राजू श्रीवास्तव : ब्रेन डेड आणि कोमा… दोन्ही अवस्थांमधील नेमका फरक काय ?

आम्ही सगळेजण शांतपणे आपलं काम करत बसलो होतो. तितक्यात एक भिडू जोरजोरात हसू लागला. कुणाल काम्राच्या जुन्या स्टॅन्डअप कॉमेडीमधला एक शॉट त्याच्या इन्स्टा टाइमलाईनवर आला होता. तोच त्याने सगळ्यांना दाखवला. अनेकांनी कित्येकदा तो जोक ऐकलेला म्हणून पुन्हा काय सगळ्यांना हसू आलं नाय.

आता हे भावाच्या जिव्हारी लागलं. त्याने पटकन युट्युब उघडलं एक टॉपचा कॉमेडी व्हिडीओ लावला आणि सगळ्यांना दाखवला. तो व्हिडीओ कित्येकांनी बघितलेला पण यावेळी सगळे हसले. ही ताकद होती एकाच कॉमेडीयनमध्ये…

 राजू श्रीवास्तव

हसता हसता सगळे काहीसे भावनिक सुद्धा झाले. याला कारण होतं राजू श्रीवास्तव यांची सध्याची स्थिती. राजू श्रीवास्तव सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात ॲडमिट आहेत. वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आल्याने राजू यांना १० ऑगस्टला तिथे ॲडमिट करण्यात होतं. 

त्याची हेल्थ कंडिशन सांगायची तर डॉक्टरांनी त्यांना ‘जवळजवळ ब्रेन डेड’ घोषित केलंय. 

यावरून एका भिडूने प्रश्न विचारला… हे ब्रेन डेड म्हणजे कोमाच का? की वेगळं असतं? आणि ब्रेन डेड व्यक्ती परत शुद्धीवर येऊ शकतो का? ठोस असं उत्तर त्यावर कुणी देऊ शकलं नाही कारण सगळेच कन्फ्युज होते. म्हणून म्हटलं दोन्हीतला प्रेरफेक्ट फरक शोधावा आणि आपल्या भिडूंना सांगून त्यांचंही मेडिकल नॉलेज जरा वाढवावं. 

कोमा आणि ब्रेन डेड या दोन अवस्थांमध्ये माणसाला पोहोचवण्यासाठी मेंदूचे दोन भाग कारणीभूत ठरतात.

पहिला भाग म्हणजे कॉर्टेक्स.

कॉर्टेक्स हा मेंदूचा मोठा भाग असतो. भाषा, स्मरणशक्ती, वाचणं, चालणं, निर्णय घेणं या गोष्टी कॉर्टेक्सद्वारे चालवल्या जात असतात. 

जर आपण पडलो वगैरे आणि त्यात मेंदूच्या या कॉर्टेक्स भागाला काही दुखापत झाली तर माणूस कोमात जाऊ शकतो. कोमा म्हणजे अशी अवस्था ज्यात माणूस पूर्ण बेशुद्ध होतो आणि मेंदूचं काम हळूहळू कमी होतं जातं. पण यामध्ये श्वसनसंस्था आणि हृदयावर मेंदूचा कंट्रोल असतो. 

कोमात गेलेल्या व्यक्तीच्या संवेदना परत येऊ शकतात. म्हणजे त्याचा मेंदू परत सगळ्या गोष्टींवर कमांड घेऊ शकतो आणि व्यक्ती शुद्धीत येऊ शकतो. मग याला कधीकधी कित्येक वर्ष लागतात. 

ब्रेन स्टेम हा मेंदूचा दुसरा भाग असतो. 

हा छोटा आणि तळाचा भाग असतो जो मणक्याला जोडलेला असतो. ब्रेनस्टेम आपल्या मेंदूकडून आपल्या शरीराच्या इतर भागांत सिग्नल पाठवत असतं. श्वासोच्छ्वास, हृदयाची गती अशा गोष्टींवर याद्वारे नियंत्रण केलं जातं.

ब्रेन स्टेम डेड झालं तर श्वास घेण्याची प्रक्रिया थांबते आणि श्वास घेणं बंद झालं तर हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही म्हणून हृदय काम करणं बंद पडतं. बाकी अवयव सुद्धा ऑक्सिजन न मिळाल्याने हळूहळू मरण पावतात. 

कोमामध्ये जाण्यासाठी फक्त कॉर्टेक्सला इजा होणं पुरेसं असतं. पण कॉर्टेक्सचा आणि ब्रेन स्टेमचा मृत्यू होणं या अवस्थेला ब्रेन डेड समजलं जातं. सोप्यात सांगायचं तर मेंदूचं काम असतं आज्ञा देणं आणि संवेदना जागृत ठेवणं. हे काम पूर्ण बंद झालं की माणसाला ब्रेन डेड म्हणून घोषित केलं जातं. कोमाच्या पुढची स्टेज म्हणजे ब्रेन डेड. 

ब्रेन डेड कधी होतं? 

जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला जोराचा मार लागला अचानक मोठा स्ट्रोक आला तर डोक्यात सूज येणं सुरु होतं. ही सूज वाढत जात असते. डॉक्टर औषध देऊन किंवा ऑपरेशन करून सूज कंट्रोल करू शकतात मात्र यात यश आलं नाही तर मेंदूवर दबाव वाढतो. अशावेळी हृदय ऑक्सिजनयुक्त रक्त मेंदूपर्यंत पोहचवू शकत नाही आणि परिणामी ब्रेन सेल्स मरतात आणि हळूहळू ब्रेन स्टेम मरतं.

जर माणूस बेशुद्ध असेल, श्वास घेत नसेल, डोळ्यांचे बुबुळ लाईट चमकावल्यावर काही प्रतिसाद देत नसेल म्हणजेच संवेदनाच जाणवत नसतील तर ही ब्रेन स्टेमच्या मृत्यूची लक्षणं मानली जातात. 

आता प्रश्न उरतो ब्रेन डेड झालेला व्यक्ती परत शुद्धीवर येऊ शकतो का? हे जाणून घेण्यासाठी बोल भिडूने इंडियन मेडिकल असोशिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं… 

ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीची परत शुद्धीवर येण्याची शक्यता शून्य असते. कारण त्याचा मेंदूचं मृत झालेला असतो तेव्हा शरीराच्या कोणत्याही गोष्टीवर परत कमांड मिळवणं अशक्यच असतं. 

मग ब्रेन डेड घोषित केलं म्हणजे मृत्यूच झाला असं म्हणता येईल का? तर नाही. 

माणूस मृत झाला आहे हे  भारतीय पद्धतीने हृदय बंद होतं तेव्हा जाहीर केलं जातं. ब्रेन डेड व्यक्तीचा मेंदू जरी मृत झालेला असला तरी त्याचं हृदय सुरु असतं. कसं तर ते व्हेंटिलेटरमुळे. व्हेंटिलेटरद्वारे कृत्रिम रित्या हृदयाला ऑक्सिजन पोहोचवलं जात त्यामुळे हृदय जिवंत असतं आणि हृदय जिवंत म्हणजे माणूस जिवंत आहे, असं म्हटलं जातं. 

हृदय कितीवेळ सुरु राहील हे त्या व्यक्तीचं हृदय किती सुदृश आहे यावर असतं. ते जास्त काळ सुरु राहावं म्हणून इंजेक्शन वगैरे देखील दिले जातात. मात्र तरी त्याचा जास्त फायदा होत नाही. शरीरातील इतर अवयव हळूहळू मरण पावतात. अशात रक्तातील दूषित पदार्थ प्रमाणाबाहेर वाढले की ते बंद पडतं. 

ब्रेन डेड झालेलं असलं तरी व्हेंटिलेटरवर का ठेवलं जातं? हृदय सुरु ठेवण्याचा अट्टहास का केला जातो?

आपल्याकडे ऑर्गन डोनेशन करण्यासाठी ब्रेन डेड व्यक्तींचा उपयोग होतो. मेंदू बंद झालेला असतो मात्र बाकीचे अवयव चांगले असतात तेव्हा ते दान केले जाऊ शकतात. कृत्रिम रित्या श्वास देऊन त्यांना हृदय जिवंत ठेवल्याने बाकीचे अवयव देखील काही काळ जिवंत ठेवले जाऊ शकतात. 

हा स्पेस शरीरातील अवयव बाहेर काढण्यासाठी वापरला जातो. मात्र हा त्या व्यक्तीच्या आप्तेष्टांचा प्रश्न असतो की त्यांना अवयव दान करायचे आहेत किंवा नाही. 

राजू श्रीवास्तव यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांचं हृदय जिवंत आहे म्हणून ते आपल्यात आहेत. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.