त्याच्या सुपरहिट पिक्चरनेच त्याचा घात केला…

ऋषी कपूर म्हणे ‘आ अब लौट चले’ च्या पूर्व प्रसिद्धीच्या वेळी म्हणाला होता,

चिम्पू (राजीव कपूर)ने ४८ की ७२ तास खपून सिनेमा एडिट केला होता.

हे सांगून माझा मित्र जोरात हसायला लागला. राजीव कपूर आताच्या उदय चोप्रा वगैरे प्रभृतींचा आद्य गुरू, ४८ तास दारुशिवाय म्हणजे कपुरांना REHAB च जणू वगैरे म्हणत आम्ही अजून हसायला लागलो.

पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट हेच खरं. काही संबंध, काही माहिती नसताना राजीव कपूर फारशी मोठी कारकीर्द न करता फक्त कपूर फॅमिली पॅक साईझच्या हिशोबात तेवढा प्रसरण पावला हे आम्हाला हसायला पुरेसं होतं.

मोठ्या लोकांची काही मुलं ही त्यांची मुलं आहेत असं आपल्या लक्षात आल्यावर उगाच त्यांच्याबद्दल सहानुभूती दाटून येते. (अरबाज, सोहेल ही सलीम साबचीच मुलं आहेत हे कधी मधेच लक्षात आल्यावर exactly असंच वाटतं.)

आज राजीव कपूर गेल्याची बातमी वाचल्यावर खरं सांगतो जीव थोडा चुटपुटला. अपराधीपणाची हलकीशी भावना आली. नाही म्हटलं तरी आपण किती लवकर लोकांवर शिक्के मारतो. जजमेंटल बनतो.

राजीव हा राज कपूरचं शेंडेफळ. या कपुरांचा फॅमिली ट्री लोक आपल्या स्वतःच्या कुळापेक्षा अधिक पाठ करून ठेवत असावेत. अरे ऋषी सेकंड नंबर रे … रणधीर पैला… (राज कपूरला दोन मुलीही आहेत हे बऱ्याच लोकांच्या गावी नसतं.)

असाच हा चिम्पू कपूर अचानक कुठून तरी १९८३ च्या एफ सी मेहराच्या ‘एक जान हैं हम’ मधून आला.

त्याच वर्षी आलेल्या आणि सुपरहिट ठरलेल्या धर्मेंद्रच्या मुलाच्या बेताब नंतर महिन्याभरात. खरं तर बेताब पेक्षा आम्हा शाळकरी मुलांमध्ये एक जान हैं हम जास्त आवडता होता. एक तर राजीव कपूर त्या जुन्या हिरो शम्मी कपूर प्रमाणे DITTO दिसत असल्याचा धक्का होता.

त्यात एक जान हैं हम हा (इंग्रजी सिनेमाची कॉपी) कॉलेज लाईफ, गोड गोड हिरो हिरॉईनच्या लव्ह हेट लफडयात तात्पुरता गैरसमज, थोडी फायटिंग आणि मस्त गाणी असा फक्कड बेत. याद तेरी आयेगी, नाम मेरा आणि सगळ्यात आवडतं ते दिल लगाना तुम क्या जानो.त्यातला तो काही न कळता खूप गोड वाटणारा शब्द ता रा पा पा चीकीरी रिक्का!

या शब्दाला काही अर्थ नाही पण शाळेत असताना एक जान हैं हम ची गाणी तुफान गाजू लागली आणि राजीव चिम्पू कपूर आपल्या बापाच्या चित्रपटातून न लाँच होता, गाजावाजा न करता ही लोकप्रिय झाला. कुमार गौरव, संजय दत्त, सनी देओल यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला.

राजीव कपूरचं सगळ्यात मोठं भांडवल होतं काका शम्मीशी अत्यंत जवळची ओळख सांगणारा चेहरा.

निर्माते, पब्लिक यांना त्याने दुसरा शम्मी बनायला हवं होतं आणि त्यानेही तो यशाचा सोपा उपाय म्हणून पहिला मार्ग निवडला असावा. तो तसाच आळोखे पिळोखे, तसंच झटके मारत उड्या मारत, चेहरा विचित्र करताना दिसतो सुरुवातीला.

पण कसं आहे. शम्मी कपूर हा मुदलात एक विचारी अभिनेता होता. आपल्या काकाची नक्कल मारताना त्यात आपलं काही ऍड करायला हवं हे त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटात चिम्पूने लक्षात घेतलेलं दिसत नाही.

पण तो काळ तसाही नव्या दमाच्या नायकांना संधी देण्याचा होता. जॅकी आणि गोविंदा येत होतेच. राजीव सुद्धा आसमान, जबरदस्त मध्ये लक्ष वेधून घेतच होता. जबरदस्त मध्ये त्याला ‘जब चाहा यारा तुम ने’ सारखं मस्त गाणं आहे. खरंतर जबरदस्त ची सगळी हिट गाणी त्याचीच आहेत. लावा मध्ये त्याचा रोल चांगला होता. तिकडे शम्मी थोडा कमी होता. डिंपल बरोबर ‘जीने दे ये दुनिया’ सारखं नितांत सुरीलं गाणं त्याला मिळालं होतं. सगळं ठीक तर होतं.

मला वाटतं ‘राम तेरी गंगा मैली’ त्याने करायलाच नको होता. राज कपूरने तो सिनेमा निव्वळ मंदाकिनी वर हिट केलाय हे माझं मत.

गाणी हिट असती तर जमाने को दिखाना हैं फ्लॉप नसता ना सागर. होय, सागर त्या वेळी राम तेरीला समकालीन असूनही मागे पडला होता, आरडी ने सुंदर संगीत देऊनही, कमल ने उत्कृष्ट काम करून ही. कदाचित डिंपल पेक्षा मंदाकिनीचं अंगप्रदर्शन ज्वलंत असावं. पण राम तेरी मध्ये राजीव कपूरचा रोल अगदी पपलु होता आणि हिरो म्हणून त्याचं अपील संपवायला त्याचा आयुष्यातला सगळ्यात मोठा हिट सिनेमा कारण असावा हे दुर्दैव आहे… त्यानंतर तो जलजला मध्ये होता. मात्र त्यानंतर तो दिसेनासा झाला…

आणि कोणाला काहीही फरक पडला नाही. राम तेरी गंगा किती वर्षे चालला तरी यार ये चिम्पू कपूर किधर गया म्हणत कोणी ही त्याची आठवण काढली नाही.

कुटुंबात तो नीतू सिंगचा सर्वात लाडका होता म्हणतात. त्याचे दोन्हीही भाऊ त्याच्याबाबतीत प्रोटेक्टिव्ह होते. कदाचित मग चिम्पूलाच फार काही फरक पडत नसेल. फॅमिली पॅक मध्ये एक फ्लेवर बनून रहायला. तसा घरच्या सगळ्या प्रॉडक्शन, सगळ्या समारंभात दिसायचाच तो.

आणि आम्ही हसायचो… उगाच.

सॉरी चिम्पू. खरोखर एक सांगायचंय.

तुला कोणीतरी वाईट अभिनेता म्हटलं. साफ चूक आहे. तू चांगला अभिनय करायचास. ते टिपिकल कपुरी हात हवेत फिरवणं सोडल्यास. तुझा आवाज, संवादफेक, गाणी कॅरी करणं सगळं तुझ्या खानदानाला शोभेसं होतं.

मी नेहमी लिहितो

Once a Kapoor, always a good actor. Yes, Rajiv Kapoor too. हे म्हणताना तुझी तारीफ आणि मस्करी दोन्ही असायची.

आम्हीच आपलं frustation काढायला कोणीतरी बघत असतो. तू त्यातला एक झालास.

हे लिहायच्या अगोदर दिल लगाना तुम क्या जानो ऐकलं.

गड्या, शाळेत पोहोचलो असं वाटलं..आम्ही सगळे बाक बडवत गातोय..

ता रा पा पा चीकीरी रिक्का!

Leave A Reply

Your email address will not be published.