विधिमंडळात म्हटलं जायचं, राजीव राजळे साधे आमदार नाहीत तर ते स्वतः एक संदर्भ ग्रंथ आहेत

दिवस आणि वार आठवत नाही पण ठिकाण नक्की आठवतंय. पण बहुधा 2006 सालच मुंबईतील विधिमंडळच पावसाळी अधिवेशन असावं. मी नुकतीच प्रिंट मीडियात पत्रकारितेला सुरुवात केली होती. विधिमंडळाचे कामकाज कव्हर करायचे असेल तर अगोदर विधानसभा /परिषद कामकाज कसे चालते..? हे समजून घेण्यासाठी आणि यासंबंधीच मार्गदर्शन घेण्यासाठी मी विधानभवनातील ग्रंथालयात तेथील प्रमुख श्री बा.बा. वाघमारे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो होतो.

श्री वाघमारे यांच्या कार्यालयात तसा अनेक विधानसभा / विधानपरिषद सदस्यांचा राबता सुरू होता..(हल्ली मात्र हे प्रमाण खुप कमी झालंय ), पुढे श्री वाघमारे यांच्या कार्यालयात जाणं माझा नित्यक्रम झाला होता. त्यांच्याच कार्यालयात मला अनेक आमदार महोदयांची नव्याने ओळख झाली.पण श्री वाघमारे यांचा आयुष्यभर ऋणी यासाठी आहे की, त्यांच्याच कार्यालयात माझी एका असामान्य व्यक्तिमत्वाची भेट झाली. ओळख झाली आणि नंतर जीवश्यकंठच्य मैत्री निर्माण झाली….

अर्थात घडलेला किस्सा हा असा होता…

मी ग्रामीण भागातून आलो असल्याने मला आमदार महोदयांबद्दल विशेष आकर्षण होतं. हिरवा आणि लाल बिल्ले लावलेलं कुणीही या परिसरात दिसलं तरी मी कुठलीही भीडभाड न बाळगता  स्वतःहून संबंधित आमदार महोदयांशी ओळख करून घेत असे. मग त्यांचा मतदारसंघ, मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न , विधानसभेची कितवी टर्म, विधिमंडळाचा अनुभव असे एक ना अनेक प्रश्न विचारून संबंधित आमदार महोदयाला आपलेसे करून घेत असे. अपवाद वगळता बहुतांश आमदार सहज मनमोकळ्यापनाने संवाद साधत असतं.

पण , यावेळी नेमकं उलट घडलं…. प्रथमच माझी कुठल्यातरी आमदार महोदयांनी आपुलकीने चौकशी केली. त्या दिवशी श्री वाघमारे यांच्या कार्यालयात पांढरा हाफ शर्ट परिधान केलेली एक व्यक्ती आली. ही व्यक्ती येताच श्री वाघमारे देखील आदराने आपल्या खुर्चीवरून उठून त्यांचे स्वागत केले.

दरम्यान श्री बा.बा.वाघमारे सर मला स्व. वि. स. पागे यांच्या रोजगार हमी योजनेबद्दल देत असलेला संदर्भ अर्धवट राहिला होता. त्याचवेळी श्री वाघमारे सर यांनी मला सांगितले ,

” मंगेश , हे पाथर्डीचे अभ्यासू आमदार श्री राजीव राजळे…माझ्यापेक्षा अधिक संदर्भ या आमदार महोदयांकडे आहे…राजीवजी स्वतःच एक संदर्भग्रंथ आहेत..”

मला , खरं तर श्री राजीवजी यांच्याकडे पाहून विश्वासच बसत नव्हता की हे व्यक्तिमत्व आमदार आहेत. कारण आमदारकिच ओळख असलेला हिरवा किंवा लाल बिल्ला त्यांनी खिशाला लावला नव्हता…की आमदार असल्याची अनुभूती देणारा typical कडक पांढऱ्या खादीचा स्टार्च केलेला शर्ट नव्हता….एक साधी खाकी रंगाची पॅन्ट आणि त्यावर पांढरा हाफ शर्ट…हातात एक लहानस तांब्याच कड…खिशाला 2 पेन..

आणि हातात एक जाडजूड इंग्रजी पुस्तक. एखाद्या कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसारखा श्री राजीवजी यांचा पेहराव होता. त्यामुळे ते कोणत्याही अँगलने मला आमदार वाटले नाहीत…

माझी श्री राजीवजी यांची ओळख झाल्या – झाल्या मी ज्याप्रमाणे आमदार महोदयांना त्यांचे मतदारसंघ माहिती विचारून ओळख वाढविण्याचा प्रयत्न करत असे , अगदी त्याचप्रमाणे स्व.राजीवजी यांनी मला बोलते केले. मी आजपर्यंत अनेक आमदारांना भेटलो होतो, त्यांची विचारपूस करून पर्यायाने एक छोटीशी मुलाखतच घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण आज माझीच कुणीतरी मुलाखत घेत आहे असा भास झाला.

पत्रकारिता कुठल्या वर्तमानपत्रासाठी करत आहात..? शिक्षण कुठपर्यंत केलं..? कुठं झालं..? गाव सोडून इतक्या लहान वयात मुंबईत नोकरीसाठी येण्याचा उद्देश काय..? घरी कोण असतं..?? अशी आपुलकीने चौकशी केली….

मी, राजीवजी यांना माझे मुळ गाव – करमाळा , जि सोलापूर असे सांगताच. त्यांनी माझ्या करमाळा मतदारसंघाचा इतिहास – भूगोलच माझ्यापुढे मांडला. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री सुशीलकुमार शिंदेचा हा पहिला मतदारसंघ इथपासून ते करमाळा तालुक्यात स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांचे उजनी धरण भूमिपूजन वेळी केलेले

” पांडुरंगा, तुझी चंद्रभागा आम्ही मध्येच अडवत असलो तरी, हीच चंद्रभागा उद्या शेतकऱ्यांच्या शेतात वाहणार आहे आणि मोती पिकविणार आहे ” हा संदर्भ दिला.

हा माझ्याच शेजारचा जिल्हा आणि तालुका आहे असे सांगत विद्यमान आमदार जयवंत जगताप , मागीलवेळी असलेले स्व.दिगंबर बागल यांच्याविषयीचा स्नेह व्यक्त केला. सोबतच करमाळयाची बाजारपेठ खूप मोठी असल्याचे सांगितले. एकूणच माझ्या तालुक्याची माझ्यापेक्षा जास्त माहिती श्री राजीव राजळे यांना होती…

दरम्यान, श्री बाबा वाघमारे यांच्यासमवेत अर्धा राहिलेला संवाद आणि माहिती पुढच्या क्षणात श्री राजीव यांनी दिली. स्व.वि.स. पागे यांनी सुरू केलेली रोजगार हमी योजना पुढे देशाने कशी स्विकारली, त्यांच्या स्वतःच्या पाथर्डी मतदारसंघात रोजगार हमी योजनेचा कसा फायदा होत आहे…पण सोबतच तुमच्या सोलापूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात मस्टर वर मजुरांच्या खोट्या सह्या करुन रोजगार हमी योजनेत कसा घोटाळा झाला आहे याची इत्यंभूत माहिती दिली. सोलापूरच्या तत्कालीन जिल्हाधिकारी मनिषा वर्मा या चांगले काम करत आहेत, त्यानीच हा घोटाळा शासनाच्या निदर्शनास आणून दिला त्यामुळे शासनाचे पैसे वाचले असेही सांगितले.

रोजगार हमी योजनेतील त्रुटी संदर्भात मी अशासकीय विधेयक मांडणार असल्याचेही यावेळी स्व.राजीव राजळे यांनी बोलून दाखविले.

स्व.राजीवजी बोलत होते, मी आणि श्री बाबा वाघमारे फक्त ऐकतच होतो.

दरम्यान, श्री राजीवजी यांनी दूध प्रश्ना संबंधी 1 वर्षांपूर्वी  मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांनी विधानसभामध्ये दिलेल्या जाहीर आश्वासनाची संदर्भ प्रत ग्रंथालयातून मिळवून देण्याची मागणी श्री वाघमारे यांच्याकडे केली. तत्कालीन विलासराव देशमुख सरकार दूध प्रश्न संबंधी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. दुधाला वाढीव दर देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असे अशी आपल्याच काँग्रेस सरकार विरोधात तोफ डागत होते. 

एक वर्षापूर्वीच याच सभागृहात दिलेला शब्दही हे सरकार पाळत नाही अशी नाराजी श्री राजळे व्यक्त करत होते…

आमच्याकडे व्यक्त केलेली नाराजी जशीच्या तशी स्व.राजळे यांनी दुसऱ्यादिवशी सभागृहात व्यक्त केली. थेट तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख सरकार विरोधात विधानसभेत तोफ डागली. तेव्हा जाणवलं की हा माणूस आत एक बाहेर एक नाही. हा माणूस जसा आहे तसा आहे. हा माणूस अतिशय संवेदनशील आहे.

कालांतराने स्व.राजीव राजळे यांच्याशी घट्ट मैत्री झाली. केवळ त्यांच्यामुळेच तरुण आमदारांच्या युथ फोरम गटाच्या जवळ जाण्याची मला संधी मिळाली. दरम्यान , मी देखील त्यावेळी नव्याने सुरू झालेल्या स्टार माझा वृत्तवाहिनीसाठी राजकीय वार्ताहर म्हणून जॉईन झालो होतो. स्व.राजाभाऊ यांच्या मदतीने मी त्यावेळी स्टार माझा वृत्तवाहिनीसाठी एकाच वेळी 2 डझन आमदारांची मी “तरुण तुर्क आमदारांचा युथ फोरम” या विशेष कार्यक्रमात मुलाखती घेतल्या होत्या.

स्व.राजाभाऊ यांच्यामुळेच माझा श्री देवेंद्रजी फडणवीस , श्री जयकुमार रावल, श्री शंभूराजे देसाई यांच्याशी स्नेह वाढला…त्याचबरोबर युथ फोरम अनेक आमदार श्री डॉ संजय कुटे, श्री राजेंद्र मुलूक, श्री संजय राठोड, श्री संदीपान धुर्वे , श्री सत्यजित पाटील यांच्याशी देखील ओळख झाली. या युथ फोरम मधील अनेक युवा आमदार महोदयांसमवेत मारिन ड्रायव्ह वरील इंटर कॉंटिनेंटल हॉटेल मध्ये जेवणावळी आणि खमंग गप्पा रंगल्या.

त्यावेळी हॉटेलमध्ये देखील कॉंटिनेंटल फूड, मारिन फूड, इटालियन पास्ता, स्पगेटी, थाई करी अशा आयुष्यात कधीही न खाल्लेल्या विविध डिशेस स्व राजाभाऊ ऑर्डर करायचे. यावेळी एक नियम ठरलेला असायचा की, जेवणाची ऑर्डर फक्त आणि फक्त राजाभाऊच देणार. राजाभाऊ प्रत्येक लहान मोठ्या माणसावर जीव लावायचे. त्यामुळेच आजही श्री देवेंद्र फडणवीस, श्री शंभूराजे देसाई स्व.राजाभाऊंचा विषय काढला की हळवे होतात…

पुढे 2008 सालच्या पावसाळी अधिवेशनात पाथर्डी  पाणीपुरवठा योजनासाठी पाठपुरावा करण्यास मुख्यमंत्री श्री स्व. विलासराव देशमुख  यांच्याकडे गेलेल्या आणि स्व. राजाभाऊ यांस मुख्यमंत्री यांनी मागील टीकेची पार्श्वभूमी  लक्षात घेता भेट नाकारली. त्यावेळी राजाभाऊ प्रचंड चिडले होते. त्यांनी मला रात्री फोन केला. योगायोगाने त्यावेळी माझे दिल्लीतील सहकारी  श्री अभिजित ब्राम्हनाथकर 2 दिवसांसाठी मुंबईत आले होते आम्ही दोघे भाऊंना मनोरा आमदार निवास मधील c 114 रूम मध्ये भाऊंना भेटलो…

रात्री उशिरापर्यंत राजाभाऊंचा निर्णय पक्का झाला होता. काँग्रेस पक्षात बंडाच निशाण फडकविल्याशिवाय आता सरकार जमिनीवर येणार नाही. मंगेश, हे माझं पत्र तयार आहे,पहा सध्याच देशमुख सरकार शेतकरी विरोधी असून, परिस्थिती अशीच राहिली आणि मुख्यमंत्री बदलला गेला नाही तर 2009 साली राज्यात काँग्रेसचे 30 आमदार देखील निवडून येणार नाहीत. मी उद्या सकाळी हे पत्र प्रदेशाध्यक्ष प्रभा राव आणि प्रभारी मार्गारेट अल्वा यांस देत आहे…आणि नंतर मीडियात देखील जाहीरपणे देणार आहे…

मी म्हणालो अहो, भाऊ, आबांना बोलता येईल ( श्री बाळासाहेब थोरात ) काहीतरी मार्ग काढता येईल. यात आपले मामा विलासराव देशमुख समर्थक असल्याने भविष्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला अडचण ठरू शकते. थोरातच पडद्यामागून मुख्यमंत्री हटाव मोहीम चालवत आहेत असाही संदेश जाऊ शकतो अशी बाब मी त्यांना निदर्शनास आणून दिली…

माझ्या समवेत आलेले अभिजित भ्रमनाथकर यांचीही स्व राजाभाऊशी पहिल्याच भेटीत ओळख आणि पुढे घट्ट मैत्री झाली. ते दिल्लीत स्टार माझाचें ब्युरो चीफ होते आणि विशेषतः काँग्रेस पक्ष जवळून कव्हर करत असल्यानं ते थेट म्हणाले,

 ” राजाभाऊ, काँग्रेस म्हणजे थंडा करके खाओ हा पॅटर्न पूर्वीपासून राबवत आहे… आपण आज मुख्यमंत्री हटाव पत्र दिले आणि उद्या मुख्यमंत्री बदलला असं काँग्रेसमध्ये कधीच घडलं नाही आणि घडणारही नाही…जरा सबुरीने सारासार विचार करून राजकारणात पाऊल टाकायला हवं..”

पण, राजाभाऊ आपल्या निर्णयावर ठाम होते, त्यांना प्रचंड विश्वास होता की, आपल्या पत्राची दखल काँग्रेस पक्षश्रेष्ठीं घेतील आणि राज्यात मुख्यमंत्री बदल होईल किंबहुना आपल्या पत्रानंतर आणखी नाराज काँग्रेस आमदार पुढे येतील आणि या मोहिमेला गती मिळेल. कदाचित या मोहिमेनंतर  तत्कालीन काँग्रेस नेते श्री नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी स्व.राजाभाऊ राजळे यांची प्रचंड इच्छा होती. नियतीने कदाचित हे गणित जुळवून आणलं असतं तर स्व.राजाभाऊ श्री नारायण राणे यांच्या मंत्री मंडळात अर्थमंत्री राहिले असते हे नक्की…

मात्र, श्री अभिजित भ्रमनाथकर यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढे काहीच घडल नाही… काँग्रेस म्हणजे थंडा करके खाओ याचा प्रत्यक्ष अनुभव स्व.राजाभाऊ यांस आला…

पुढे, 26/11 हल्ल्यानंतर स्व.विलासराव देशमुख साहेब यांचा राजीनामा झाला आणि श्री अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले…या मंत्रिमंडळात स्व.राजाभाऊंना संधी मिळेल अशी त्यांच्यावरील प्रेमापोटी आम्हां मित्रमंडळी यांस आशा वाटत होती. पण पहिलीच टर्म आणि श्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे या राजकीय पार्श्वभूमीमुळे हे शकय झालं नाही…

दरम्यान , केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार संघाची राजकीय पुनर्रचना जाहीर केली आणि इथेच भल्या भल्या दिग्गज नेत्यांचा घात झाला. स्व.राजाभाऊ यांचा हक्काचा पाथर्डी हा मतदारसंघ वाढून पाथर्डी – शेवंगाव असा झाला. त्याचप्रमाणे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात देखील प्रचंड उलथापालथ झाली.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास असणाऱ्या स्व राजाभाऊंना दिल्ली खुणावत नव्हती तरच नवल.

काँग्रेसशी दुरावत चाललेल्या स्व.राजाभाऊंना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादांनी हाक दिली…आणि स्व.राजाभाऊचा राष्ट्रवादी प्रवेश आणि तिकीट पक्के झाले अशी आमची धारणा होती. पण इथेच घात झाला. हा विद्वान माणूस जर नगर दक्षिण मधून निवडून गेला तर भविष्यात नगर जिल्ह्याचा नेता होईल या भीतीने नगर जिल्ह्यातील सर्व नेत्यांना पछाडले. एकमेकांचे चेहरे न पाहणारे हे पुढारी एकत्र आले आणि सर्वांनी मिळून स्व.राजाभाऊ यांस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी मिळू नये यासाठी एकत्रित प्रयत्न केले. परिणामी राजाभाऊंना उमेदवारी मिळाली नाही. थेट अजितदादा पवार समर्थक असणाऱ्या श्री राजीव राजळे – नगर लोकसभा, श्री विजय भांबळे – परभणी लोकसभा, श्री मुन्ना महाडिक – कोल्हापूर लोकसभा या तीनही उमेदवारांची तिकिटे मोठ्या साहेबानी कापली अशी चर्चा तेव्हा राज्यात सर्वश्रुत होती….

मात्र राजाभाऊ, मागे हटले नाहीत. त्यांचा निर्धार पक्का होता. राजाभाऊ थेट अपक्ष म्हणून मैदानात उतरले. त्यावेळी मी पत्रकारिता मध्ये असताना देखील केवळ राजाभाऊ यांच्या प्रेमापोटी सलग 7 दिवस नगर दक्षिण मतदारसंघात प्रचार करत होतो. स्व.राजाभाऊंच्या अनेक जाहीर सभेत माझे प्रमुख भाषण होत. अपक्ष उमेदवार असून देखील भाऊंच्या सभांना प्रचंड प्रतिसाद लाभत असे. मात्र अवाढव्य असणाऱ्या या मतदारसंघात अपक्ष उमेदवार असलेल्या भाऊंची प्रचार यंत्रणा पोहोचणे केवळ अशक्य होतं…

त्या पराभवानंतर भाऊ, एकदा म्हणाले होते. समोर पराभव दिसत असताना देखील मैदानात लढाई देणारा खरा योद्धा असतो. मला पराभव दिसत होता, तरीही मी लढलो कारण माझी फसवणूक झाली होती. शब्द फिरविला गेला होता. मी विजयी झालो नसलो तरी ज्यांनी शब्द फिरविला त्यांच्या पराभवाच कारण मात्र मीच ठरलो आहे. हा माझा पराभव नसून विजयच आहे.

( नगर जिल्ह्यातील सर्वांना यातील राजकीय संदर्भ लक्षात येतील )

पुढे शेवगाव – पाथर्डी विधानसभा मध्येही स्व राजाभाऊंना अपयश आले. तर 2014 साली स्व.गोपीनाथ मुंडे साहेब स्व.राजाभाऊंना भाजप कडून उमेदवारीची खुली ऑफर देत असताना स्व.राजाभाऊंचा मात्र यावेळी मोठ्या पवार साहेबांवर जीव जडला होता. आपलं राजकारणात बरं वाइट जे काय होईल ते पवार साहेब यांच्या समवेत असं भाऊ म्हणायचे.

मात्र यावेळी मोदी लाटेने स्व.राजाभाऊंना दिल्लीत जाण्यापासून रोखले….

एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असताना स्व.राजाभाऊंनी आपला मित्रपरिवार विविध अंगानी वाढवत नेला ..त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचा मी आणि श्री अभिजित भ्रमनाथकर साक्षीदार आहोंत…

स्व.राजाभाऊयांचे संग्राम कोते , धनंजय जाधव , खेडकर काका बाबासाहेब राजळे, ऍड विश्वा पाटील यांच्यावर अतिशय प्रेम होते…आमही कधी नगरला गेलो तर हॉटेल संदीपच जेवण मागवून भाऊ चुरा करून खाऊ घालायचे आणि मुंबईच्या भेटीत स्पगेटी, थाय करी, पास्ता देखील आवडीने खाऊ घालायचे…

भाऊंच्या आमच्या अनेक मैफिली झाल्या. यात कधी सत्यजित तांबे असायचे, तर कधी संग्राम कोते. कधी ऍड विश्वा पाटील तर कधी बाबासाहेब राजळे. पण या सगळ्या मैफिलीत आम्ही दोघे जण ( मी आणि श्री अभिजित ब्राम्हनाथकर ) कॉमन असायचो .राजाभाऊच्या समवेत आमही दोघेही मनसोक्त दिल्ली दर्शन केलं…

शास्त्रीय संगीत पासून ते ऐतिहासिक गोष्टींची आवड, एकाच वेळी पूल देशपांडे, व पु काळे, शिवाजी सावंत, वा सी बेंद्रे यांच्यापासून freedom at midnight, modern makers of india , india after gandhi या  रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकापर्यत….

एकाचवेळी दूध प्रश्न – ऊस दर प्रश्न पासून ते राज्याचं राजकोशिय उत्तरदायित्व ( fiscal deficiat ) बोलणारे राजाभाऊ…

एकाचवेळी प्राचीन भारत- मध्ययुगीन भारत – शिवाजी महाराज यांचा साक्षेपी इतिहास सांगणारे आणि आधुनिक भारताचा इतिहास सांगणारे राजाभाऊ…

आगरकर – टिळक वैचारिक वाद प्रकरण असो की गांधी आंबेडकर वैचारिक वाद यावर भाष्य करणारे राजाभाऊ…

कार्ल मार्क्स पासून मॅक्स वेबर पर्यंत आणि आजच्या रोमिला थापर या विचारवंत बद्दल भरभरून बोलणारे राजाभाऊ…

अमेरिकेन निवडणूक आणि बराक ओबामा हे सत्तेत येणार हे 1 वर्ष अगोदर सांगणारे राजाभाऊ…

अमेरिकेन आणि ब्रिटिश  संसदीय राज्यपद्धती आणि भारतीय संसदीय राज्यपद्धती यावर चर्चा करणारे भाऊ…

जगभरातील चित्रकारांची माहिती देणारे भाऊ….

भाऊंच्या, शेवटच्या दिवसात मी त्यांना भेटायला परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये गेलो. माझा मित्र संग्राम कोते मला भाऊ जिथे ऍडमिट होते त्या icu पर्यंत घेऊन गेला. भाऊंना काचेतून पाहिले आणि काळजात चर्र झालं. डोळ्याच्या कडा पणावल्या. मन घट्ट केलं. कारण ईश्वरान पुढ्यात काय वाढून ठेवलंय याची जाणीव झाली….

अस्वस्थ झालो…बाहेर येऊन श्री अभिजित यांस फोन केला . .भरभरून बोललो….त्यांनी धीर दिला…

त्यापुढील आठवड्यातच , भाऊंच्या निधनाची वार्ता धडकन अंगावर आदळली. भाऊंच्या अंत्यविधी साठी श्री अभिजित, श्री निलेश खरे, श्री सागर कुलकर्णी, श्री रौनक कुकडे आणि मी पाथर्डीकडे निघालो…

ज्या मित्रान राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवाव आणि समर्थपणे राज्यशकट हाकावं. किंबहुना किमान राज्याचं अर्थमंत्री पद भूषवाव असं आम्हा मित्रांना नेहमी वाटायचं.पण नियतीला हे मान्य नव्हतं. एक संवेदनशील व्यतिमत्व आणि तितक्याच ताकदीच अभ्यासु नेतृत्व आपल्यातून अकाली निघून गेल.फक्त 44 हे भाऊंच जाण्याचं वय नक्कीच नव्हतं.माझ्या मते नगर जिल्ह्यातील राजकीय व्यवस्थेने भाऊंचा खुन केलाय.ज्याने त्याने आत्मपरीक्षण केल्यास याला जबाबदार कोण याचे उत्तरंही आपोआप मिळेल.

पण भाऊंनी जाता जाता एक धडा सर्वांना दिलाय.राजकारण हे संवेदनशील माणसाचं क्षेत्र नाही. इथे एक तर संवेदनशील माणसाने प्रवेश करून नये, किंवा केला तर मग गेंड्याची कातडी परिधान करूनच मैदानात उतरावं… नाहीतर त्याचा एक दिवस राजाभाऊ झाल्याशिवाय राहत नाही….

  • मंगेश चिवटे, मुंबई.
Leave A Reply

Your email address will not be published.