या बाईने राकेश मारियांना फसवलं नसत तर तेव्हाच ‘अबू सालेम’चा खात्मा झाला असता.

राकेश मारिया ठाऊक नाहीत असे फार कमी लोक असतील. आज वरचा भारतातील सर्वात फेमस पोलीस ऑफिसर. नुकतच त्यांचं लेट मी से इट नाऊ नावाच आत्मचरित्र प्रसिद्ध झालंय.  गुन्ह्यांचा शोध घेताना त्यांचं आजवरच आयुष्य एखाद्या सिनेमाप्रमाणे थ्रिलिंग बनलं आहे. त्यातील अनेक किस्से त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितले आहेत.

ही गोष्ट आहे १९९३ ची. राकेश मारिया तेव्हा मुंबईच्या ट्राफिक विभागाचे डेप्युटी कमिशनर होते.

१३ साखळी बॉम्बस्फोटानंतर अख्खी मुंबई हादरून गेली होती. आरडीएक्सने भरलेल्या एका स्कूटरचा स्फोट झाला नाही आणि ही स्कूटर राकेश मारियाच्या टीमला सापडली.

याच स्कूटरमुळे अख्ख्या बॉम्बस्फोटाचे धागे दोरे मिळायला सुरवात झाली.

पोलिसांनी रात्रंदिवस एक करून तपास चालू केला. एकामागोमाग एक पुरावे सापडू लागले. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या सांगण्यावरून हे बॉम्बस्फोट झाले ही माहिती समोर येत होती. अटकसत्र सुरु झाले. अनेक मोठी नावे यात सापडत होती. प्रकरणाला वेगळे वळण मिळत चालले होते. पोलिसांवरचा दबाव वाढला होता.

अशातच एकां सेलिब्रिटीचं नाव समोर आल. फिल्मस्टार संजय दत्त.

मुंबई बॉम्बस्फोटावेळी पाकिस्तानातून अवैध शस्त्रसाठा भारतात आला होता. संजय दत्तच्या अंडरवर्ल्ड मध्ये ओळखी होत्या. शंका येऊ नये म्हणून त्याच्या वांद्रे येथील अलिशान घरात शस्त्र साठा लपवायचं ठरलं.

कुख्यात गुंड अबू सालेमला ९-१० एके४७, २५-३० हंडग्रेनेड देऊन पाठवण्यात आलं.

अस म्हणतात की अबू सालेम गाडीत घेऊन आलेला हा शस्त्रसाठा पाहून संजय दत्त हादरला. त्याने  तो परत पाठवला आणि स्वसंरक्षणार्थ दोन बंदुका ठेवून घेतल्या.

संजय दत्तला अटक झाली. त्याला राकेश मारीयानी कॉलरला धरून फरफटत नेले. 

याच तपासादरम्यान आणखी एक नाव समोर आले ते म्हणजे झैबूनिस्सा काझी. ती देखील बांद्र्याच्या माउंट मेरी चर्च जवळ राहायची. अबू सालेमने संजय दत्तने परत पाठवलेला शस्त्रसाठा तिच्या घरात लपवला होता. या झैबूनिस्साला अटक करण्यात आली आणि पोलीस स्टेशनमध्ये राकेश मारियाच्या समोर चौकशीसाठी उभं करण्यात आलं.

राकेश मारिया हे त्यांच्या कठोर इन्व्हेस्टीगेशनसाठी प्रसिद्ध होते. भल्या भल्या गुंडांना त्यांनी आपल्या थर्ड डिग्रीने बोलता पोपट केल होतं.

पण या झैबूनिस्साने डोळ्यात अश्रू आणून आपली दर्द भरी स्टोरी काय सांगितली राकेश मारिया यांचं हृद्य पाघळल. त्यांना वाटलं हिला काही माहिती नाही. कोणी तरी तिला फसवून तिच्या घरात बंदुका आणून लपवल्या.

राकेश मारीयानी झैबूनिस्सा काझीला निर्दोष समजून सोडून दिल.

पुढे आणखी एका मन्झूर अहमद नावाच्या आरोपीची उलट तपासणी करत असताना त्याने झैबूनिस्साचा उल्लेख केला. या मन्झूर अहमदच्या कारचा वापर शस्त्रे एका जागेहून दुसऱ्या जागी हलवण्यासाठी करण्यात आला होता. मन्झूरने मारियाना सांगितल,

“झैबूनिस्साला खूप काही ठाऊक आहे.”

हे ऐकल्यावर राकेश मारियाचं डोक हलल. झैबू निस्साला शोधून परत पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. तिला दारातून आत येताना पाहताच राकेश मारिया चिडून आपल्या खुर्चीतून उठले. धावत धावत तिच्याकडे गेले आणि कानाखाली वाजवली. त्या नंतर झैबुनिस्साने सगळी स्टोरी सांगितली, अबू सालेमचा पत्ता सांगितला.

पण पोलीस जेव्हा तिथे गेले तोवर अबू सालेम रफू चकर झाला होता.   

झालं अस होतं की जेव्हा राकेश मारियाना शेंडी लावून झैबूनिस्सा घरी परत गेली तेव्हा तिने लगेच अबू सालेमला फोन केला होता. आपल नाव समोर येतंय हे कळल्या कळल्या अबू सालेम दिल्ली मार्गे नेपाळ करून दुबईला पळाला.

राकेश मारिया म्हणतात की झैबुनिस्सावर विश्वास ठेवणे ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली.

त्या दिवशी अबू सालेम माझ्या हाती सापडला असता तर मुंबई बॉम्बस्फोटाचा तपास खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. खूप वेळ वाचला असता आणि बरीच बडी धेंड पुराव्या सकट सापडले असते.

पुढे या अबू सालेमने अनेक मोठे गुन्हे केले. खंडनीसाठी गुलशन कुमार यांचा खून घडवून आणला. अख्खी फिल्मइंडस्ट्री त्याच्या बंदुकीच्या भीतीने थरथर कापत होती.

दाऊद इब्राहीमशी वाद झाल्यानंतर अबू सालेमने पोर्तुगालमध्ये आत्मसमर्पण केले आणि सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे.

पोर्तुगालशी आपला करार असल्यामुळे अबू सालेमवरील गुन्हे सिद्ध होऊनही फाशीची शिक्षा देता येत नाही. त्या दिवशी राकेश मारिया झैबुनिस्सा कडून गंडले नसते तर आज अबू सालेम फासावर चढला देखील असत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.