राज्यसभा निवडणूकीत फक्त एका पेनमुळे असा गेम होऊ शकतो…

फार जुनी नाही. २०१६ च्या निवडणुकीची गोष्ट. 

२०१६ च्या राज्यसभेच्या निवडणुकीत एक गडबड झाली आणि ती एक वादग्रस्त निवडणूक ठरली. काँग्रेसच्या आमदारांनी मतदान करतांना चुकीचा पेन वापरला होता आणि त्यामुळे काँग्रेसची १२ मतं रद्द करण्यात आली होती.

आवश्यक मतांचा कोटा नसतांनाही केवळ काँग्रेसची मतं रद्द झाल्यामुळ अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर निवडून गेले होते.

या सगळ्याला कारणीभूत काय ठरलेलं तर एक चुकीचा पेन. 

होय..एका पेनाने चक्क कॉंग्रेसच्या उमेदवाराला हरवलेलं. आता हे सांगण्याचं कारण म्हणजे राज्यसभेच्या तोंडावर घोडेबाजार, रेसॉर्ट पॉलिटिक्स या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतायत, निवडणूकीत नेमकं काय होईल काही सांगता येत नाही.

पण यामध्ये राज्यसभेच्या निवडणुकीचेही काही नियम असतात, त्यात थोडीशी चुक झाली तर त्या आमदारचं मत रद्द होऊ शकते…

म्हणूनच आजचा विषय राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं आणि मतदान करणाऱ्या आमदारांना काय नियम असतात???

झी मीडियाचे संस्थापक सुभाषचंद्रा हे २०१६ मध्ये हरियाणातून अपक्ष म्हणून राज्यसभेवर निवडून गेलेले. पण कसे तर, हरियाणा विधानसभेत ९० सदस्य होते. ९० मतांपैकी भाजपच्या बिरेंदर सिंग यांना ४०, काँग्रेस -इंडियन नॅशनल लोकदल पुरस्कृत आर.के आनंद यांना २१ आणि सुभाषचंद्रा यांना १५ मते मिळाली होती तर १४ मते रद्द ठरवण्यात आली.

तब्बल १४ मतं रद्द झाल्यानंतर सगळं गणितच बदललं होतं.  

बिरेंदर सिंग यांना विजयासाठी केवळ २६ मतांची गरज होती. त्यांना ४० मते मिळाल्याने, उरलेली १४ मते सुभाषचंद्रा यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली कारण भाजप आमदारांनी त्यांच्या दुसऱ्या पसंतीची मतं सुभाषचंद्रा यांना दिली होती. त्यामुळे चंद्रा यांना अखेर २९ मतं मिळाली. तिसरे उमेदवार आर.के आनंद २१ मतांवरच राहिले. 

अगदी सोप्पा विजय असताना देखील आर.के आनंद यांचा पराभव झाला. सुभाषचंद्रा यांनी अशक्य असलॆला विजय खेचून आणला होता. आणि हे सगळं झालं होतं काँगेसची तब्बल १४ मतं रद्द ठरवल्यामुळे.  

काँग्रेसची जी १४ मतं रद्द झाली होती त्यामागचं कारण होतं ते म्हणजे काँग्रेसच्या आमदारांनी मत देण्यासाठी चुकीचा पेन वापरला होता.

काँग्रेसच्या आमदारांनी मतदान सुरू केले त्याचवेळी कोणीतरी इलेक्शन कमिशनने दिलेला पेन बदलून साधं पेन मतदान कक्षात ठेवलं होतं आणि काँग्रेसच्या आमदारांनी त्या पेनाने मतदान केलं त्यांची सगळी मतं बाद करण्यात आली.  

त्यांनी इलेक्शन कमिशनने दोऱ्याला बांधून ठेवलेल्या जांभळ्या स्केचपेनने मतपत्रिकेवर आपलं मत न नोंदवता दुसऱ्या निळ्या पेनाने आपलं मत नोंदवलं होतं असं इलेक्शन अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं…अशाप्रकारे काँग्रेसची १२ मतं बाद झाली.

बरं एक पेन च याला कारणीभूत ठरला नाही तर रणजीत सुरजेवाला यांनी त्यांचं मत दुसऱ्या एका आमदाराला दाखवल्याने ते मतच बाद झालं. 

तर एका आमदाराने मतपत्रिकेत काही मार्किंगच केली नव्हती त्यामुळे ते मत मोजलं गेलं नाही. म्हणजे टोटल १४ मतं बाद. अन अशा रीतीने सुभाष चंद्रा राज्यसभेत पोहचले. भाजपच्या आमदाराने पेन बदलला म्हणून काँग्रेसच्या नाराज आमदारांनी अनेक आरोप केले मात्र त्याचा सुभाषचंद्रांच्या खासदारकीवर कोणताच परिणाम झाला नाही…

याच वादग्रस्त निवडणुकीनंतर इलेक्शन कमिशनने राज्यसभेचे नियम जरा कडक केले जे काटेकोरपणे पाळलं जातात…तेच नियम थोडक्यात समजून घेऊया..

२०१६ नंतर अशा प्रकारच्या निवडणुकीत शाईचे वाद निर्माण होऊ नये, मतदारांची फसवणूक होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने मतदारांसाठी खास पेन तयार केले आणि इथून पुढे डिझाइन केलेल्या जांभळ्या रंगाच्याच पेनाने मतदान करण्याचा नियम सुरु झाला.  

– जांभळ्या रंगाची शाई स्वतः निवडणूक आयोगाकडूनच पुरवली जाईल असं ठरवण्यात आलं. 

– असा नियमच घालून दिला कि, मतदारांनी मतदानकक्षात पेन घेऊनच जायचा नाही. निवडणूक आयोगाकडून हा जांभळ्या शाईचा पेन मतदारांना मतपत्रिकेसोबतच दिला जातो. 

–  त्याशिवाय इतर कोणताही पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन वापरता येत नाही जर तसं झालं तर ती मतपत्रिका अवैध ठरवली जाईल. असा हा नियम ठरवण्यात आला.. हा झाला पेनाचा नियम.

-आमदारांना दिल्या जाणाऱ्या मतपत्रिकेवर उमेदवाराचं नाव आणि त्याच्या पुढे पसंतीक्रमाचा रकाना असतो. त्या रकान्यात ज्या आमदाराला प्रथम पसंतीक्रमांक द्यायचा आहे त्यासमोर १ हा अंक लिहायचा.

– उमेदवार कितीही असोत मात्र एकाच उमेदवाराला पहिला पसंतीक्रमांक द्यायचा असतो.

– पहिला पसंतीक्रमांक दिल्यानंतर उरलेल्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावासमोर पंसंतीक्रमाच्या रकान्यात ज्याला दुसरी पसंती आहे, त्याला २ क्रमांक, ३ क्रमांक, ४ क्रमांक अशा पद्धतीने मत देऊ शकतात.

– एका पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर सेम अंक दर्शवलेला नाही ना याचीही खात्री मतदारांनी करून घेतली पाहिजे.

– पसंतीक्रमाच्या रकान्यात तो क्रमांक अंकातच म्हणजेच  १, २, ३ असाच लिहायचा असतो. शब्दांमध्ये म्हणजे एक, दोन, तीन असा लिहायचा नसतो.

– तसेच पसंतीक्रम हा I II III या प्रमाणे रोमन स्वरूपात लिहिता येतो.

– मतपत्रिकेवर नाव लिहायचं नसते, सही करायची नसते ना कोणत्याही प्रकारचे अद्याक्षरंही लिहिता येत नसतात जर तसं आढळलं तर मतपत्रिका अवैध ठरवली जाते.

– मतपत्रिका वैध ठरण्यासाठी कोणत्याही एका उमेदवाराच्या नावासमोर १ हा अंक लिहून पसंतीक्रम दर्शवायचा असतो. नंतरचे दुसरे-तिसरे पसंतीक्रम देण्याची सक्ती नसते.

– राज्यसभेच्या निवडणुकीत होणाऱ्या क्रॉस-व्होटिंगला आळा घालण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या आमदाराने मतपत्रिका बॅलेटबॉक्समध्ये टाकण्यापूर्वी आपण कुणाला मत देतोय हे पक्षाच्या अधिकृत एजंटला दाखवावं लागतं. त्या मतदार आमदाराने त्याची मतपत्रिका अधिकृत एजंटला दाखवावी असा नियम आहे.

– तसेच अधिकृत एजंटला मतपत्रिका न दाखवल्यास ते मत मोजले जात नाही.

– पण अपक्ष आमदारांना मात्र त्यांच्या मतपत्रिका कोणालाही दाखवायची गरज नसते.

तर हे झाले राज्यसभेच्या निवडणूकीचे नियम, एका पेनाने उमेदवाराचा कसा बाजार उठू शकतो हे आपण पाहिलं, त्यामुळे आता महाराष्ट्रात जी राज्यसभा निवडणूक होतेयत्यातही पेन महत्वाचा असणारचं पण बाकी कोणते राजकीय डाव टाकले जातील ते पाहणं महत्वाचं आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.