राजीव गांधींच्या मारेकऱ्यानं तुरुंगातून परीक्षा देत टॉप केलं होतं
भारताच्या राजकारणातील ख्यातनाम व्यक्तींचं नाव विचारलं तर गांधी घराण्यातील दोन व्यक्तींचं नाव नक्कीच वरती येतं, ते म्हणजे इंदिरा गांधी आणि दुसरे राजीव गांधी. यांच्यातील अजून एक साम्य म्हणजे दोन्ही नेत्यांची हत्या करण्यात आली होती. इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्याच सुरक्षाकर्मीकडून झाली तर राजीव गांधी यांची हत्या घोळक्यात करण्यात आली. या दोन्ही नेत्यांची हत्या झाली तेव्हा ते पंतप्रधानपदी होते.
१९९१ चं ते साल. महिना मे, तारीख २१ आणि वेळ सकाळची १०.२१. जेव्हा राजीव गांधींची हत्या करण्यात आली. ठिकाण होतं तामिळनाडू चेन्नईजवळील श्रीपेरुंबदुर.
राजीव गांधी एका कार्यक्रमाला गेले होते. त्यांच्या आजूबाजूला मोठा घोळका झाला. ज्यात काही शाळकरी मुली आणि महिला भेटायला आल्या होत्या. तेवढ्यात एक मुलगी राजीव गांधींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकली आणि तिच्या कपड्यातील आरडीएक्सने भरलेल्या बेल्टचं डिटोनेटर दाबलं. अचानकच मोठा स्फोट झाला… राजीव गांधी यांच्यासहित जवळपास १५ जणांचा जागीच मृत्यू झाला.
देशातील एवढ्या मोठ्या व्यक्तीची हत्या होणं, सगळ्यांसाठीच मोठा धक्का होता. राजीव गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनेक ताशेरे ओढले गेले. तपास पथक जोरदार कामाला लागलं. लहानातील लहान धागेदोरे शोधण्यात आले आणि या गंभीर कटाचा भाग असलेल्या आरोपींना तामिळनाडू सरकारने अटक केली. या प्रकरणी मुरुगन, संथन, पेरारिवलन, जयकुमार, रॉबर्ट पायस, रविचंद्रन आणि नलिनी या सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
यातील नलिनी श्रीहरन यांना गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पॅरोल मंजूर करण्यात आला होता. तर आता यातील दुसरा आरोपी एजी पेरारिवलन याचा जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलाय. मात्र कोर्टाच्या या निर्णयाला केंद्र सरकारने विरोध केलाय.
एजी पेरारिवलन यांची पार्श्वभूमी
१९९१ पर्यंत पेरारिवलन तामिळनाडूतील जोलारपेट शहराचे रहिवासी होते. त्यांचं घरचं नाव अरिवू. नुकतंच इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला होता आणि पुढचं शिक्षण चेन्नईमध्ये घ्यायच्या विचारात ते होते. मात्र तेवढ्यात राजीव गांधी हत्येमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांचं वय फक्त १९ होतं.
सीबीआयने पेरारीवलन यांच्यासह इतर ४१ लोकांविरुद्ध टेररिज्म ॲंड डिसरप्टिव एक्टिविटीज (प्रिवेंशन) ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. राजीव गांधी ज्या आत्मघातकी बॉम्बने मारले गेले होते त्यासाठी ९ व्होल्टची बॅटरी मारेकऱ्यांना पेरारीवलन यांनी पुरवली होती, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. यासोबतच राजीव गांधींची हत्या करणाऱ्या मास्टरमाईंडच्या संपर्कातही ते होते, असा दावा सीबीआयने केला आहे.
पेरारिवलन यांनी कबुल केलं होतं की, त्यांनी बॅटरी विकत घेतली होती परंतु ती कोणत्या कामासाठी वापरण्यात येणार आहे, त्याचा थोडा देखील अंदाज त्यांना नव्हता.
संपूर्ण सखोल चौकशी दरम्यान त्यांच्या या विधानावर पेरारीवलन आणि त्यांचं कुटुंबीय ठाम होते. शिवाय आजही त्यांचं म्हणणं आहे की, पेरारिवलन यांना काहीच माहित नव्हतं. इतकंच नाही तर पेरारिवलन यांना बॅटरीच्या वापराबाबत कोणतीही माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
पेरारिवलन यांचा जेलमधील प्रवास
पेरारिवलन यांना अटक झाली तेव्हा त्यांचं शिक्षणाचं वय होतं. अभ्यासात ते खूप हुशार होते. याच आवडीमुळे तुरुंगात आल्यानंतरही त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. भारतीय संविधानाने कैद्यांना देखील शिक्षण घेण्याचा अधिकार दिलाय. त्यानुसार तुरुंगातूनच त्यांनी १२ वीची परीक्षा दिली, ज्यामध्ये ९१.३३% अशा गुणांसह उत्तीर्ण झाले. तुरुंगातून परीक्षा दिलेल्या आणि त्यात टॉप केलेल्या लोकांमध्येही पेरारिवलन यांचं नाव टॉपला येतं.
यानंतर तामिळनाडू मुक्त विद्यापीठाच्या पदविका अभ्यासक्रमात त्यांनी सुवर्णपदक मिळवलं. अभ्यास सुरूच ठेवला आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (बीसीए) आणि नंतर संगणकातच मास्टर्स केलं.
पेरारिवलन तुरुंगात त्यांच्या इतर सोबतींसह एक म्युजिक बँड चालवतात. वयाची जवळपास ५० शी गाठायला येणाऱ्या या व्यक्तीच्या तुरुंगातील प्रवासात त्यांच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झाल्याचं ऐकण्यात नाहीये. याचमुळे त्यांच्या खटल्यात होणाऱ्या कुचकामीपणामुळे न्यायालयाने २०२० मध्ये नाराजी व्यक्त केली होती.
पेरारिवलन यांनी अनेकदा पॅरोलसाठी मागणी केली. तेव्हा २०२० च्या ऑक्टोबरमध्ये न्यायालयाने त्यांना ती देऊ केली होती शिवाय तब्येत खराब असल्याने ती वाढून देखील देण्यात आली होती.
आता काय झालंय?
एजी पेरारिवलन यांना जामीन सर्वोच्च न्यायालयाने आज मंजूर केला. शिवाय यावेळी सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलंय की, याचिकाकर्त्याने त्याचं वागणं, त्याची खराब प्रकृती याविषयी पुरेसे पुरावे सादर केले आहेत. त्याने ३० वर्षांहून अधिक काळ कारागृहात काढलेला आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती लक्षात घेता त्याची जामिनावर सुटका करावी, असं आमचं मत आहे.
न्यायाधीश एल नागेश्वर राव आणि न्यायाधीश बी आर गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय.
एजी पेरारिवलन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अपील देखील करण्यात आली होती की त्यांची शिक्षा राज्य सरकारने माफ केली आहे. मात्र, यावर राज्यपालांकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राज्यपालांना निर्णय घेण्यासाठी इतका वेळ का लागतोय,असा सवाल न्यायालयाने २०२० मध्ये केला होता.
दरम्यान, पेरारिवलन यांच्या जमिनीच्या निर्णयाला केंद्र सरकारनं विरोध केला आहे. तेव्हा त्यांच्या जमिनीच्या प्रकरणात पुढे काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
हे ही वाच भिडू :
- राजीव गांधींच्या मारेकऱ्याला प्रियांका गांधी भेटल्या अन तिला माफ देखील केलं होतं
- स्वतः पंतप्रधान राजीव गांधी पुण्यात मॅरेथॉन धावायला उतरले..
- रामायणातील रामाच्या लोकप्रियतेचा फायदा खुद्द राजीव गांधी यांनीही घेतला होता