे राज्यवार दौरे आखणे, दौऱ्याचे तपशील ठरवणे, प्रत्येकाकडून मिळालेला अहवाल केंद्रीय निवडणूक समितीकडे वेळेपूर्वी पोहोचवणे, याखेरीज पक्षासाठी प्रचार करणाऱ्या वक्त्यांची, खास प्रचारकांची नावे ठरवणे, त्यांना भाषणासाठी (स्थानिक संदर्भासह) मुद्दे पुरवणे, प्रत्येक राज्याच्या राजकीय स्थितीचे ताजे तपशील मिळवून, त्याची माहिती संबंधित नेत्यांना तत्परतेने पुरवणे, पक्षाचे प्रचार साहित्य गोळा करून  राज्या राज्यात पोहोचवणे, अशी अनेक कामे कंट्रोल रूमतर्फे पार पाडली जातात. आश्चर्याची बाब म्हणजे ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना देखील, वृत्तवाहिन्यांचे टॉक शो अथवा वादविवादात भाग घेण्यापूर्वी, खास मुद्यांची कंट्रोल रूमतर्फे शिदोरी त्वरित पुरवली जाते.

काँग्रेसच्या वॉर रूमवर इतर दुसऱ्या जबाबदाच्याही सोपवलेल्या असतात. 

देशाच्या विविध भागात कुठे महापूर तर कुठे दुष्काळ, कुठे भूकंप तर कुठे चक्रीवादळ, अशा नैसर्गिक आपत्तीच्या अनेक घटना घडत असतात. अशावेळी अखिल भारतीय काँग्रेसच्या आपत्ती निवारण समितीला मदत करण्याची महत्वाची जबाबदारी वॉर रूमवर सोपवण्यात आली होती. 

वॉर रूमशी संलग्न टीम आपद्ग्रस्तांसाठी सर्वप्रथम निधी व आवश्यक वस्तू गोळा करते, काँग्रेस पक्षातर्फे ही मदत आपद्ग्रस्तांपर्यंत वेळेवर आणि सुरक्षितरित्या पोहोचवण्याची व्यवस्था जलदगतीने करणे अपेक्षित असते. केंद्रात पक्ष सत्तेवर असला, तर ही जबाबदारी अधिकच महत्वाची होऊन जाते.

त्यानंतर काँग्रेसच्या कामकाजाची पद्धत पाहता आणि त्यांनी समोर आणलेली वॉर रूम ची संकल्पना सर्वानीच अनुसरली. आता भाजप सत्तेवर आहे आणि २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना निवडून आणण्यात महत्वाची जबाबदारी वॉर रूम ने बजावलेली. 

 हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.