आमदार राजू शेट्टींनी लोकांना वाचवण्यासाठी थेट महापुरात उडी मारली होती…

मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही. 

महात्मा गांधींनी सत्याग्रहाचे शस्त्र हाती घेऊन इंग्रज सरकारला गुडघे टेकायला लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या महाविकास आघाडी सरकारलाही पूरग्रस्तांच्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी गुडघे टेकायला लावण्यासाठीच सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला आहे. या सत्याग्रहाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही.

हा इशारा दिलाय माजी खासदार राजू शेट्टी यांनी. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराने सर्वसामान्यांचे फार मोठे नुकसान झाले. त्यांना तातडीने मदत मिळावी, मागील महापुरातील ५० हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्यावी यासाठी राजू शेट्टीने पंचगंगेत जलसमाधी घेणार असल्याचं म्हणत खळबळ उडवून दिली.

आज महापुराचा फटका बसलेल्या जनतेसाठी राजू शेट्टी आंदोलन करीत आहेत. पण ते आताच पूरग्रस्तांसाठी आंदोलन करत आहेत असं नाही. तर याआधी सुद्धा त्यांनी पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी महापुरात उडी मारली होती.

तर ते साल होत २००५ चं.  २६ जुलै २००५ चं. 

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला अन् कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली. लोकांच्या काळजाचा ठोका चुकू लागला. जून महिन्याच्या प्रारंभीच पावसाने जोर धरल्याने सुरुवातीलाच धरणे भरली.

त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. अलमट्टी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा केल्याने शिरोळ तालुक्यास महापुराचा फटका बसला. शंभर वर्षातील विक्रम मोडीत काढून महापुराने नवा विक्रम केला.

त्या महापुरात शिरोळ तालुक्यातील १९ हजार ५०० हेक्टर पीकक्षेत्र पाण्याखाली गेले. १३६२ घरे जमिनदोस्त झाली. चार हजारहून अधिक घरांची पडझड झाली. अक्राळ-विक्राळ रुप धारण केलेल्या या महापुराने लोकांचे जगणे मरणप्राय केले.

अशा स्थितीत लष्कराच्या मदतीने ग्रामस्थांना यांत्रिक बोटीतून आपला गाव सोडावा लागला. असच शिरोळ मधल्या बस्तवाड या एका गावात पाणी वाढू लागल्याने पूरग्रस्तांना घरावरील छताचा, उंच इमारतींचा आधार घेतला. या लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRF ची टिम घटनास्थळी पोहोचली. या पूरग्रस्तांना सुरक्षीत स्थळी हलविण्याचे प्रयत्न लष्करी जवान आपल्या नौकेतून करीत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास शेवटची खेप होती.

त्यातल्या एका बोटीत खुद्द राजू शेट्टी होते. तेव्हा ते विधानसभेचे आमदार होते.

त्या बोटीत त्यांनी लोकांना घेतलं. एका बोटीत १० असे लोक होते. NDRF ची ही बोट जोराने मार्ग कापत होती. बोटीत बसलेल्या लोकांना तोवर तरी बोटीचा अंदाज नव्हता. जोरानं जाणाऱ्या बोटीला लोक घाबरले आणि एका बाजूला कलले. झालं.. बोट पलटी झाली. दहाच्या दहा लोक पाण्यात पडले.

पण राजू शेट्टींनी मागचा पुढचा विचार न करता आरोळी ठोकत पाण्यात उडी मारली. फक्त आणि फक्त लोकांना वाचवण्यासाठी. वाचवलेल्या लोकांना त्यांनी मागून येणाऱ्या बोटीत बसवलं. 

पुढं शिरोळ तालुक्यात कुरुंदवाड, बस्तवाड, खिद्रापूर, मजरेवाडी, अकिवाट, टाकळी, राजापूर या नदीकाठच्या गावातील घरांत पुराचे पाणी शिरले. पुराचे पाणी दोन दिवसात उतरेल ही आशा फोल ठरली. वाढणारे पुराचे पाणी अन् आभाळातून बरसणारा पाऊस यामुळे पूरग्रस्तांनी धीर सोडला. अशा स्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकांना मदतीचा हात दिला. महापूर ओसरल्यानंतर ही गावी परतणाऱ्या पूरग्रस्तांना पंधरा दिवस पुरेल इतका शिधाही देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.

आणि आज ही २०२१ च्या महापुराचा लोकांना बसलेला फटका, वारंवार पुरामुळे नदी काठावरील शेतीचे मोठे नुकसान, या पार्श्वभूमीवर पुरग्रस्तांचे विनाअट पुनर्वसन झाले पाहिजे म्हणून राजू शेट्टींनी पुन्हा एकदा प्रयाग चिखली ते पंचगंगा उगमापर्यंत नृसिंहवाडी पर्यंतच्या सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला आहे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.