कुत्र्याला स्क्रिप्ट पसंद नाही म्हणून राजकुमारने पिक्चरची ऑफर नाकारलेली.

राजकुमार. लय मोठ्ठा माणूस. यापुर्वी देखील या माणसाचे अनेक अॅट्यिट्यूडचे किस्से आम्ही तुम्हाला रंगवून सांगितलेत.

 म्हणजे कसं हा एकदा बच्चनचा सुट पाहून त्याला म्हणाला, सूट चांगला आहे कुठून शिवला? 

बच्चन तेव्हा गरिब प्राणी होता. बच्चन म्हणला, साहेब आपल्याला आवडला का. असाच एक मी शिवून घेतो आणि तुम्हाला देतो. 

तर राजकूमार म्हणे,

नाही मला या कलरचे पडदे शिवायचे आहे. 

थोडक्यात काय तर भयानक मस्ती आणि घमेंड असणारा हा माणूस होता. जसा पडद्यावर असायचा तसाच व्यक्तिगत आयुष्यातपण होता. पण याची मस्ती भारी वाटायची. फ्यूज कंडक्टर खिश्यात घेवून फिरणारा माणूस तर काय थोडीस साधासुधा असणाराय. 

असो तर आपण मुळ मुद्यावर येवूया. या पट्याने एकदा सुपरहिट पिक्चर नाकारलेला. पिक्चर अजून प्रोसेसमध्ये नव्हता त्यामुळे तो सुपरहिट होईल याचा अंदाज खुद्द राजकुमारला नसला तरी हा पिक्चर घेवून त्यांच्या दारात आलेला माणूस मात्र सुपरहिट होता. त्यांच नाव रामानंद सागर आणि तो पिक्चर होता आंखे. तोच तो धर्मेंद्र आणि माला सिन्हाचा ऑंखे. ऑंखे हा पिक्चर त्यावेळी डायमंड ज्युबिली हिट ठरलेला. 

तर आत्ता तो किस्सा काय घडलेला ते सांगतो, 

झालेलं अस की रामानंद सागर हे त्यावेळेच प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता होते. सोबतच राजकुमार यांच्यासोबत त्यांची चांगली मैत्री होती. दोघांनी एकत्र जिंदगी आणि पैगाम सारखे पिक्चर देखील केले होते. दोघांच्यात चांगल ट्यूनिंग जमलं होतं. आत्ता रामानंद सागर यांच्या डोक्यात नवीन फिल्म होती आणि ती फिल्म राजकुमारनेच करावे अशी त्यांची इच्छा होती. 

ठरल्याप्रमाणे आपली स्क्रिप्ट घेवून ते राजकूमार यांच्या घरी गेले. राजकुमार आपल्या नेहमीच्या अॅट्यिट्यूडमध्ये बसलेले. वेलमक वगैरे झालं आणि रामनंद सागर यांनी आपली स्क्रिप्ट राजकुमार यांच्याकडे दिली. पिक्चरची थोडक्यात स्टोरी सांगितली आणि मानधन म्हणून दहा लाख देत असल्याचं देखील सांगितलं. त्या काळात ही रक्कम देखील खूप मोठ्ठीच होती. 

अशा वेळी आपल्या माणसानं काय करावं. राजकुमारने एका हातात सिगारचा पाईप धरत आपल्या पाळीव कुत्र्याला हाक मारली. कुत्र बाहेर आलं. तेव्हा राजकुमार कुत्र्याकडे बघत म्हणाला, 

रामानंदजी नयीं फिल्म लेकर आयें हैं. क्या राय हैं. फिल्म करें. 

आत्ता किती झालं तरी कुत्रच ते. कुत्र आपलं गप्प गुमाने आलं आणि राजकुमारच्या पायात जावून बसलं. 

त्यानंतर राजकुमारने वर पाहिलं आणि रामानंद सागर यांना म्हणाला, 

वो मेरें कुत्ते को स्क्रिप्ट पसंद नहीं आयी. ऐंसें मे तो हां करनेकां सवाल ही नही उठता. 

झालं बट्याघोळ. इथं पिक्चर तर नाकारलाच पण रामानंद सागर सारख्या चांगल्या माणसाचा घावूक दरात अपमान देखील झाला. पुढे ऑंखे आली ती हिट झाली. पण या लडतरीत रामानंद सागर आणि राजकुमारचे संबंध बिघडले ते बिघडलेच. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.