रजनीकांत कुठे बसकंडक्टर होता? कोल्हापूर, बेळगाव की बेंगलोर?

सुरवातीला म्युजिक वाजायला लागत. सोसाट्याचा वारा वहायला लागतो. सगळा बाजार स्तब्ध झालेला असतो. व्हिलन मंडळी घाम पुसू लागतात. सिनेमात रजनीकांतची एंट्री झालेली असते. चांगली दहा वीस पाउले लॉंग शॉट असतो.

कॅमेरा अजून मागे जात असतो आणि एखाद्या वाघाच्या स्पीडने झपझप पावले टाकत थलैवा येत असतो.

चालताना एका हाताच्या बोटांमध्ये सुदर्शनचक्र फिरल्या प्रमाणे सिगरेट, सिगार किंवा बिडी यापैकी एक वस्तू गरागरा फिरत असते. एका विशिष्ट क्षणाला ती सिगरेट हवेत उडवली जाते आणि रजनीच्या मुखकमलात जाऊन विसावते. ओठातुनच एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे तिचा नाच दाखवला जातो आणि शेवटी काडेपेटीची काडी, लायटर किंवा थेट पिस्तुल याने ती सिगरेट पेटवली जाते.

इकडे साउथच्या पब्लिकचे पैसे फिटलेले असतात. थेटरमध्ये शिट्यांचा आवाज घुमत राहतो.

रजनीकांत काही खूप अवाॅर्ड विनिंग अभिनेता नाही. त्याच्या चेहऱ्यावर अर्धोन्म्लीत डोळ्यांमध्ये निम्म्यावेळी एकच एक्स्प्रेशन असतो. पण दक्षिणेत त्याला देव मानतात. याच कारण म्हणजे त्याची स्टाईल. बाकी सिनेमा कसाही असू दे, त्याला स्टोरी असू दे अथवा नसू दे. रजनी , त्याचा वॉक, त्याची फाईट आणि त्याची सिगरेट एवढ असल तरी तिथल्या पब्लिकला पुरत.

आमच्या सागर शेळके नावाच्या भिडूने एक स्टोरी आम्हाला कन्फर्म करायला सांगितली.

आम्ही लहान असताना रजनीकांत बद्दल एक अफवा ऐकलेली की तो म्हणे कोल्हापूरच्या केएमटीमध्ये कंडक्टर म्हणून होता.

एकदा कुठला तर डायरेक्टर तिथ शुटींगसाठी आला होता. त्याची कार बंद पडली. रजनीच्या बसमध्ये त्याला लिफ्ट मिळाली. तिथे त्याला सिगरेट ओढायची तलफ आली पण लायटर नव्हत. मग आपल्या कंडक्टर असलेल्या रजनीने त्याला चप्पलला काडी ओढून सिगरेट पेटवून दिली. डायरेक्टर एकदम इम्प्रेस झाला. त्याने रजनीला आपल्या सिनेमात हिरो केलं.

तुम्ही पण ऐकली आहे का ही स्टोरी?? कोणी तरी म्हणालं की तो बेळगाव मध्ये कंडक्टर होता.

एकदम खर सांगायचं म्हणजे ही स्टोरी खोटी आहे. कुठल्या तर सुपीक डोक्याच्या कोल्हापूरच्या माणसाने ही स्टोरी बनवली असावी. त्या डायरेक्टरने रजनीच्या ऐवजी त्या पोराला चान्स द्यायला पाहिजे होता. नाही म्हटल तरी निवडणुकीत तरी प्रचाराला न्यायला पाहिजे होतं.

बर असो विषयांतर होतंय.

स्टोरी चार आणे खरी आहे. रजनीकांतच खर नाव शिवाजीराव गायकवाड. तो बेंगलोरच्या मराठी कुटुंबात जन्मला. त्याचे पूर्वज पुरंदर तालुक्यातल्या मावडीकडेपठार गावचे. जेजुरीपासून अगदी जवळच हे गाव आहे. तिथे आजही अनेक गायकवाड कुटुंबे राहतात.

रजनीच्या बापजाद्यापैकी कोणीतरी कर्नाटकात बागेवाडीला स्थलांतरीत झाले आणि नंतर बेंगलोरलाच रहिवाशी झाले. वडील पोलीस हवालदार होते. हा सगळ्यात धाकटा. बेंगलोरमध्येच त्याला कंडक्टरची नोकरी मिळाली. पण त्याला तो दिग्दर्शक तिथे भेटला नाही.

रजनीला अॅक्टिंगची आवड होती. लहानमोठ्या नाटकात काम करायचा. त्यांच्या बस डेपोमध्ये सुद्धा करत होता. एकदा त्याला कुठल्यातर सिनियर माणसाने सांगितलं की नोकरी सोड आणि अभिनयाच शिक्षण घे.

आपल्या पुण्यात जस एफटीआयआय आहे तसं चेन्नईमध्ये मद्रास फिल्म इंस्टीट्युट आहे.तिथ त्याला अॅडमिशन मिळालं.

या फिल्म  इंस्टीट्युटमध्ये एकदा के.बालाचंदर नावाचे दिग्दर्शक आले होते. त्यांनी यापूर्वी कमल हासन सारखा सुपरस्टार तमिळ फिल्मइंडस्ट्रीला दिला होता. हिऱ्याचा जोहरी ज्याप्रमाणे असतो तशी त्यांची ओळख होती. श्रीदेवी, चिरंजीवी, जयाप्रदा, प्रकाशराज असे अनेक कलाकार त्यांचीच फाईंड आहेत.

तर या बालचंदर यांना हा सिगरेट उडवणारा मुलगा नजरेत भरला. त्याची स्टाईल आवडली. आपल्या सिनेमात त्याला छोटा रोल दिला. हा रोल निगेटिव्ह शेडचा होता. बलाचंदर यांना हळूहळू जाणवत गेल ये बडा शेर है. त्यानी त्याला घडवल. शिवाजी गायकवाडचा सुपरस्टार रजनीकांत बनवला. बालाचंदर रजनीला कायम सांगायचे की त्याची स्पीड त्याची स्टाईल हाच त्याचा युएसपी आहे

पण रजनीकांतला ही स्टाईल बनवायला खूप कष्ट देखील करावे लागले आहेत.

लहानपणापासूनच त्याच लक्ष लोकांच्या हालचालीकडे असायचं. त्यांची नक्कल केल्यामुळे घरच्यांचा मार देखील खाल्ला होता. मोठा झाल्यावर सुपरस्टार शिवाजी गणेशनची नक्कल करू लागला. बालाचंदर यांनी कान धरल्यावर ही सवय सुटली. सिगरेट हवेत उडवायची स्टाईल तर तोत्याने हिंदी पिक्चर बघताना शत्रुघ्न सिन्हाच बघून बघून शिकला होता. रोज त्यासाठी हजार हजार वेळा प्रक्टीस केली. आज त्याच्या सिगरेट ओढण्यावर लोक फिदा आहेत.

एवढा मोठा सुपरस्टार होऊनही रजनीचे पाय आजूनही जमिनीवर आहेत. सिनेमात एवढी स्टाईल मारणारा रजनी एरवी आपलं टक्कल लपवण्याच्याही भानगडीत पडत नाही. एरवी लुंगीतच असतो.

तो कोल्हापूरचा नाही. त्याला मराठी येत. तंजावर धाटणीच्या गोड दख्खनी मराठीत तो बोलतो. पुरंदर तालुक्याच्या शूरवीरांच रक्त त्याच्यातही वाहतंय. तिथले गावकरी त्याच्या आगमनाची वाट बघत आहेत. अजून तो योग आला नाही पण एक ना एक दिवस आपल्या गावी येणार हे तिथल्या सरपंचांना रजनीने आश्वासन दिलंय. बघू कधी पूर्ण करतोय ते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.