संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या ‘४’ राज्यांच्या राज्यसभा निवडणुकीचे ‘हॉट’ निकाल असेत…
काल देशात १५ राज्यांत राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले. राज्यसभेच्या एकूण २४५ जागांपैकी १५ राज्यांतील ५७ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यापर्यंत संपणार आहे आणि याच ५७ जागांवर ही निवडणूक लागली होती.
उत्तर प्रदेश – ११, महाराष्ट्र – ६, तामिळनाडू – ६, बिहार – ५, आंध्र प्रदेश – ४, राजस्थान – ४, कर्नाटक – ४, ओडिशा – ३, मध्य प्रदेश – ३, तेलंगणा – २, छत्तीसगड – २, झारखंड – २, पंजाब – २, हरियाणा – २, उत्तराखंड – १ असे एकूण १५ राज्यांमध्ये ५७ जागांवर निवडणूक झालेली आहे.
या ५७ जागांपैकी ४१ जागा बिनविरोध निवडून आणल्या गेल्या.
बाकी ४ राज्यातल्या १६ जागांवर निवडणूक पार पडली.
त्या ४ राज्यात महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. भाजप, काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्षांनी राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी शक्य ती-ती रणनीती आखली आणि मतदान घडवून आणले.
या चारही राज्यात क्रॉस व्होटिंगचेही आरोप झाले, मतं बाद करण्याची भाजपने मागणी केली. भाजपने घेतलेल्या आक्षेपामुळे मतमोजणीची प्रक्रिया लांबणीवर पडली. या सगळ्यात रात्रभर हायव्होल्टेज ड्रामा चालू राहिला, आशा-अक्षेपा, तर्क- वितर्क लावले गेले आणि अखेर निकाल लागले.
या ४ राज्यात निवडणूक झाली, तेथील निकालांवर एक नजर मारूया…
१. महाराष्ट्र –
- महाराष्ट्रात ६ जागांसाठी निवडणूक पार पडली.
त्यासाठी २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. तसं तर राज्याची विधानसभेतील आमदारांची एकूण संख्या २८८ आहे. मात्र शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं तर राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे जेलमध्ये असल्यामुळे त्यांचं मतदान झालं नाही.
घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत ६ जागेसाठी रिंगणात असलेले शिवसेना – संजय राऊत -४१ मते, राष्ट्रवादी – प्रफुल्ल पटेल ४३ मते, काँग्रेस – इम्रान प्रतापगढी ४४, भाजप – पियुष गोयल ४८, अनिल बोंडे ४८ मतांनी विजयी झाले.
शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढाई झाली आणि धनंजय महाडिक यांनी ४१.५ मते मिळवत विजय खेचून आणला.
भाजपचे १०६ आमदार तर पाठींबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची ६ इतकी संख्या आहे. याचाच अर्थ भाजपला महाविकास आघाडीची ९ ते १० मते फोडता आली. शिवसेनेचे एक मत रद्द झाले नसते सोबतच अनिल देशमुख व नवाब मलिक यांना मतदान करता आले असते तरिही धनंजय महाडिक यांचा विजय झाला असता अशी फिल्डिंगच देवेंद्र फडणवीस यांनी लावली होती.
२. राजस्थान –
- राजस्थानमध्ये ४ जागांसाठी निवडणूक पार पडली.
महाराष्ट्रानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती राजस्थानमधील निवडणुकीची.
निवडणुकीत राजस्थानच्या एकूण २०० आमदारांनी मतदान केले. निवडून येण्यासाठी इथे ४१ मतांची आवश्यकता होती. तिथलं संख्याबळ पाहिलं, तर सत्ताधारी काँग्रेसकडे १०८ आमदार आहेत, भाजपकडे ७१ आमदार आहेत, अपक्ष आमदारांची संख्या आहे १३. छोट्या पक्षांचं संख्याबळ पाहायचं झालं, तर रालोपकडे ३, माकप आणि बीटीपीकडे प्रत्येकी २ आणि रालोदकडे १ आमदार आहे.
या समीकरणामुळं उमेदवारांना विजयी होण्यासाठी ४१ मतं गरजेची होती. काँग्रेसच्या दोन आणि भाजपची एक जागा फिक्स मानली जात होती. त्यामुळे चुरस रंगणार होती ती चौथ्या जागेसाठी. काँग्रेसच्या उमेदवाराचा सामना करण्यासाठी भाजपनं अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिला.
या निवडणुकीचे निकाल लागले आणि केउन ४ पैकी ३ जागा आपल्या खात्यात घेणाऱ्या काँग्रेसने भाजपला धक्का दिला.
या निवडणुकांची जबाबदारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्वतःच्या शिरावर घेतली होती, त्यामुळे या यशाचं श्रेय त्यांनाच जातं.
काँग्रेसचे उमेदवार मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला, प्रमोद तिवारी आणि भाजपचे घनश्याम तिवारी यांना यश मिळालं आहे. तर भाजपच्या पाठिंब्यावर उभे असलेले सुभाष चंद्रा यांची हार झाली आहे. चंद्रा यांना ३० मते मिळाली तर काँग्रेसचे वासनिक आणि सुरजेवाला यांना अतिरिक्त मते मिळाली तसेच भाजपचे अधिकृत उमेदवार घनश्याम तिवारी यांनाही दोन अतिरिक्त मते मिळालीत.
काँग्रेस -रणदीप सुरजेवाला ४३, मुकुल वासनिक ४२, घनश्याम तिवारी ४३ मते मिळवली तर भाजपचे उमेदवार – प्रमोद तिवारी -४१ मतं मिळवली.
काँग्रेसकडे तीनही जागांसाठी आवश्यक बहुमत असल्यामुळे सुरुवातीपासूनच हे तिन्ही उमेदवार जिंकून येतील हे स्पष्ट होते. परंतु भाजपने अपक्षांना उभे करून निवडणूक अटीतटीची केलेली.
मात्र यात खरा गेम भाजप पुरस्कृत सुभाष चंद्रा यांचा झाला…
सुभाष चंद्रा यांचे गणित बिघडण्यास क्रॉस व्होटिंग असल्याचं आधीच स्पष्ट झालेलं.
डॉ. सुभाष चंद्रा यांना ३० मतं मिळाली. भाजप आमदार शोभा राणी कुशवाह यांच्यावर काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केल्याचा आरोप झाला तर दुसरीकडे भाजपच्या आमदार सिद्धी कुमारी यांनी भाजप समर्थित उमेदवार सुभाष चंद्र यांना मतदान करण्याऐवजी घनश्याम तिवारी यांना मतदान केले. कैलास मीणा यांच्या मतावरही प्रश्न उपस्थित केले गेले. येथे झालेल्या ८ क्रॉस व्होटिंगच्या दाव्यामुळे राजस्थानमधील सुभाष चंद्रा यांचे गणित बिघडू शकते असं म्हणलं जात होतं आणि तेच झालं.
३. कर्नाटक –
- कर्नाटकात ४ जागांवर निवडणूक पार पडली.
या ४ जागांसाठी ६ उमेदवार मैदानात होते. भाजपने सीतारामन, जगेश, लहार सिंह हे ३ उमेदवार, काँग्रेसने २, जेडीएसने १ उमेदवार उतरवले होते. काँग्रेसने जयराम रमेश, मन्सूर अली खान हे २ उमेदवार उभे केलेले तर JD(S) ने कुपेंद्र रेड्डी यांना उमेदवारी दिली होती.
कर्नाटक विधानसभेत एकूण सदस्यसंख्या २२५ इतकी आहे त्यानुसार जिंकून येण्यासाठी ४५ मतांची आवश्यकता होती.
भाजपकडून निर्मला सीतारामन आणि काँग्रेसचे जयराम विजयी झाले. त्यांना प्रत्येकी ४५-४५ मतं मिळालीत आणि ते विजयी ठरलेत. तर ४४ मतं घेऊन भाजपचे जगेश जिंकून आलेत अशाप्रकारे भाजपने ४ जागांपैकी ३ जागा जिंकल्या आहेत.
मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत भाजपचे जगेश यांना ४४ मतं मिळालीत, कुपेंद्र रेड्डी ३०, मन्सूर अली खान यांना २५, लहर सिंग यांना ३३ मते मिळाली. भाजपचे जगेश यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. कर्नाटकातही क्रॉस व्होटिंग झालं, जेडीएसच्या दोन आमदारांनी काँग्रेसला मतदान केले आहे.
४. हरियाणा –
- हरियाणामध्ये २ जागांसाठी निवडणूक पार पडली.
२ जागांसाठी ३ उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून कृष्णलाला पंवार, काँग्रेसकडून अजय माकन आणि भाजप- जेजेपीच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार म्हणून कार्तिकेय शर्मा उभे राहिलेले.
या दोन्ही जागा भाजपच्या खिश्यात गेल्या असून काँग्रेसचे अजय माकन यांचा पराभव झाला.
संख्याबळानुसार प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३१ मतांची आवश्यकता होती. भाजपचे ४० आमदार आहेत. त्यामुळे भाजप चे अधिकृत उमेदवार कृष्णलाला पंवार आरामात निवडून आले. भाजप- जेजेपीच्या पाठिंब्याने कार्तिकेय शर्मा देखील निवडून आले.
हरियाणात काँग्रेसकडे ३१ आमदार आहेत. मात्र फेरमतमोजणीत अजय माकन यांचा पराभव झाला.
येथे ९० पैकी ८९ आमदारांनी मतदान केले. अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी कोणालाही मतदान न करण्याचे जाहीर केले होते, त्यामुळे त्यांनी अद्याप मतदान केले नाही.
या चार राज्यात राज्यसभा निवडणूक पार पडल्या आणि निकाल आले. हे निकाल पाहता देशात काय वारं सुरुये याचा अंदाज येतो.
हे ही वाच भिडू :
- गेहलोत यांना उगाच जादूगार म्हणत नाय, डाव पलटवणं त्यांच्या डाव्या हातचा मळ आहे…
- नुपूर शर्मा प्रकरणावरून देशभरातला मुस्लीम समाज ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरला आहे
- प्रचारात हिंदूत्वाचा मुद्दा आणला म्हणून बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार गेला होता..