रिसॉर्ट पॉलिटिक्स म्हणलं की एकच नाव समोर येतं, ते म्हणजे डी.के.शिवकुमार…!!!

राज्यसभेची निवडणूक आली आणि सोबत ‘घोडेबाजार’ हा शब्द देखील ऐकायची सवय लागली..
जवळपास २४ वर्षानंतर महाराष्ट्रात राज्यसभेसाठी निवडणूका होतायत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना चांगलाच रंगणार आहे. नेमका कुणाचा गेम होईल अन कुणाची बाजी पलटेल सांगता यायचं नाही. यात अपक्ष आमदारांचे अन लहान -मोठ्या पक्षांच्या आमदारांचे भाव वधारलेत. त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून केला जातोय. कारण याच अपक्ष आमदारांचे मतं दिल्लीचा मार्ग सोपा करणार आहेत.
वातावरण एकदम गरम आहे. महाविकासआघाडीने तर त्यांचे आमदार फुटू नये म्हणून हॉटेल बूक केलं आहे. सेनेने तर आपल्या आमदारांना बॅगा भरूनच वर्षावर बोलावलं अन वर्षाच्या मुख्य गेटमधून थेट त्यांची रवानगी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलवर केली आहे. सर्व आमदारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी खासदार विनायक राऊत यांना सोपवली.
मतांची जुळवा-जुळव करत पक्षांकडून रिसॉर्ट पॉलिटिक्स केलं जातं. रिसॉर्ट पॉलिटिक्सची चर्चा सुरु झाली की, एक नाव समोर येतं, ते म्हणजे काँग्रेसचे ट्रबलशुटर डी.के शिवकुमार..!!!
का ?
कारण त्यांना काँग्रेस पक्षाचे संकट मोचक जातं.
तसेच त्यांना “रिसॉर्ट पॉलिटिक्सचे” जनक देखील म्हटले जाते.
काँग्रेस पक्षाचे पॉवर हाऊस म्हणले जाणारे डी.के शिवकुमार हे १९८९ पासून आमदार असून त्यांनी अनेकवेळा मंत्रीपदंही भूषवली आहेत. तसेच ते सोनिया गांधींच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
बरं रिसॉर्ट पॉलिटिक्स चा अन डी.के शिवकुमार यांचा काय संबंध ?
२०१३ मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची ८४० कोटी इतकी संपत्ती होती.
डी.के शिवकुमार हे कर्नाटकातील प्रसिद्ध ईगलटन रिसॉर्टचे मालक आहेत. ज्या रिसॉर्टमध्ये हेलिपॅड पासून ते स्विमिंग पूल पासून तर थिएटरपर्यंत सर्व लक्झरी सुविधा आहेत. म्हणूनच हे गोल्फ रिसॉर्ट, ईगलटन हे काँग्रेस आमदारांचे आवडते ठिकाण आहे. शिवकुमार यांच्या या रिसॉर्टमुळे, कित्येक सरकारं पडता पडता वाचली..
मात्र रिसॉर्ट पॉलिटिक्स कसं सुरू झालं ?
कर्नाटक हा १९८० च्या दशकापासून रिसॉर्ट राजकारणाचा बालेकिल्ला राहिलाय. १९८४ मध्ये विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या आधी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एनटी रामाराव आपल्या आमदारांसह बॅंगलोरला आले तेव्हा या रिसॉर्टच्या राजकारणाला सुरुवात झाली असं सांगितलं जातं. एनटी रामाराव यांनी त्यांचे मित्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या मदतीने तब्बल महिनाभर त्यांच्या आमदारांना नंदी हिल्समध्ये ठेवलं होतं.
भाजप सरकारच्या काळात येडियुरप्पा यांना त्यांच्या समर्थक आमदारांना रिसॉर्टमध्ये घेऊन जावे लागले होते.
२००६ ते २०१३ या काळात जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांच्या सरकारांमुळे कर्नाटक राज्य रिसॉर्ट राजकारणात माहीर झाला आणि रिसॉर्ट पॉलिटिक्सच्या नव्या युगाचा साक्षीदार बनून समोर आला.
अशाप्रकारे कर्नाटक देशातील ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा बालेकिल्ला बनत गेला आणि यात डी.के शिवकुमार हे देखील रिसॉर्ट पॉलिटिशयन म्हणून समोर आले
२००२ मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनाही रिसॉर्टचे राजकारण करावे लागले होते.
आणि यात डी. के यांनी महत्वाची भूमिका बजावलेली. २००२ मध्ये अविश्वास ठरावाला सामोरे जाणारे विलासराव देशमुख यांनी आपल्या सर्व आमदारांना बँगलोरला आणलं होतं. महाराष्ट्रातील विलासराव देशमुख यांचं सरकार पडण्यापासून वाचवण्यासाठी राज्यातल्या ४० काँग्रेस आमदारांना डीके शिवकुमार यांच्या देखरेखीखाली बेंगलोरच्या ईगलटन रिसॉर्टमध्ये ठेवलं गेलं.
२००४ च्या निवडणुकीत त्यांनी एचडी देवेगौडा यांचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
२०१७ च्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान, सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना विजयी करण्यासाठी गुजरातच्या काँग्रेस आमदारांची सुरक्षा डीके शिवकुमार यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
अर्थातच त्यांनी भाजपला गुजरात काँग्रेसचे आमदार फोडण्यापासून रोखलं होतं. आमदार फुटू नये याची जबाबदारी डीके शिवकुमार यांच्या खांद्यावर टाकण्यात आली होती. त्यांनी ४४ आमदारांना जवळपास आठवडाभर बिदादी येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवले होते. डीके शिवकुमार यांच्या प्रयत्नांमुळे भाजपला येथे यश मिळू शकले नव्हते.
२०१८ मध्ये कुमारस्वामी यांचे सरकार वाचवण्याचे श्रेय देखील डीके शिवकुमार यांनाच जाते.
२०१८ च्या या विधानसभा निवडणुकीत खंडित जनादेश आला. यानंतर सर्व निवडून आलेल्या आमदारांना पक्षांनी विविध रिसॉर्टमध्ये ठेवले होते. त्यानंतर विधानसभेत मतदान करण्यासाठी त्यांना सोबत नेण्यात आले होते.
त्याच्या एक वर्ष आधी, येडियुरप्पा यांच्या अविश्वास ठरावादरम्यान राज्यातील रिसॉर्ट्सची मागणीही वाढली होती. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने आपल्या सर्व आमदारांना तोडफोडीपासून वाचवण्यासाठी हरियाणातील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते…म्हणजेच भाजपने देखील रिसॉर्ट पॉलिटिक्स खेळायला सुरुवात केली.
कोणतीही निवडणूक लागो आणि कुणी कितीही डाव टाकोत..
मात्र डी.के शिवकुमार यांनी खेळलेलं “रिसॉर्ट पॉलिटिक्स” कुणालाही खेळात येणार नाही. म्हणूनच कदाचित त्यांना काँग्रेसचे संकट मोचक म्हणलं जातं.
हे ही वाच भिडू :
- नाराज झालेल्या गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला अन् दिल्ली हादरली…
- भाजपची विधानपरिषदेची उमेदवारी लिस्ट पाहता, महाराष्ट्रात ‘फडणवीस ही सबकुछ है’ सिद्ध झालंय
- घोडेबाजारवरून आठवलं, पवारांनी एकदा घोड्यांच्या रेसमध्ये ५ रुपये लावून अन् ५५ रुपये जिंकलेले