समोर राजकुमार असुनही ओम पुरीने सिनेमाचा शेवट बदलायला लावला होता

तो काळ होता बाॅलिवूड सिनेमांमध्ये बदल होण्याचा. शम्मी कपुर, राजकुमार, धर्मेंद्र या अभिनेत्यांनी व्यावसायिक सिनेमांमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्यांच्या सिनेमांना तिकीटबारीवर सुद्धा प्रचंड यश मिळत होते. या प्रवाहात नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी हे दोन अभिनेते सामील झाले. त्यांनी मात्र व्यावसायिक सिनेमांची वाट न निवडता वास्तववादी सिनेमे करण्याला प्राधान्य दिलं.

ख-या अर्थाने नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरीमुळे बाॅलिवुड स्वप्नरंजनातुन वास्तव दुनियेत आलं, असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

१९७० दरम्यान स्वतःच्या दंतकंथांनी आणि अभिनयाच्या अनोख्या स्टाईलने अभिनेता राजकुमार प्रसिद्ध होते. दुसरीकडे ओम पुरी ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’ यांसारखे सिनेमे करुन पुढे आलेला. वास्तववादी सिनेमांमधुन प्रभावी अभिनय करुन स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत होता.

ओम पुरी दिल्लीतील NSD आणि पुण्यातील FTII यांसारख्या नामवंत संस्थांमधुन अभिनयाचं नेटकं शिक्षण घेऊन सिनेइंडस्ट्रीत दाखल झाले.

ओम पुरी-राजकुमार या अगदी परस्परविरुद्ध अभिनयशैली असणा-या दोन अभिनेत्यांची एका सिनेमात गाठ पडली.

दिग्दर्शक मेहुल कुमार ‘मरते दम तक’ हा सिनेमा बनवत होते.

गोविंदा, शक्ती कपुर हे दोघे या सिनेमात होते. राजकुमार सिनेमाचे नायक तर ओम पुरी सिनेमातला मुख्य खलनायक. सिनेमाचं सर्व शुटींग व्यवस्थित पार पडलं. आता वेळ आली सिनेमाचा क्लायमॅक्स शूट करण्याची.

ओम पुरी खलनायक असल्याने त्याचा आणि राजकुमारचा फाईट सीन सुट होणार होता. ओम पुरीने आधीपासुन ऐकलं होतं की अभिनेते राजकुमार क्लायमॅक्सचा सीन त्यांच्या स्टाईलमध्ये लांबवतात आणि खलनायकाला जास्त मार खावा लागतो.

ओम पुरीला व्यावसायिक सिनेमातली अशी गणितं मान्य नव्हती. ओम पुरी दिग्दर्शक मेहुल कुमारांना भेटला.

‘क्लायमॅक्सच्या प्रसंगात राजकुमारसोबत मारामारी करणार नाही’, असं ओम पुरीने स्पष्ट शब्दात त्यांना सांगीतलं.

मेहुल कुमारने ओमचं म्हणणं मान्य केलं.

क्लायमॅक्स शूट होण्याच्या शेवटच्या क्षणी मेहुल कुमारांचा असिस्टंट ओमजवळ आला.

‘शेवटच्या प्रसंगामध्ये आम्ही थोडा बदल केला आहे, तुम्हाला राजकुमारसोबत थोडीशी मारामारी करावीच लागेल’,

असं असिस्टंटने ओमला सांगीतलं.

हे ऐकताच ओम लगेच मेहुल कुमारांकडे गेला. असिस्टंट बोलला तीच गोष्ट मेहुल साहेबांनी ओमला पुन्हा सांगीतली. ओम पुरी मात्र क्लायमॅक्समध्ये मार खायला अजिबात तयार नव्हता. यामुळे मेहुल साहेब आणि ओम पुरी मध्ये थोडी बाचाबाची झाली.

हि गोष्ट राजकुमार यांना कळाली. राजकुमार मेहुल कुमारांजवळ आले.

‘ओम पुरी जसं म्हणतायत तसाच क्लायमॅक्स शूट करा’, असं म्हणुन त्यांनी ओम पुरीच्या म्हणण्याचा आदर केला.

आता दस्तुरखुद्द राजकुमार असं म्हटल्यावर त्यांच्याविरुद्ध मत देण्याची कोणाची हिंमत नव्हती. ‘क्लायमॅक्समध्ये मारामारीऐवजी ओम पुरींची हरकत नसेल तर गोळीबार ठेऊया’, असं राजकुमारांनी सुचवलं. ओम पुरी मान्य झाले.

सिनेमाची सर्व तयारी झाली. राजकुमार त्यांच्या अंदाजात संवादफेक करत होते.

समोर ओम पुरी मुख्य खलनायक म्हणुन उभा होता. आणि गोळीबार करण्याचा प्रसंग आला. राजकुमार ते राजकुमारच शेवटी! त्यांनी बंदुकीतुन एक नाही तर धडाधड गोळ्यांचा वर्षाव करुन ओम पुरीला खाली पाडलं. हा क्लायमॅक्स सुद्धा त्यांच्या स्टाईलने राजकुमार यांनी रंगवला.

आजही तुम्ही ‘मरते दम तक’ हा सिनेमा बघाल तर तुम्हाला क्लायमॅक्सचा गोळीबारीचा सीन पाहुन अंदाज येईल. राजकुमार ग्रेट होतेच! पण समोर राजकुमारांसारखा मोठा अभिनेता असुनही स्वतःच्या तत्वांवर ठाम राहणारा आणि स्पष्टपणे स्वतःची बाजु सांगणारा ओम पुरीला सुद्धा दाद दिलीच पाहिजे.

  • भिडू देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.