आजही राजनाथ सिंह यांना भाजप मध्ये प्लॅन बी वाला पंतप्रधान म्हणून ओळखलं जातं.

१९७६ च्या आणीबाणीच्या काळातला उत्तर प्रदेश मधील एक तुरुंग. सरकारने आपल्या विरोधात बोलणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांना याच तुरुंगात डांबलं होतं. इंदिरा गांधींचे हुकूम शाही कधी संपणार याची वाट बघत हे राजबंदी आपले दिवस काढत होते. शिळोप्याच्या वेळेत राजकीय गप्पा चालायच्या. देशभरातले तुरुंग इंदिरा विरोधकांच्या  घडामोडींचं केंद्र बनून गेले होते.

 एकदा अशाच एका दुपारी भविष्य बघायची टूम निघाली. एक जेष्ठ राजकैदी भविष्य सांगण्यात वस्ताद होते. सर्वजण त्यांना हात दाखवायचे. एकदा एका तरुण कैद्याने देखील हात दाखवला. भविष्य सांगणाऱ्या या वयस्कर व्यक्तीने त्या तरुणाचा हात बघून सांगितले,

तुम्ही एक दिवस खूप मोठा नेता बनणार आहात.

तेव्हा त्या तरुणाने विचारले, किती मोठा नेता गुप्ताजी?

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री इतका मोठा. तो २४ वर्षाचा  तरुण हसला. त्याचा पक्ष नंबर ३ वर होता त्यामुळे, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री होणे खूप दूरची गोष्ट होते.

विशेष म्हणजे २४ वर्षांनंतर तो तरुण खरंच मुख्यमंत्री झाला तेही ज्या म्हाताऱ्या व्यक्तीने त्याचा हात पाहिला त्याच व्यक्तीला बाजूला करून. 

ही काय कोणत्या जुन्या पिक्चर ची स्टोरी नाहीये तर खरंच असं घडलं आहे…तेही आपल्या राजकीय इतिहासात!

तरुणाचे भविष्य सांगणारे गुप्ताजी म्हणजेच आणीबाणीच्या काळातले उत्तर प्रदेशमधील जनसंघाचे नेते राम प्रकाश गुप्ता हे होते तर तो तरुण म्हणजेच राजनाथ सिंह होय.

१९६७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्यांचे सरकार स्थापन झाले तेव्हा चौधरी चरण सिंग उपमुख्यमंत्री होते. १९७७ मध्ये जनता पक्ष निवडून आल्यानंतरही तेच उत्तर प्रदेशमध्ये मंत्री बनले. १९८९ मध्ये भाजप अधिक व्यापक होऊ लागली, विस्तारत गेली.

पण एव्हाना पार्टी हायकमांडला उत्तर प्रदेश मधील सामाजिक वातावरण समजलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये मजबूत व्हायचं असेल तर, युपी ची कमांड एखाद्या ओबीसी नेत्याला द्यावी लागणार होती.  आणि याच मुळे राम प्रकाश गुप्ता बाजूला करून पक्षाने कल्याण सिंग यांना निवडून आणलं. कल्याण सिंह ओबीसी होते, लोध जातीचे. राम मंदिर आंदोलना मधले एक पोस्टर बॉय होते.

१९९१ मध्ये कल्याण सिंग यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन झाले. राजनाथ सिंह हे मंत्री झाले. यापूर्वी राजनाथ पक्षाच्या संघटनेसाठी कार्यरत होते. ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यानंतर विधान परिषदेत पोहचले. तशी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ७७ मध्येच झाली होती. जनता लाटेत ते मिर्झापूरचे आमदार झाले होते.

९१ च्या काळामध्ये राजनाथ हे कॉपी अध्यादेशामुळे आणखीनच प्रसिद्ध झाले.

यात कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमधून अटक केली जायची आणि नंतर त्यांना थेट कोर्टातूनच जामीन मिळायचा. संपूर्ण प्रदेशात यामुळे तणावग्रस्त वातावरण होते. कॉपीचा मागमूस नाही. त्यामुळे पास होणाऱ्यांची टक्केवारी खूप कमी झाली.

बाबरी मशीद पाडल्यानंतर कल्याण सिंग यांना १९९२ मध्ये राजीनामा द्यावा लागला. १९९३ मध्ये पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका झाल्या. सपा-बसप युतीने बहुमताने 213 जागा तर भाजपाने १७७ मिळवल्या. यात लखनौजवळील महोना जागेवर स्वतः: राजनाथ सिंह निवडणूक हरले. तेंव्हा तिकडे एकच चर्चा असायची राजनाथ यांना शिक्षक आणि मुलांची ‘हाय’ लागली.

राजनाथ सिंह म्हणजे मोठे गेमचेंजर 

पण राजनाथ सिंह ही थांबणाऱ्यातले नव्हते. त्यात ते संघाचे लाडके होते. दोन वर्षांतच त्यांनी राज्यसभेची जागा मिळवली. त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. १९९६ च्या निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळाले नाही. काही महिन्यांच्या तडजोडीनंतर बसपा-भाजपा सरकार स्थापन झाले. सहा-सहा महिन्यांच्या मुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरला.

मायावती 6 महिने मुख्यमंत्री होत्या आणि मग 6 महिने कल्याण सिंग झाले. पण काही महिन्यांतच मायावतींनी पाठिंबा काढून घेतला. आणि मग राजनाथ सिंह यांनी आपली पहिली राजकीय खेळी दाखवली. आणि संपूर्ण पोलिटिकल गेमच चेंज केला. त्यांच्या राजकीय कुरघोड्यांमुळे काँग्रेस आणि बसपामध्ये फुट पडली आणि दोन नवीन गट पुढे आले. डेमोक्रॅटिक काँग्रेस आणि लोकतांत्रिक बसपा. आणि अशाप्रकारे कल्याण सिंग यांचे सरकार वाचले. पण राजनाथ यांनी या सरकारमध्ये भाग घेतला नाही कारण त्यांची नजर एका मोठ्या गेमवर होती.

काही महिन्यांनंतर कल्याण सिंग यांच्या सरकारमधील राजनाथ यांच्या निष्ठावान आमदार फुटायला लागले. वादग्रस्त वक्तव्य सुरु झाले. कल्याण सिंग आपल्याच सरकारमध्ये एकटे पडू लागले आणि हायकमांड देखील त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देत नव्हते.

काही वर्षांत ही लढाई कल्याण सिंग विरुद्ध अटलबिहारी वाजपेयी अशी झाली. १९९९ च्या निवडणुकीत लखनौच्या जागेवरून लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी वाजपेयी ठाण मांडून होते. लोक सांगतात कि, की कल्याण सिंग म्हणायचे, अटलबिहारी खासदार बनले तरच ते पंतप्रधान होतील ना!

अटलबिहारी खासदार झाले, पंतप्रधानही. कल्याण सिंग मात्र मुख्यमंत्रीही राहिलेले नव्हते. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील पराभवामुळे ते बाजूला झाले मात्र  पक्षाने ताबडतोब राजनाथ सिंह यांना पद देण्याचा विचार केला नाही. अटलबिहारी यांना मधला मार्ग सापडला. आणि त्यांनी राम प्रकाश गुप्ता यांना मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणुन निवडले.

याचा सर्वांनाच धक्का बसला. नव्या पिढीने त्याच्याबद्दल ऐकलंही नव्हतं. भाजप सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले ते निवृत्तीचा आनंद घेत होते. नवीन राजकारण, नवीन आमदार आणि नवीन संघटना यावर त्यांची कोणतीही पकड नव्हती हे उघड होते. त्यांनी ११ महिने मुख्यमंत्रीपदावर होते. आणि मग त्यांना काढून टाकण्यात आले आणि राजनाथ सिंह यांना मुख्यमंत्री करण्यात आले. 

२४ वर्षांनंतर गुप्ताजींची भविष्यवाणी खरी ठरली, याची त्यांनी कल्पना कोणत्या स्क्रिप्ट रायटरने देखील केली नसती.

राजनाथ सिंह मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी फक्त घोषणा केल्या. म्हणुन विरोधक त्यांना घोषणानाथ म्हणू लागले.

त्या दरम्यान त्यांनी मागासांना आरक्षणात आरक्षण देण्याची ही घोषणा केली होती. यासाठी त्यांचे कॅबिनेट मंत्री हुकुम सिंग यांनी एक समिती स्थापन केली. त्यांच्या शिफारशीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला होता. पण हे आरक्षण कोर्टात अडकले.  राजनाथ सिंह यांनी आपल्या युगात मोठ्या संख्येने ग्रुप सी (क्लास 3) ची भरती देखील काढली होती. त्याचंही आरक्षणा सारखेच हाल झाले. 

त्यांच्या नेतृत्वाखाली २००२ मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. आणि भाजपकडून फारच वाईट निकाल लागला. शेकड्यापर्यंत देखील आकडा पोहोचू शकला नाही. काही महिन्यांनंतर पक्षाला बसपाच्या मायावती यांना सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवणे भाग पडले.

या पराभवामुळे राजनाथ यांच्या राजकीय कारकीर्दीला काही नुकसान झाले नाही, कारण काही महिन्यांतच अटलबिहारी यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतले.  कृषिमंत्री च पद दिलं गेलं. २००४ मध्ये अटलबिहारी सरकार गेले. अडवाणींचे उपपंतप्रधानपद ही गेले. आणि मग त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावर पकड घेतली.

अडवाणी २००५ मध्ये पाकिस्तानात गेले असतांना त्यांनी भाषणात जिनाचं कौतुक केल्यामुळे संघांचे लोकं नाराज झाले. अडवाणी परत आले आणि त्यांनी राजीनामा दिला.

आणि मग पक्षाच्या नव्या अध्यक्षासाठी शोध सुरु झाला. आणि  राजनाथ सिंह यांना नवीन अध्यक्ष म्हणुन निवडले गेले.

आधीच संघांचे लाडके असलेले राजनाथ सिंह यांचा सर्वांनी स्वीकार केला. २००९ पर्यंत ते अध्यक्ष होते. सलग दोन टर्म. राष्ट्रीय नेते बनले. २००९ मध्ये ते गाझियाबादमधून निवडून आले आणि लोकसभेतही पोहोचले. 

काँग्रेसने १९९१ नंतर प्रथमच २०० चा टप्पा ओलांडला. जुनी लोकं नकोत अशा समजात , अडवाणी यांना  साईडलाईन करण्यात आले, राजनाथ यांनाही निरोप देण्यात आला. आणि अशाप्रकारे संघाने नागपूरच्या नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीत आणले. २०१३ मध्ये जेव्हा पुढील लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली.

संघाच्या आशीर्वादाने गडकरी हे पुन्हा अध्यक्ष होतील, असे सर्वांनी गृहीत धरले होते. पण नंतर एका घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांचं नावं बाजूला झालं आणि पुन्हा एकदा राजनाथ सिंह नशिबाने अध्यक्ष बनले.

असं सांगितलं जातं की मोदींच्या आग्रहामुळेच गडकरींना हटवून राजनाथ सिंह यांना भाजपचा अध्यक्ष बनवण्यात आलं होतं.

भाजपचा प्लॅन बी वाला पंतप्रधान.

२०१३ साली नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवणुकीचा प्रचारप्रमुख निवड झाली. याचाच अर्थ ते त्यांचे पंतप्रधान पदाचे प्रमुख उमेदवार होते. पण त्याकाळात अशी चर्चा होती कि त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी चेहऱ्यामुळे एनडीए मधील इतर मित्र पक्ष त्यांच्या नावाला विरोध करतील जर अशीच वेळ आली तर मोदी यांच्या मर्जीतल्या राजनाथ सिंह यांचं नाव पुढं करायचं असा भाजपचा प्लॅन होता.

राजनाथ यांनी जेंव्हा लखनौमधून निवडणूक लढवली तेंव्हा त्यांचे शहरातील कार्यकर्ते अशी चर्चा करत कि, 

सत्ता भाजपची येणार हे फायनल आहे. पण मोदी पंतप्रधान होणार नाहीत हे सुद्धा फायनल आहे. अडवाणींना प्रधानमंत्री होऊ न देण्यासाठी अखेर पक्षाचा अध्यक्ष म्हणून राजनाथ सिंग यांनाच पुढे यावे लागेल.

याच प्रचाराच्या जोरावर राजनाथ सिंह यांनी लखनौ मध्ये भरघोस मतदान घेऊन विजय मिळवला.  तिथं तर अशा अफ़वा देखील उठवल्या होत्या कि राजनाथ सिंह यांच्या  कुंडलीत ते पंतप्रधान होणार असल्याचे लिहिले आहे.

पण तसे घडले नाही. मोदींचा करिष्मा असा होता कि त्यांनी आपल्या लाटेत काँग्रेस सह पक्षांतर्गत विरोधकांना देखील उडवून लावलं. एकतर्फी विजय मिळवून ते सहज पंतप्रधान झाले. इतर मित्रपक्षांच्या मदतीची देखील आवश्यकता त्यांना उरली नाही. त्यामुळे प्लॅन बी वाले पंतप्रधान राजनाथ सिंह गृहमंत्री झाले.

पुढे २०१९ च्या निवडणुकीनंतर मोदींचा उजवा हात समजले जाणारे अमित शहा हे गृहमंत्री बनले तर राजनाथ सिंह यांना संरक्षणमंत्रालय देण्यात आलं. अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्या सारख्या जेष्ठ नेत्यांच्या निधनानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शहा यांच्या खालोखाल मोठं स्थान राजनाथ सिंह यांनाच आहे.

सध्या अशी चर्चा आहे कि कोरोना काळात मोदी सरकारची लोकप्रियता ढासळत आहे. सरकार लोकांच्या अपेक्षेप्रमाणे कार्य करण्यात थोडेसे कमीच पडत आहे असे आरोप केले जात आहे. यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप आपले नेतृत्व बदल करेल अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. अशीच जर वेळ आली तर मोदींचा सामना नितीन गडकरी यांच्याशी होऊ शकतो. तेव्हा मध्यममार्ग म्हणून मोदीजी आपले प्लॅन बी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजनाथ सिंह यांचं नाव पुढं करू शकतात.

आता हि झाली जर तरची भाषा. भिडू म्हणाला हे होण्याची शक्यता ९९% नाही. पण शेवटी हे राजकारण आहे पिल्लू. इथं कधी कुठे कोणाचं भविष्य बदलेल सांगता येत नाही.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.