शिवार ते पवार, मध्येच आली कट्यार…

राजकारणात पवारांचा माणूस असणं किंवा पवारांचा विरोधक असणं या दोन गोष्टी चांगल्या चालतात. दोन्ही भूमिका निभावणारी माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात खूप कमी झाली.

पवारांचे समर्थक ते पवारांचे विरोधक असा प्रवास देखील अनेकांचा झाला पण पवार विरोधक ते पवार समर्थक हे भाग्य नशिबात आलं ते शेट्टी साहेबांच्या.

राजू शेट्टी शिवारातला माणूस म्हणून ओळखला जातो. दूर्देवाने या शिवारात फक्त ऊसाचा उतारा पडत राहिला. शरद जोशींसोबत मतभेद झाल्यानंतर स्वत:चा सवता सुभा मांडायचं काम शेट्टींनी केलं.

नाही म्हणायला जोशींनी ब्राह्मणाचा माणूस देखील शेतीचे प्रश्न उचलू शकतो हे दाखवून दिलं होतं. त्यामुळे जातीचा तडाखा राजू शेट्टींना तसा कमीच बसला. शेट्टीचं जैन असणं हे त्यांच्या मतदारसंघात त्यांच्यासाठी फायद्याचं गणित ठरत होतं. ही गोष्ट तर पवारांनीच जाहीर दाखवून दिली होती.

राजू शेट्टींनी ऊसाचा प्रश्न हातात घेतला. ऊस म्हणजे कारखानदार आणि कारखानदार म्हणजे पवार हे साधं गणित.

पर्यायाने टोकाचा पवार विरोध झाला.. मतदारसंघात सारे पाटील असोत किंवा जयंत पाटील अशा तगड्या माणसांच्या कारखानदारीला सुरुंग लावायचं काम त्यांनी केलं.

ऊसाचा ८०० रुपये दर अडीच तीन हजारांच्या टप्यात घेवून जाण्यासाठी राजू शेट्टींना एकतर्फी क्रेडिट द्यायला हवं हे मान्यच.

शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या न्यायाने शेट्टींनी सांगलीच्या सभेत मोदींचा हात पकडला. राजू शेट्टी पुन्हा लोकसभेत गेले. शेतकरी चळवळीचा एक तोटा असतो तो म्हणजे सत्ता आली की या नेत्यांना स्वत:ला टिकवणं जड जातं.

सदाभाऊ खोतांसोबत शेट्टींच बिनसलं. कालचे सदाभाऊ चळवळीतनं येवून मंत्री झाले आणि शेट्टी फक्त खासदारकीपुरते उरले.

या काळात शेट्टीं मोदींच्या कंपूतून हळूवारपणे बाजूला झाले. शेट्टींचा शत्रू आत्ता भाजप झाली तर स्वाभीमीनीच्या कार्यकर्त्यांचा शत्रू सदाभाऊ झाले.

ज्या शरद जोशींचा हात त्यांनी भाजपची जवळीक नको म्हणून सोडला होता त्यांचीच जवळीक शेट्टी साहेब भोगून रिकामे झाले होते. इतक्या काळात नेमकं काय बिघडलं तर विश्वास कुणावर ठेवायचा हे समजणं अवघड होवून बसलं.

एकतर आपल्या शिवारातले सगळे गडी पवार विरोधक म्हणून तयार केले होते. बारामतीच्या गोविंदबागेसमोर आंदोलन करून हा कडवेपणा जोपासला होता. अशा पवारांसोबत त्यांनी पुन्हा एकदा शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने जुळवून घेतलं.

पण गावगाड्याच्या राजकारणात ही सांगड मात्र बसत नव्हती. ज्या शेट्टींचा आयुष्यभर विरोध केला त्यांना समर्थन करण्याची वेळ पवार कार्यकर्त्यांवर आली तर ज्या पवारांना शिव्याशाप देण्यात वेळ खर्ची घातला त्यांच्या माणसांसोबत उठबस करण्याची वेळ स्वाभीमानीवर आली. विशेष म्हणजे या सगळयात स्वाभिमानी नावाची गोष्ट मात्र टोटल डिबार झाली.

पण हा विरोध पोटातच राहिला. जोपर्यन्त कोणीकोणीवर उपकार करत नाही तोपर्यन्त सगळंकाही खेळीमेळीत झालं.

लोकसभा लागली तेव्हा राजू शेट्टींना पहिल्यांदा पवारांचा पाठिंबा मिळाला. आजवर पवार विरोधावर निवडून येणारे शेट्टी पवारांचा पाठिंबा मिळताच पडले. आणि इथंच घोळ झाला.

वसंतदादा पाटील एका भाषणात म्हणाले होते, माणसाला सर्वात जास्त कमीपणा इलेक्शनमध्ये पडल्यावर वाटतो.

असच राजू शेट्टी आणि स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांच झालं. हातात पद असेल तर काम होतं ही गोष्ट राजू शेट्टींना समजली होती. आपल्या जिवावर इतरजण निवडून येत असताना आपण पडलो ही गोष्ट जिव्हारी लागण्यासारखीच होती.

पद हवं ही गोष्ट खरी पण त्यासाठी रितसर मिंध्यात जाणं हे स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांना रुचल नाही.

आणि इथूनच सुरू झाला राजू शेट्टींना विरोध. आज स्वाभीमानीचे कार्यकर्त्यांच्यातच विधानपरिषदेवरून मतभेद असल्याची कबूली खुद्द राजू शेट्टींनी दिली. कितीही झालं तरी हे कार्यकर्ते पवार विरोधक म्हणूनच तयार झालेल आहेत हेच राजू शेट्टी विसरले.

पवारांची कट्यार कधीही काळजात घूसू शकते हा विश्वास स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांना वाटला तर चुकीच काय आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.