संभाजीराजेंना उमेदवारी दिली असती तर आजचं चित्र वेगळं असतं का..? हे आहेत ३ अंदाज..

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।। 

तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ।।

थोडक्यात काय तर वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही. तुकाराम महाराजांचा हा अभंग ट्विट केला आहे तो संभाजीराजे छत्रपती यांनी. 

संभाजीराजे सहाव्या जागेसाठी राज्यसभा लढवणार होते. त्यासाठी अनेक चर्चा झाल्या. बोलणी झाल्या. अखेरच्या क्षणी या बोलण्या फिस्कटल्या आणि शिवसेनेमार्फत संजय पवार यांना राज्यसभेचं तिकीट देण्यात आलं. 

संभाजीराजेंना तिकीट न देण्याचं कारण होतं ते म्हणजे त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेण्यास नकार. सेनेत प्रवेश न घेता, महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून उमेदवारी द्यावी अस संभाजीराजेंच मत होतं तर शिवसेनेचे खासदार कमी आहेत. आमच्या पक्षात येत असाल तर उमेदवारी देवू अस संजय राऊत यांच मत होतं.

त्यातूनच बऱ्याच चर्चा झाल्या आणि सेनेकडून संभाजीराजेचं तिकीट नाकारण्यात आलं. संजय पवार यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीचा उमेदवार घोषीत करण्यात आलं व त्यानंतर पत्रकार परिषद घेवून त्यांनी राज्यसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याचं घोषीत केलं.. 

आत्ता हा होता बेस. पण संभाजीराजेंना उमेदवारी नाकारून शिवसेनेनं चूक केली का? असा प्रश्न पहिल्या दिवसापासून विचारला जात होता. संभाजीराजेंनी देखील निकालानंतर ट्विट करुन सेनेलाच टोला लगावला आहे. 

जर सेनेनं संभाजीराजेंना तिकीट दिलं असत तर चित्र वेगळं असत का? याचे बांधलेले अंदाज.. 

पण हे अंदाज समजून घेण्यापुर्वी एक गोष्ट डोक्यात पक्की घुसवावी लागते ती म्हणजे राजकारणात जर-तर या गोष्टींना अर्थ नसतो.

भाजपने नैतिकतेमुळे सहाव्या जागेवर उमेदवार देणं टाळलं असतं.. 

संभाजीराजेंना जोपर्यन्त शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार की नाही याची घोषणा झाली नाही, तोपर्यन्त भाजपकडून सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्यात आला नाही. भाजप ही निवडणूक लढवणार की नाही याबाबत सांशकता होती. मात्र शिवसेनेकडून जेव्हा संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली त्यासोबतच भाजपकडून धनंजय महाडिक यांच नाव पुढे करण्यात आलं. 

जर सेनेकडून महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून संभाजीराजेंना तिकीट दिल असत तर भाजपला सहाव्या जागेवर उमेदवार देणं अवघड गेलं असतं. कारण उमेदवार दिला असता तर महाविकास आघाडीला भाजपने “मराठा” समाजाला विरोध केला असा प्रचार करणं महाविकास आघाडीला शक्य झालं असत. 

जरी भाजपने सहाव्या जागेवर उमेदवार दिला असता तरी मराठाविरोधी राजकारण भाजप करत आहे हे पर्सेप्शन बिल्ड करता आलं असतं

जरी भाजपने सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिली असती. व हि निवडणूक महाविकास आघाडी पुरस्कृत संभाजीराजे विरुद्ध धनंजय महाडिक अशी झाली असती तर प्रचाराच्या दरम्यानच भाजप मराठा नेतृत्वाला विरोध करत आहे हा मुद्दा महाविकास आघाडीला चर्चेत आणता आला असता. 

जर निवडणूकीत संभाजीराजेंचा पराभव झाला असता तरीही तो पराभव भाजपने घडवून आणला हे सांगण महाविकास आघाडीला बेरजेच्या राजकारणातून सोयीच गेलं असत. 

शिवसेनेत प्रवेश करुन उमेदवारी देण्याएवजी पुरस्कृत उमेदवार झाल्याने थेट महाविकास आघाडीवर खापर फुटलं नसतं. 

आजचा हा पराभव सेनेचा विशेषत: महाविकास आघाडीचा पराभव आहे. मात्र शिवसेना पुरस्कृत अथवा महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून संभाजीराजेंना उमेदवारी देण्यात आली असती तर महाविकास आघाडीला आवश्यक तितकी तटस्थता या पराभवापासून दाखवता आली असती.

विरोधात गेलेल मतदान हे महाविकास आघाडीच्या विरोधात गेलेल नसून ते व्यक्तिश: संभाजीराजेंना विरोध करणारे होते हे पर्सेप्शन बिल्ड करणं व महाविकास आघाडीला डॅमेज होण्यापासून वाचवणं सेनेला व पर्यायाने महाविकास आघाडीला सोप्प गेलं असतं. 

पण हे झाले जर तरचे अंदाज. शिवसेनेमार्फत संभाजीराजेंना उमेदवारी दिली असती व भाजपने विरोधी उमेदवार दिला नसता व संभाजीराजे निवडून आले असते. अस झाल्यानंतर त्यांनी सेनेची किंवा महाविकास आघाडीचीच भूमिका घेतली असती हे कशावरून ठरवता येईल. संभाजीराजेंना पुरस्कृत खासदारकीचं तिकीट देण्याबाबत सेनेची भूमिका हीच होती.

त्यामुळे संभाजीराजेंच्या उमेदवारीमुळे भाजपला तसही यश मिळणारच होतं. अन् दूसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असे अंदाज शिवसेनेचा उमेदवार पडल्यानंतर लावलेले आहेत. समजा संजय पवार निवडणूक जिंकले असते तर या जर-तरच्या गोष्टींना देखील कोणताच अर्थ राहिला नसता हे देखील तितकच खरं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.