राजकुमारने सेटवरच मुशायरा भरवला आणि शेर कळेना म्हणून सगळ्या युनिटला स्कॉच पाजली होती.

बॉलिवूडमध्ये शेरो शायरी यांचं एक वेगळं महत्व आहे. गाण्यांमधून, कव्वाल्यांमधून अनेक शेर, शायऱ्या रचल्या गेल्या, सिनेमांमध्ये या नव्या प्रकाराने भर टाकल्याने लोकं अधिकच उत्साहाने सिनेमांकडे पाहू लागले. आजसुद्धा सोशल मीडियावर हजारोच्या संख्येने या शायऱ्या फिरत असतात. अशाच एका सिनेमाच्या सेटवरचा आजचा किस्सा.

गालिब, मीर ताकी मीर, इकबाल हि उर्दूतली महान मंडळी अगदी शेरो शायऱ्या ऐकणाऱ्या लिहिणार्यांच्या मते हि लोक दैवत असावी इतक्या उच्च प्रतीच्या रचना त्यांनी केल्या. गालिबच्या गोष्टी आणि त्याचे शेर तर जगभरात विस्तारलेले आहेत. आजसुद्धा त्याने लिहिलेले शेर हे जीवनाचं सार सांगून जातात. 

तर त्याच झालं असं कि राजकुमार हा उर्दू भाषेचा निस्सीम चाहता होता. त्याची बॉलिवूडमध्ये चालणारी डायलॉगरूपी दहशत अजूनही कोणाला मोडता आलेली नाही. तर राजकुमार हा मूळचा बलुचिस्तानचा होता त्यामुळे त्याची उर्दू भाषा हि एकदम पक्की होती. त्याची भाषा आणि अक्षर दोन्हीही सुंदर होतं. तर थोडक्यात राजकुमार उर्दूत पारंगत होता.

त्याला गालिब, मीर ताकी मीर, इकबाल या लोकांचे शेर अगदी तोंडपाठ होते. आणि त्याची बोलायची एक युनिक स्टाईल असल्याने लोकसुद्धा आवडीने त्याचे शेर ऐकायचे. सिनेमांमध्ये तो ज्या स्टाईलने डायलॉग म्हणायचा तशाच प्रकारे तो आपल्या उर्दू ढंगात शेर सादर करायचा. 

त्यावेळी मरते दम तक या सिनेमाचं शूटिंग चेन्नईत सुरु होतं. या सिनेमात गोविंदा, स्वतः राजकुमार, ओम पुरी, शक्ती कपूर, अलोक नाथ, परेश रावल अशी सगळी तगडी स्टारकास्ट होती. लहरी आणि शायरीचा नाद असलेल्या राजकुमारला काही स्वस्थ बसवेना. ज्यावेळी शूटिंगचा ब्रेक व्हायचा तेव्हा आपण काहीतरी सगळ्या युनिटला ऐकावं असं त्याला सतत वाटत असायचं.

तर त्याने एके दिवशी पद्धतशीर प्लॅन केला आणि सेटवरच मुशायरा भरवला. अनेक ए वन शेर त्याने सादर करायला सुरवात केली. सगळं फिल्म युनिट त्याला ऐकत तिथेच बसलं होतं.

इतका लोकांचा उत्साह बघून राजकुमारला सुद्धा शेर सांगण्याचा उत्साह आला होता. तो ज्यावेळी शेर सादर झाल्यावर लोकांकडे बघायचा तेव्हा लोकं काहीच प्रतिसाद देत नव्हते.

राजकुमारचा उत्साहच मावळला. आपण इतक्या आवडीने शेर सांगतोय आणि या लोकांमधलं कोणीही प्रतिसाद देत नाहीए यामुळे राजकुमार मनातल्या मनात रागावला होता. पण त्याचे शेर इतक्या प्राचीन उर्दूतले होते कि कुणालाच कळत नव्हते. मग राजकुमारने लोकांनाच विचारलं मी सांगितलेले शेर तुम्हाला समजत नाहीए का ? आता राजकुमारला कोण समजवणार कि बाबा यातलं काहीच आम्हाला कळत नाहीए.

तरी राजकुमारने जरा खडसावून विचारलं कि तुम्हाला खरंच कळत नाहीए का ? तेव्हा लोकं घाबरत घाबरत म्हणाले कि समजत नाहीए म्हणून. पण यावर राजकुमार त्यांच्यावर चिडला नाही. त्याने सगळ्यांना प्रत्येक शेर लहान बाळाला जस एक एका शब्दाचा अर्थ समजावून सांगतात तसा समजावून सांगितला. तेव्हा कुठं लोक त्याच्या शेरला वाह वाह म्हणून दाद देऊ लागली. 

आता आपल्या शेरांना मिळणारा प्रतिसाद बघून राजकुमार आनंदाने एक से बढकर एक शेर सांगू लागला. मुशायरा संपल्यावर राजकुमारने आनंदोत्सव म्हणून पदरच्या पैशाने सगळ्या युनिटला स्कॉच पाजली.

राजकुमार हा पडद्यावर जितका प्रभावी होता तितकाच तो लोकांमध्येही चांगलाच रुळलेला माणूस होता. त्याच्या डायलॉगचे आजही लोकं फॅन आहेत. वेगळी शैली आणि जबरदस्त आवाज यामुळे राजकुमार सदैव स्मरणात राहील.

मरते दम सिनेमात राजकुमारचा एक अजरामर डायलॉग होता,

इस दुनिया में तुम पहले और आखरी बदनसीब कमीने होगे, जिसकी ना तो अर्थी उठेगी ना किसी कंधे का सहारा मिलेगा,

सीधे चिता जलेगी…!

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.