…. म्हणून राजू शेट्टींना दरवेळी बाजू बदलावी लागतेय

“आम्ही त्यांचा घटक पक्ष असलो म्हणून काय आम्ही काय त्यांचे गुलाम नाही”

असं म्हटलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी. शेट्टींनी महाविकास आघाडीविरुद्ध मोर्चा काढत पक्ष तसेच पक्षातील बड्यां नेत्यांवर हल्लाबोल केलाय. आणि पहिल्यांदाच नाही बर का, याआधीही त्यांनी सत्ताधारी पक्षावर आसूड ओढलंय. राजू शेट्टीच्या या वागण्यामुळे ते सत्ताधारी पक्षावर नाराज असून आता ते काय परत भाजपला जवळ करणार का? अश्या चर्चाना उधाण आलंय. 

तसं पाहायचं झालं तर सध्या महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडीचं आहे आणि याच महाविकास आघाडीत राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना घटक पक्ष आहे. आता शेतकरी संघटना म्हंटल्यावर शेतकऱ्यांच्या बाजून उभं राहणं हे त्यांचं आद्य कर्तव्य, मग त्यासाठी मोर्चे काढावे लागले तरी फिकीर नाही.

तर झालं असं कि, ऊसाच्या एफआरपी क्विंटल मागं फक्त ५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. पण ही वाढ शेतकऱ्यांसाठी तुटपुंजी, त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनीही उडी घेतली आणि सरकार विरोधात मोर्चा काढला.

एवढंच नाही तर नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांचं भारी नुकसान झालं. यासाठी महाविकास आघाडी सरकारनं मदत जाहीर केली खरी पण ती तोडकी मदत शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढणारी नाही. त्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर ही मदत १३५ रुपये प्रति गुंठा एवढीच मदत आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुरग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला.

महत्वाचं ,म्हणजे मोर्चात राजू शेट्टींनी भाजपचे जिल्हा  उपाध्यक्ष निशिकांत पाटील आणि शिराळा येथील माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना सोबत घेतले. आता  जयंत पाटील हे निशिकांत पाटील आणि नाईक यांचे राजकीय शत्रू आहेत.

या मोर्च्यात राजू शेट्टी यांनी आघाडी सरकारनं पूरग्रस्तांची फसवणूक केल्याचा आरोप केला.  पॅकेजची घोषणा केली पण अजूनही कोणतीच मदत केली नाही असं म्हणतं सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.

यावर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये. राज्यशासन मदतीसाठी तत्पर आहे, असं आवाहन केलं.

यावर राजू शेट्टींनी दोन्ही नेत्यांवर सडकून टीका करत म्हंटल कि, ‘आम्ही महविकास आघाडीचे घटक असलो तरी त्यांचे गुलाम नाही. तुम्ही शेतकऱ्यांना दमडीही दिली अश्यावेळी आम्ही काय शांत बसून भजन करायचे का? ‘

आता राजू शेतीच्या या सगळ्या बोलण्यावरून त्यांची महाविकास आघाडी विरुद्ध भूमिका स्पष्टपणे दिसून येतेय. कारण सत्ताधारी पक्षात राहून सत्तेविरुद्धचं आंदोनल करणं, मोर्चे काढणं ही न पचणारी गोष्ट. कारण हे काम विरोधी पक्षाचं.  त्यामुळे एकाच ठिकाणी जास्त वेळ स्थिर नसलेले राजू शेट्टी पुन्हा भाजपाच्या दिशेने वाटचाल करतायेत, असं बोललं जातंय.

राजू शेट्टींनी अनेकदा बाजू बदलीये

तर १९७० च्या दशकात शरद जोशींनी शेतकरी संघटनेची स्थापना केली. कारखानदारांचा दबाव, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा अशा हेतूनं या संघटनेची स्थापना करण्यात आली. त्यांनतर १९९३-९४ च्यादरम्यान डिप्लोमा इंजिनियरिंग केलेले राजू शेट्टी या संघटनेत सामील झाले, त्यांना शिरोळ तालुकाप्रमुख करण्यात आलं.

त्यांनतर २००४ मध्ये शेतकरी संघटनेनं भाजप-शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आपण जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, अशी भूमिका घेत राजू शेट्टींनी पक्ष सोडला आणि आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना या नवीन पक्षाची स्थापना केली.

दरम्यान, त्यांचा मतदानसंघ असलेलं शिरोळ हेच संघटनेच्या आंदोलनाचं प्रमुख केंद्र होत, ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. 

राजू शेट्टी हे कट्टर शरद पवार विरोधी मानले जायचे. दोन्ही काँग्रेसला विरोध करण्यासाठी ते महायुतीत सामील झाले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारविरुद्ध आंदोलने देखील केली. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात चुकीचं धोरण राबविल्याने शेट्टी नाराज झाले आणि अवघ्या दोन वर्षांतच त्यांनी महायुतीविरोधात एल्गार पुकारला. 

त्यांच्या या रागाचं आणखी एक कारण म्हणजे भाजपने शेट्टींची पीछेहाट करत सदाभाऊ खोत यांच्या राजकारणाला संधी दिली. त्यामुळे राजू शेट्टींनी युतीतूनही बाहेर पडत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली.

महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर तरी शेतकर्‍यांचे प्रश्न मार्ग लागतील. सोबतच भाजपमध्ये न मिळालेला मान आपल्याला या आघाडीत मिळेल अश्या हेतून राजू शेट्टी महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनले.

मात्र आता पुन्हा एकदा राजू शेट्टी यांनी सत्तेत राहूनच सत्ताधारी पक्षाविरुद्ध आंदोलनाचा बडगा उचललाय. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर त्यानी टीका केलीये,यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा आहेत. त्यामागचं कारण महाविकास आघाडीनं सरकारकडे केललं दुर्लक्ष असल्याचं शेट्टींनी म्हटलंय. 

दरम्यान, शेट्टींचं हे आंदोलन भाजपच्या दिशेने महत्वाचं म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने असल्याच बोललं जातंय. कारण पुढच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र राहिली तर हातकणंगलेची जागा धैर्यशील मानेंच्या खात्यातच जाणार, त्यामुळे शेट्टीची अडचण होणार.

त्या गेल्या निवडणुकीला महाविकास आघाडीने संघटनेला हातकणंगले आणि सांगली या दोन जागा दिल्या होत्या.  पण  तिथं पक्षाला पराभव मिळाला. बर नंतरही तसेच झालं. त्यामुळे  महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना फार्स महत्व मिळत नाही, संघटनेला निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही.

 या सगळ्याच कारणांमुळं लोकसभा निवडणुकीसाठी पर्याय म्हणून राजू शेट्टी भाजपच्या दिशेने वाटचाल करतायेत त्यामुळेच सत्ताधारी पक्षाविरुद्ध बोलबाला सुरु केलाय.  

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.