५ हजारांपासून सुरुवात करणाऱ्या राकेश झुनझुनवालांनी ४० हजार कोटींचं साम्राज उभं केलं होतं

भारतीय शेअर बाजारचे किंग, बिग बुल अशी ओळख असणारे राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांना २-३ आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतरही त्यांची प्रकृती ठीक नव्हती.

राकेश झुनझुनवाला यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या अकासा एअरलाईन्सचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले होते.

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म हैद्राराबादचा 

१९६० साली जन्मलेल्या झुनझुनवालांचे वडिल इन्कम टॅक्स ऑफिसर होते आणि ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टही करायचे. त्यामुळे राकेश झुनझुनवाला यांना घरातूनच शेअर मार्केटचे धडे मिळत होते.

ग्रॅज्युएशननंतर झुनझुनवाला १९८५ मध्ये CA झाले. यानंतर त्यांनी आपल्या वडिलांकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, वडिलांनी नकार दिला आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास स्वतः पैसे कमवून लावायला सांगितले होते.

त्याचवर्षी झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटमध्ये डाव खेळायचा ठरवलं. त्यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सेंजचा निर्देशांक १५० च्या दरम्यान होता. तेव्हा झुनझुनवालांनी शेअर मार्केटमध्ये त्यांनी पहिली रक्कम लावली ती ५ हजार रुपये. इतके पैसे लावून हा माणूस या इंडस्ट्रित आला.

 ५ हजारची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना १९८६ मध्ये पहिला नफा कमविला. त्यांनी टाटाचे शेअर ४३ रुपयांना विकत घेतले होते. आणि तीन महिन्यानंतर १४३ रुपयांना विकले हते . १९८६ ते ८९ दरम्यान त्यांना २ कोटी ५० लाखांचा फायदा झाला. 

यानंतर सेसा स्टारलिटने कंपनीचे चार लाख शेअर एक कोटी रुपयांना विकत घेतले आणि या गुंतवणुकीत मोठा नफा कमावला.

राकेश झुनझुनवाला ज्या पद्धतीने बाजारात गुंतवणूक करत असे, त्याला मोठे गुंतवणूकदार त्यांना फॉलो करायचे. झुनझुनवाला ज्या शेअरवर पैसे गुंतवायचे तो शेअर सर्वात जास्त फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. लक्षात घ्या ५ हजारांचे ४० हजार कोटी रुपये या माणसांने ३५ वर्षात केलेले आहेत.

यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. २००३ मध्ये झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीत गुंतवणूक केली. टायटन म्हणजे तीच आपली घड्याळाची कंपनी. ही कंपनी टाटांची आहे. पण राकेश झुनझुनवाला यांना सर्वाधिक पैसे मिळवून देणारी कंपनी म्हणून याचा उल्लेख केला जातो. 

टायटनच्या एकाच शेअरने झुनझुनवाला यांचे नशीब बदलून टाकले 

त्यावेळी टायटनेचा एक शेअर झुनझुनवाला यांनी ३ रुपयांना खरेदी केला होता. आज त्याची किंमत २ हजार ४७२ रुपयांना आहे. हा टायटनचा शेअर त्यांचा सगळ्यात आवडता समजला जातो. 

आज त्याच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत. यामध्ये सेल, टाटा मोटर्स, टाटा कम्युनिकेशन्स, लुपिन, टीव्ही18, डीबी रियल्टी, इंडियन हॉटेल्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, फेडरल बँक, करूर वैश्य बँक, एस्कॉर्ट्स लिमिटेड, टायटन कंपनी या कंपन्यांचा समावेश आहे.

 शेअर मार्केट मध्ये आपलं साम्राज्य उभं करणारे राकेश झुनझुनवाला एअरलाईन्स सेक्टर मध्ये उतरले होते. नुकतंच आकासा एअरलाईन्सचे उदघाटन करण्यात आले होते. त्यावेळी ते व्हीलचेअरवरून आले होते. टाटा समूहाच्या कंपन्यांमधून पैसा कमावणारा झुनझुनवाला टाटांशी आकाशात टक्कर देणार होते.

आकासा एअरचे उद्दिष्ट हे सर्वसामान्य नागरिकांना विमानसेवा परवडणारी असायला हवी. राकेश झुनझुनवाला यांनी या कंपनीत सुमारे ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केल्याचे सांगितलं जात.  

फोर्ब्ज मासिकाच्या आकडेवारीनुसार राकेश झुनझुनवाला हे भारतातील ३६ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. आज त्यांची नेटवर्थ ४० हजार कोटींची असल्याचे सांगितलं जात.

राकेश झुनझुनवाला मुंबईतील सर्वात महागड्या मलबार हिल भागात १४ मजली आलिशान घर बांधत होते. सध्या ते  एका अपार्टमेंट दोन मजली घरात राहत होते. नवीन घराचं बांधकाम होऊन ते तिथे राहायला जातील असं सांगितलं जात होत.

अनेक उद्योगपती आणि कॉर्पोरेट जगतातील नामवंत व्यक्ती या भागात राहतात. हे घर बांधण्यासाठी झुनझुनवाला यांनी ३७१ कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती. मलबार हिल हा मुंबईतील सर्वात महागडा परिसर मानला जातो. येथे एका चौरस फुटाची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. सज्जन जिंदाल, आदि गोदरेज आणि बिर्ला कुटुंब सुद्धा मलबार हिलमध्येच राहतात.

इतर गोष्टींबरोबर त्यांनी चित्रपट निर्मिती मध्ये सुद्धा आपले नशीब आजमावून पहिले आहे. त्यांनी तीन बॉलिवूड चित्रपटांची निर्मितीही केली आहे. यामध्ये इंग्लिश विंग्लिश, शमिताभ आणि ‘की अँड का’ यांचा समावेश आहे.

५ हजारांपासून सुरुवात करणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी ४० हजार कोटींचं साम्राज उभं केलं होतं, ही गोष्ट सर्वांनाच कायम प्रेरणा देणारी आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.