बॅटल ऑफ जालौरच्या प्रसिद्ध लढाईत कान्हडदेव राजाने खिलजीला अक्षरशः पळवून लावलं होतं…

भारत देशाला राजा महाराजांची परंपरा होती आणि या देशाला परकीय आक्रमणाची देखील सवय होती. पण हि परकीय आक्रमणं परतवून लावण्यात काही महाराजांची मोलाची भूमिका होती. अल्लाउद्दीन खिलजीला राजस्थानच्या एका राजाने पळवून लावलं होतं आणि खिलजीने ज्या ज्या वेळी हल्ले केले त्या त्या वेळी या राजाने त्याला जबरी उत्तर दिलं त्याबद्दलची हि गोष्ट.

१२ व्या शतकामध्ये तुर्की आक्रमणांनी भारत ग्रासला होता. त्यावेळी राजस्थानच्या जालौरमध्ये महाराजा सामंत सिंह यांचं राज्य होतं. याच राजाचे सुपुत्र होते कान्हडदेव. लहानपणापासूनच कान्हडदेव आक्रमक आणि शूरवीर होता. पुढे तो महाराजा झाले आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरवात केली. 

१२९८ मध्ये खिलजीने भारतात प्रचंड नासधूस सुरु केली. गुजरातमध्ये खिलजीच्या सेनेने दिसेल त्याला चिरडीत, लुटपाट करायला सुरवात केली. इतक्या विध्वंसक रूपाने खिलजी चांगल्या चांगल्या वस्तूंची दुर्दशा करत होता.

याच वेळी खिलजीच्या सेनेने प्रसिद्ध सोमनाथ मंदिर आणि इतर काही मंदिरांची लुटपाट केली आणि मंदिरांची तोडफोड केली. गुजरातवर आपली वचक बसवल्यानंतर खिलजीने आपला मोर्चा वळवला तो राजस्थानकडे. खिलजीच्या सेनेने राजस्थानच्या छोट्यामोठ्या राज्यांवर विजय मिळवला आणि आता त्याची नजर होती जालौरवर.

जालौरमध्ये आल्यावर खिलजीने एक भयंकर, विकृत काम केलं ते म्हणजे लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या महादेव मंदिरातील शिवलिंग तोडून टाकलं, कैक स्त्रियांना आणि लहान मुलांना कैद केलं. या सगळ्या गोष्टींची माहिती जेव्हा राजा कान्हडदेवाला समजली तेव्हा त्याने शपथ घेतली कि,

खिलजीच्या तावडीतून सगळ्या लोकांची मुक्तता करील आणि पुन्हा एकदा भव्य दिव्य शिवमंदिर उभं करील.

राजा कान्हडदेवाने खिलजीला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी आपली एक खास फौज तयार केली. एका विशेष रणनीतीसह सेनेची दोन भागात विभागणी केली. राजा कान्हडदेव आपली सेना घेऊन ९ कोस दूरवर असलेल्या साकरना गावात जाऊन पोहचले. सकाळ होताच अत्यंत त्वेषाने राजा कान्हडदेवाने खिलजीच्या सेनेवर हल्ला चढवला. खिलजीची सेना हि राजा कान्हडदेवाच्या तुलनेत प्रचंड मोठी होती.

अचानक झालेल्या हल्ल्याने तुर्की सेनेची धांदल उडाली. आता शस्त्र उचलायची संधीही राजा कान्हडदेवाने खिलजी सेनेला दिली नाही. त्यामुळे तुर्की सेना आपला जीव वाचवण्यासाठी मैदान सोडून पळू लागली. या लढाईत राजा कान्हडदेवाच्या हातून मोठा पराक्रम घडला तो म्हणजे एकतर खिलजी आणि त्याची सेना पळून गेली आणि या युद्धात खिलजीचा पुतण्या मारला गेला. 

यानंतर राजा कान्हडदेवाने कैद असलेल्या बायकांना आणि लहान मुलांना सोडवलं आणि पुन्हा एकदा नव्याने मंदिरांची पुनर्बांधणी केली. अशा प्रकारे राजा कान्हडदेवाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. दुसऱ्या वेळी खिलजीने आक्रमण केलं त्याला कारण वेगळं होतं ते म्हणजे राजा कान्हडदेवाचा मुलगा होता वीरमदेव. तो दिसायला देखणा आणि राजबिंडा गडी होता. खिलजीच्या मुलीला त्याची वीरता आवडली होती.

मुलीच्या हट्टीपणामुळे खिलजीने राजा कान्हडदेवाला वीरमदेव सोबत आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव पाठवला. पण राजा कान्हडदेवाने त्याला साफ नकार दिला. यावर खिलजी चिडला आणि त्याने आपला सेनापती नहर मलिक याला जालौरवर हल्ला करण्यास सांगितलं. पण यावेळीही त्याच्या सेनेला सपाटुन मार बसला. 

आता घडी घडी मिळणाऱ्या पराभवांमुळे खिलजी चिडला आणि तो स्वतः फौज घेऊन हल्ला करण्यासाठी आला. खिलजीसोबत बरेच दिवस राजा कान्हडदेवाचं युद्ध सुरु होतं. राजपूत योद्धे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. राजा कान्हडदेवाने खिलजीच्या महत्वाच्या ५० सरदारांना संपवलं पण या लढाईत राजा कान्हडदेव मारले गेले.

आता सगळी जबाबदारी वीरमदेववर आली होती. खिलजीच्या सेनापतीने राजकुमार वीरमदेवला पुन्हा एकदा विवाहाचा प्रस्ताव दिला पण राजकुमाराने तो धुडकावून लावला. पुन्हा एकदा घनघोर युद्ध झालं आणि या युद्धात वीरमदेवसुद्धा मारला गेला. पण या पितापुत्रांनी खिलजीला घाम फोडला होता नव्हेच तर पळवून पळवून मारलं होतं.

हे हि वाच भिडू :

1 Comment
  1. Ravi says

    ब्लॉग छान बनवला आहे…आणि पोस्ट पण एकदम खतरनाक असतात..

Leave A Reply

Your email address will not be published.